FIFA 4.2 billion deal : फिफाने ४.२ अब्ज डॉलर खाजगी गुंतवणुकीची योजना गुंडाळली, सदस्य देशांच्या विरोधानंतर पाऊल

इन्फँटिनो यांना हा धक्का मानला जात आहे.

59
FIFA 4.2 billion deal : फिफाने ४.२ अब्ज डॉलर खाजगी गुंतवणुकीची योजना गुंडाळली, सदस्य देशांच्या विरोधानंतर पाऊल
FIFA 4.2 billion deal : फिफाने ४.२ अब्ज डॉलर खाजगी गुंतवणुकीची योजना गुंडाळली, सदस्य देशांच्या विरोधानंतर पाऊल
  • ऋजुता लुकतुके

FIFA 4.2 billion deal : जागतिक फुटबॉल संघटना फिफाने (FIFA) वर्ल्ड कपच्या व्यावसायिक हक्कांमधील हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकण्याचा ४.२ अब्ज डॉलरचा प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. यूईएफए (युरोप), कॉनकाकाफ (उत्तर व मध्य अमेरिका) आणि एएफसी (आशिया) या प्रमुख प्रादेशिक फुटबॉल महासंघांच्या तीव्र विरोधानंतर फिफाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी वर्ल्ड कप आणि इतर प्रमुख स्पर्धांच्या व्यावसायिक व्यवस्थापनासाठी ‘FIFA Forward Enterprise (FFE)’ नावाची स्वतंत्र व्यावसायिक कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या कंपनीतील २० टक्के हिस्सा खासगी गुंतवणूकदारांना विकून सुमारे ४.२ अब्ज डॉलर उभारण्याची योजना होती.

या निधीचा वापर जगभरातील राष्ट्रीय फुटबॉल संघटनांना अधिक आर्थिक मदत देण्यासाठी आणि फुटबॉल विकास प्रकल्पांसाठी केला जाईल, असा फिफाचा दावा होता. मात्र या प्रस्तावाला फुटबॉल विश्वातून मोठा विरोध झाला.

यूईएफएने सर्वप्रथम या योजनेवर कठोर टीका केली. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेचे व्यावसायिक हक्क खासगी गुंतवणूकदारांकडे जाणे म्हणजे फुटबॉलचे व्यापारीकरण असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कॉनकाकाफ आणि आशियाई फुटबॉल महासंघ (AFC) यांनीही या योजनेला विरोध दर्शवला.

(हेही वाचा – Crime : शहापूर, मुरबाडमध्ये महावितरणचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ८२ ठिकाणी १३ लाखांची वीजचोरी उघड)

विरोधकांनी विशेषतः निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव, महासंघांशी पुरेशी चर्चा न होणे आणि जागतिक फुटबॉलच्या एकात्मतेवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत चिंता व्यक्त केली. काही संघटनांनी तर या प्रस्तावामुळे फिफाच्या प्रशासनावर विश्वास कमी झाल्याचेही म्हटले.

वाढत्या दबावानंतर इन्फँटिनो यांनी हा प्रस्ताव पुढे नेणार नसल्याचे स्पष्ट केले. “आता हे स्पष्ट झाले आहे की हा प्रस्ताव फुटबॉल परिवाराला एकत्र आणण्याऐवजी त्यांच्यात वितुष्ट निर्माण करत आहे,” असे त्यांनी म्हटलं आहे.

या निर्णयामुळे फिफाला मोठा आर्थिक फटका बसला असला, तरी फुटबॉल महासंघांनी याला जागतिक फुटबॉलच्या स्वायत्ततेचा विजय मानले आहे. वर्ल्ड कपचे व्यावसायिक नियंत्रण फिफाकडेच राहणार असल्याने, या स्पर्धेचे पारंपरिक स्वरूप कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फिफाच्या या माघारीमुळे आता जागतिक फुटबॉलमधील प्रशासन, पारदर्शकता आणि आर्थिक निर्णयप्रक्रिया यावर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.