Tukaram Mundhe Transfer : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यभरातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्या बदलीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः तुकाराम मुंढे यांनीच आपल्या पुढील बदलीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंढे यांनी त्यांच्या बदलीच्या चर्चेला पूर्णविराम देत, त्याविषयी थेट खुलासा केला.
सदर मुलाखतीत मुंढे यांना, FDAमधून बदली झाल्यानंतर कोणत्या विभागात काम करायला आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, “पुढची बदली कुठे होणार, हे माझ्या हातात नाही. सरकार जो विभाग देईल, तिथे मी काम करेन,” असं त्यांनी स्पष्ट केलं. (Tukaram Mundhe Transfer)
“भविष्याचा फार विचार करत नाही”
मुलाखतीत मुंढे यांना महाराष्ट्राबाहेर किंवा राष्ट्रीय पातळीवर काम करण्याबाबतही विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भविष्यातील पद किंवा पोस्टिंगचा फारसा विचार करत नसल्याचं सांगितलं.
सध्या ज्या पदावर जबाबदारी मिळाली आहे, ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्यावर आपला भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानातील जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं महत्त्वाचं आहे, असा त्यांचा सूर होता. (Tukaram Mundhe Transfer)
कामचुकार अधिकाऱ्यांबाबतही स्पष्ट इशारा
याच मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी प्रशासनातील कामचुकारपणाबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी कामचुकारपणा करत असेल किंवा कामाच्या बाबतीत तडजोड करत असेल, तर त्याच्याबाबत सहानुभूती दाखवण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं.
चुकीचं काम करणं किंवा कामच न करणं, या दोन्ही बाबींवर कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. (Tukaram Mundhe Transfer)
थोडक्यात, ‘सरकारकडून जी जबाबदारी दिली जाईल, त्याचा स्विकार करुन प्रामाणिकपणे काम करण्यावर माझा भर असेल,’ अशा अर्थाची भूमिका तुकाराम मुंढे यांनी मांडली.
मुंढेंच्या कार्यपद्धतीला नागरिकांचा पाठिंबा
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या कार्यपद्धतीला विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाई, निकृष्ट अन्नसेवा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात सुरु केलेल्या कारवायांना लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री मल्लिका शेरावतने सोशल मीडियावर मराठीत व्हिडीओ शेअर करत मुंढे यांच्या भेसळविरोधी मोहिमेचं कौतुक केलं आणि त्यांच्या कामामुळे अन्नाबाबत अधिक सुरक्षित वाटत असल्याचंही ती म्हणाली.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

