Mumbai Crime : कुंपणच शेत खातंय! ड्रग्ज सापडलेल्या प्रवाशाकडून पैसे घेतले अन् सोडून दिलं; दोन GRP कॉन्स्टेबल निलंबित

10
Mumbai Crime : कुंपणच शेत खातंय! ड्रग्ज सापडलेल्या प्रवाशाकडून पैसे घेतले अन् सोडून दिलं; दोन GRP कॉन्स्टेबल निलंबित
Mumbai Crime : कुंपणच शेत खातंय! ड्रग्ज सापडलेल्या प्रवाशाकडून पैसे घेतले अन् सोडून दिलं; दोन GRP कॉन्स्टेबल निलंबित

Mumbai Crime : बोरिवली रेल्वे स्थानकावर (Borivali Railway Station) एका प्रवाशाच्या सामानात अमली पदार्थ (Drugs) सापडल्यानंतर, त्याच्याकडून कथितरित्या पैसे उकळून त्याला सोडून दिल्याप्रकरणी शासकीय रेल्वे पोलिसांच्या (GRP) दोन कॉन्स्टेबलना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. लॉरेन्स नवघरे आणि राकेश सोनावणे अशी या निलंबित कर्मचाऱ्यांची नावे असून ते बोरिवली जीआरपी चौकीत कार्यरत होते.

ही घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री बोरिवली रेल्वे स्थानकावर नियमित तपासणी सुरू असताना घडली. सामानाची तपासणी करत असताना नवघरे आणि सोनावणे यांना एका प्रवाशाकडे अमली पदार्थ आढळून आले. मात्र, या गंभीर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना देण्याऐवजी, दोघांनी त्या प्रवाशाला रेल्वे पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर नेले. तिथे पैशांची मागणी करण्यात आली आणि प्रवाशाकडून कथितरित्या रक्कम उकळल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर पडताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीअंती दोषी आढळल्याने १२ सप्टेंबर रोजी दोघांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले.

जीआरपी आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सामानाच्या तपासणीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे (SOP) जारी केली होती. या दोन्ही कॉन्स्टेबलनी या नियमांचे थेट उल्लंघन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

(हेही वाचा – Helicopter Crash : धक्कादायक! बस अपघाताचं कव्हरेज करणाऱ्या मीडियाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू)

दरम्यान, या घटनेवर प्रवासी हक्क कार्यकर्ते समीर झवेरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “पोलीस दलातील भ्रष्टाचार, खंडणी आणि सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी पोलीस ठाण्यातील प्रत्येक खोलीत आणि कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हाच एक कायमस्वरूपी उपाय आहे. तसेच पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी कर्तव्यावर असलेले जीआरपी, रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि तिकीट तपासनीस यांना बॉडी कॅमेरे देणे अनिवार्य केले पाहिजे,” अशी मागणी झवेरी यांनी केली.

गुटखा तस्करीप्रकरणी आधीच दोन जण निलंबित

जीआरपी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराची कारवाई होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातहून मुंबईत प्रतिबंधित गुटखा पोहोचवण्यास मदत केल्याच्या आरोपावरून दोन जीआरपी कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामध्ये बोरिवली जीआरपी चौकीचा अनिल गुज्जर आणि वसई जीआरपी चौकीचा तुषार ठाकूर यांचा समावेश होता. एकाच महिन्यात एकामागून एक घडलेल्या या घटनांमुळे बोरिवली जीआरपीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.