Crime : शहापूर, मुरबाडमध्ये महावितरणचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ८२ ठिकाणी १३ लाखांची वीजचोरी उघड

97
Crime : शहापूर, मुरबाडमध्ये महावितरणचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ८२ ठिकाणी १३ लाखांची वीजचोरी उघड!
Crime : शहापूर, मुरबाडमध्ये महावितरणचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ८२ ठिकाणी १३ लाखांची वीजचोरी उघड!
  • कल्याण : प्रतिनिधी

Crime : महावितरणच्या (MSEDCL) कल्याण मंडळ-२ च्या वतीने मागील दोन दिवस शहापूर आणि मुरबाड परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर वीज चोरी उघडकीस आली आहे. या मोहिमेत एकूण ८२ वीज चोरीची प्रकरणे निदर्शनास आली असून त्यांची अंदाजे रक्कम १३ लाख ११ हजार ८०० रूपये इतकी आहे.

या संदर्भात महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-२ मंडळ कार्यालयाला शहापूर आणि मुरबाड परिसरात वीज चोरीच्या घटना वाढत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार या भागातील वीजजोडण्यांची सखोल तपासणी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात १९ अभियंते, १८ लेखा कर्मचारी आणि ४५ जनमित्रांनी सहभाग घेतला होता. या दोन दिवसांच्या मोहिमेदरम्यान ८०० हून अधिक वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अनधिकृत वीज वापर आणि वीज चोरीची ८२ प्रकरणे आढळून आली. या प्रकरणांमध्ये एकूण ७२ हजार ४३८ युनिट वीज चोरी झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – “स्वातंत्र्याचा अर्थ केवळ मनमानी नसून…”; NSA Ajit Doval यांनी जेनझींना काय आवाहन केले?)

आढळून आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित ग्राहकांविरुद्ध वीज अधिनियम, २००३ मधील तरतुदीनुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच थकीत दंड आणि वीजबिलाची रक्कम विहित मुदतीत न भरल्यास संबंधितांविरूद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. वीज चोरीमुळे प्रामाणिक ग्राहकांवर अतिरिक्त भार पडतो आणि विद्युत पुरवठ्यावरही (Power supply) परिणाम होतो. त्यामुळे अशा मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील, असा इशारा महावितरणने दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.