
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) माजी मॅनेजर दिशा सालियन (Disha Salian) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता पूर्णपणे नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) कठोर ताशेऱ्यानंतर अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात रीतसर एफआयआर (FIR) नोंदवून तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणात प्राथमिक तपास हाताळणाऱ्या मुंबई पोलिसांचे जबाब नोंदवणे, फॉरेन्सिक पुराव्यांचे विश्लेषण आणि संशयितांची ओळख पटवून त्यांची चौकशी करणे, अशी सीबीआयच्या तपासाची पुढची दिशा असणार आहे.
८ जून २०२० रोजी मालाड-मालवणी येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा (Disha Salian) संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेच्या अवघ्या आठवड्याभरात सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. दिशाच्या कुटुंबीयांना शवविच्छेदन अहवाल न देणे आणि गेल्या सहा वर्षांत एफआयआर दाखल न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले होते. ‘पोलिसांच्या तपासामुळे उत्तरांपेक्षा प्रश्नच अधिक निर्माण झाले आहेत,’ असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने २ सप्टेंबर रोजी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. त्यानंतर दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या तक्रारीवरून १३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
एफआयआरमध्ये गंभीर आरोप, पण थेट नाव नाही…
उच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार, ठोस पुरावे हाती येईपर्यंत सीबीआयने एफआयआरमध्ये कोणत्याही व्यक्तीचे नाव ‘आरोपी’ म्हणून नोंदवलेले नाही. मात्र, तक्रारीच्या आधारे मूळ गुन्हा करणे, आत्महत्येचा बनाव रचणे, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणे आणि पुरावे नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप नोंदवण्यात आले आहेत.
तपास यंत्रणेच्या रडारवर अनेक बडे चेहरे…
तक्रारदारांनी संशय व्यक्त करत अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने:
- राजकीय नेते: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख.
- अभिनेते व सेलिब्रिटी: डिनो मोरिया, सूरज पांचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, रोहन रॉय.
- पोलीस अधिकारी: तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे, डीसीपी विशाल ठाकूर, एपीआय अशोक देवढे, पीआय जगदेव कलापड यांच्यासह मालवणी पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी
दिशाकडे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या कथित बेकायदेशीर कृत्यांची माहिती होती आणि ती तिने सुशांतला सांगितल्यानेच हा गुन्हा घडल्याचा आरोप सालियन यांच्या वकिलांनी केला असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. आता सीबीआय कागदपत्रे, घटनास्थळ आणि साक्षीदारांची कसून तपासणी करणार असून पुरावे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे तपास यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले असल्याचे इंग्रजी वृत्तपत्रात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
