Hindustan Post Impact : कल्याणच्या तिसगाव रोडवरील खोदलेल्या रस्त्याचे केले डांबरीकरण

65
Hindustan Post Impact : कल्याणच्या तिसगाव रोडवरील खोदलेल्या रस्त्याचे केले डांबरीकरण
Hindustan Post Impact : कल्याणच्या तिसगाव रोडवरील खोदलेल्या रस्त्याचे केले डांबरीकरण
  • कल्याण : प्रतिनिधी

तिसगाव नाका ते आझाद प्लंबर दरम्यान महानगर गॅस वितरण कंपनीने गॅस लाईन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता तब्बल २० दिवसांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत होता. पावसाळा तोंडावर आला असतानाही संबंधित ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले नव्हते. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता खचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती या भागातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात होती. रहिवासी, व्यापारी, दुकानदार, पादचारी, प्रवासी आणि रिक्षाचालकांनी या समस्येबाबत सातत्याने आवाज उठवला होता. हिंदुस्थान पोस्टने या पार्श्वभूमीवर सविस्तर स्वरूपात सचित्र वृत्त प्रसारित केले होते. या साऱ्याची दखल घेत संबंधित यंत्रणेकडून रविवारी तातडीने हालचाली करण्यात आल्या. तिसगाव रोडवरील खोदून ठेवलेल्या पट्ट्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले असून रस्ता पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या साऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Hindustan Post Impact)

(हेही वाचा – Kalyan : २० दिवस उलटूनही तिसगाव नाक्यावरील रस्ता जैसे थे; पावसापूर्वी डांबरीकरण न झाल्यास चिखलाचे साम्राज्य पसरण्याची भीती)

गॅस लाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेल्या खोदकामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. खडी, माती आणि दगडी भूसा टाकून खड्डा बुजविण्यात आला असला तरी त्यावर अंतिम डांबरीकरण करण्यात आले नव्हते. परिणामी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रिक्षाचालकांच्या वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ झाली होती. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्रस्त रहिवाशांनी अनेक वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात होता. अखेर हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेत काम पूर्ण करण्यास सुरुवात केली. (Hindustan Post Impact)

स्थानिक रहिवाशांसह रिक्षाचालक संघटनांनी रस्ता दुरूस्तीबाबत समाधान व्यक्त केले असले, तरी खोदकाम करणाऱ्या यंत्रणांनी भविष्यात अशा कामांनंतर रस्ते त्वरित पूर्ववत करावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा कामांचे नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मतही रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आले. (Hindustan Post Impact)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.