Ajit Doval Spy Story: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांच्या गुप्तचर कारकिर्दीतील ५० वर्षांपूर्वीचा एक अत्यंत थरारक अनुभव सांगितला. त्यावेळी घडलेल्या एका घटनेमुळे करीअर जवळपास संपलं होतं, अशी भीती त्यांना वाटून गेली होती. १९ सप्टेंबर रोजी IIT रुरकीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डोभाल यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील हा प्रसंग सांगितला.
सिक्कीममध्ये गुप्तचर विभागाची जबाबदारी
डोवाल यांनी सांगितले की, सिक्कीम भारतात विलीन होण्याच्या काळात ते तेथे गुप्तचर विभागात महत्त्वाच्या जबाबदारीवर होते. १९७५ मध्ये सिक्कीमचे भारतात औपचारिक विलीनीकरण झाले. त्याआधीच्या काळात भारत-चीन सीमेवरील चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. सीमेपलीकडील माहिती मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे एक पथक पाठवले होते. हे पथक आठ दिवसांत परतण्याची अपेक्षा होती. मात्र आठ दिवस उलटून गेले, तरी त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यानंतर १५ दिवस झाले तरी पथकाची कोणतीही माहिती मिळत नव्हती.
‘चिनी सैन्याने त्यांना पकडलंय’ हे समजताच…
या परिस्थितीमुळे डोवाल चिंतेत होते. पथकातील सदस्य जिवंत आहेत की त्यांच्यासोबत काही गंभीर घटना घडली आहे, याची कोणतीही माहिती मिळत नव्हती. काही दिवसांनी मुख्यालयातून त्यांना फोन आला आणि सीमेपलीकडे लोकांना पाठवल्याबाबत विचारणा करण्यात आली. यानंतर चिनी सैन्याने संपूर्ण भारतीय पथकाला पकडले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली. हा क्षण आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक होता, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांनंतर त्या पथकाची सुटका झाली. मात्र परतल्यानंतर पथकातील सदस्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेले होते. या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
‘माझी कारकीर्द संपली’ असं वाटलं
चौकशी सुरू झाल्यानंतर डोवाल यांना आपली गुप्तचर क्षेत्रातील कारकीर्द संपुष्टात येईल, अशी भीती वाटू लागली होती. ही आपली व्यावसायिक चूक असल्याचेही त्यांना त्या वेळी वाटत होते. मात्र तपासानंतर त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. पथकाला मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या नकाशांमध्ये आणि आराखड्यांमध्येच त्रुटी असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे डोवाल यांची या प्रकरणात कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट झाले.
तिबेटी शेर्पाचा सल्ला ठरला आयुष्याचा धडा
या कठीण काळात डोभाल यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तिबेटी शेर्पाने त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. नकाशा वाचताना झालेल्या चुकीकडे त्याने त्यांचे लक्ष वेधले आणि आयुष्यातील तीन महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यास सांगितल्या. पहिली म्हणजे आपण सध्या नेमके कुठे आहोत, हे ओळखणे. दुसरी म्हणजे आपल्याला नेमके कुठे पोहोचायचे आहे, हे निश्चित करणे. आणि तिसरी म्हणजे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य मार्ग निवडणे. डोवाल यांच्या मते, हा सल्ला केवळ त्या मोहिमेपुरता मर्यादित राहिला नाही, तर पुढील आयुष्यासाठीही मार्गदर्शक ठरला.
तरुणांना दिला महत्त्वाचा संदेश
IIT रुरकीच्या दीक्षांत समारंभात डोभाल यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील या प्रसंगातून तरुणांनी अपयशाकडे कसे पाहावे, याबाबतही संदेश दिला. अडचणीच्या परिस्थितीत आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे, हे स्पष्ट असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गुप्तचर क्षेत्रातील आपल्या सुरुवातीच्या काळातील हा अनुभव त्यांनी अनेक दशकांनंतर सार्वजनिक व्यासपीठावर सांगितला. IIT रुरकीच्या २०२६ च्या दीक्षांत समारंभात एकूण २,७०१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली होती.
Join Our WhatsApp Community

