Pakistan Airstrikes Afghanistan : पाकिस्तानचा अफागणिस्तानमध्ये जोरदार एअरस्ट्राईक; हल्ल्यामुळे मोठी हानी

कुनार प्रांताच्या नुरगल जिल्ह्यातील पतंग भागात पहाटे सुमारे 3:30 वाजता पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केला

15
Pakistan Airstrikes Afghanistan
या कारवाईत कुनारमधील नुरगल जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली

Pakistan Airstrikes Afghanistan : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुनार आणि पक्तिका प्रांतात पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केल्याचा दावा स्थानिक माध्यमांमध्ये करण्यात आला आहे. सोमवारी पहाटे झालेल्या या कारवाईत कुनारमधील नुरगल जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

स्थानिक अहवालांनुसार, कुनार प्रांताच्या नुरगल जिल्ह्यातील पतंग भागात पहाटे सुमारे 3:30 वाजता पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी हवाई हल्ला केला. विमानांनी कमी उंचीवरून उड्डाण केल्यानंतर परिसरात मोठे स्फोट झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटांचे आवाज ऐकल्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर पडले. (Pakistan Airstrikes Afghanistan)

हेही वाचा: Asian Games 2026 India Scores : नेमबाजीत भारताला आणखी एक ‘रौप्य’; रुद्रांक्ष-हिमांशू-पार्थ या त्रिकुटाची अचूक निशाणेबाजी 

नूर मोहम्मद यांच्या घरावर हल्ला?

स्थानिक रिपोर्ट्समध्ये नूर मोहम्मद नावाच्या नागरिकाच्या घराला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन मलब्यात रूपांतरित झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांना मलब्यात बॉम्बचे अवशेष आढळल्याचा दावाही काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, हे घर नेमके का लक्ष्य करण्यात आले आणि हल्ल्याच्या वेळी घरात किती लोक होते, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. (Pakistan Airstrikes Afghanistan)

3 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी झाल्याचा दावा

दरम्यान, ताज्या अहवालांनुसार कुनारमधील हवाई हल्ल्यात किमान 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. Tolo Newsने एका प्रांतीय अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. नुरगल जिल्ह्यातील हल्ल्यात एक इमारत उद्ध्वस्त झाल्याचेही वृत्त आहे.

कुनार पोलिसांच्या प्रवक्त्याच्या माहितीनुसार, हल्ला पहाटे सुमारे 3 वाजता झाला आणि यात 3 नागरिकांचा मृत्यू, तर 4 जण जखमी झाल्याचे Ariana Newsने वृत्त दिले आहे. मात्र, विविध अहवालांमध्ये जखमींच्या संख्येत फरक आहे. त्यामुळे अंतिम आकडेवारीची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे. (Pakistan Airstrikes Afghanistan)

पक्तिकामध्येही हवाई कारवाई

कुनारसोबतच पक्तिका प्रांतातही पाकिस्तानी विमानांनी हवाई हल्ले केल्याचे अहवाल आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पक्तिकाच्या बरमल जिल्ह्यात पहाटे सुमारे 4 वाजता दोन हवाई हल्ले झाले.

काही रिपोर्ट्सनुसार, यातील एका हल्ल्यात रिकाम्या घराला, तर दुसऱ्या हल्ल्यात एका जुन्या दुकानाला नुकसान झाले. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. (Pakistan Airstrikes Afghanistan)

हेही वाचा: Maharashtra Rain Alert : पुढचे 72 तास महत्त्वाचे; कुठे मुसळधार तर कुठे अतिमुसळधार पावसाचा इशारा, पाहा ताजे अपडेट्स

पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमेवरील सुरक्षा आणि तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)च्या कारवायांवरून दीर्घकाळापासून तणाव आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये TTPशी संबंधित दहशतवादी आश्रय घेत असल्याचे आरोप केले जातात, तर अफगाण तालिबानकडून हे आरोप नाकारले जातात.

अशा परिस्थितीत कुनार आणि पक्तिकामधील ताज्या हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. Reutersनेही या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. (Pakistan Airstrikes Afghanistan)

सध्या या हल्ल्यांबाबत पाकिस्तानकडून सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे हवाई कारवाईचे नेमके लक्ष्य, हल्ल्यामागील कारण आणि एकूण जीवितहानी याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.