
-
ऋजुता लुकतुके
Asian Games 2026 जपानमध्ये सुरू झालेल्या २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री मनसुख मंडाविया यांनी नागोया येथे भारतीय खेळाडूंची भेट घेत त्यांचा उत्साह वाढवला. स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकारांच्या लढती सुरू असताना मंडाविया यांनी भारतीय पथकातील खेळाडूंशी संवाद साधत त्यांना आत्मविश्वासाने खेळण्याचे आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले. (Asian Games 2026)
मंडाविया यांनी खेळाडूंना सांगितले की, ते केवळ स्वतःसाठी स्पर्धा करत नसून एका अब्जाहून अधिक भारतीयांच्या अपेक्षा आणि देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. देशाला त्यांच्या मेहनतीचा, समर्पणाचा आणि जिद्दीचा अभिमान आहे. त्यामुळे स्पर्धेतील दबाव मनावर न घेता आत्मविश्वासाने मैदानात उतरा आणि आपले सर्वोत्तम द्या, असा संदेश त्यांनी दिला. (Asian Games 2026)
(हेही वाचा – Trump-Zelenskyy भेटीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?)
यावेळी मंडाविया यांनी भारतीय खेळाडूंसोबत दुपारचे जेवणही केले. अनौपचारिक वातावरणात त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी आणि अनुभव जाणून घेतले तसेच विविध क्रीडा प्रकारांबाबत चर्चा केली. खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद घेत असतानाच आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. (Asian Games 2026)
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ५०३ खेळाडूंचे पथक पाठवले आहे. यात २६९ पुरुष आणि २३४ महिला खेळाडूंचा समावेश आहे. १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत भारत विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होत आहे. २०२२च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने विक्रमी १०७ पदके जिंकली होती. त्या कामगिरीपेक्षा पुढे जाण्याचे आव्हान यंदाच्या पथकासमोर आहे. (Asian Games 2026)
(हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्सवरील जुना पत्ता बदलायचाय? RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही; फोनमधून असं करा अपडेट)
दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले. नेमबाज एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदर्सा विनोद यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्यपदक जिंकले. एलावेनिलने वैयक्तिक प्रकारातही रौप्यपदक मिळवले. तसेच सुचिका तारियाल हिने महिलांच्या पारंपरिक ६० किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठत भारताचे आणखी एक पदक निश्चित केले. (Asian Games 2026)
भारतीय खेळाडूंशी संवाद साधताना मंडाविया यांनी प्रत्येक खेळाडूने मैदानात देशाच्या अपेक्षांचे ओझे न वाहता त्या अपेक्षांमधून प्रेरणा घ्यावी, असा संदेश दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुढील सामन्यांसाठी भारतीय खेळाडूंना त्यांनी शुभेच्छाही दिल्या. (Asian Games 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
