Antilia Bomb Scare Case : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांच्यासह एकूण दहा आरोपींविरोधात अखेर पाच वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.(Antilia Bomb Scare Case)
आरोपातून मुक्त करण्याची आरोपींची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला. विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी आरोप निश्चित केले. आरोप निश्चिती झाल्यामुळे या हायप्रोफाइल प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीचा आणि खटल्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) विविध गंभीर कलमांखाली खटला चालवला जाणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर बेवारस सोडलेली एक संशयित स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच ५ मार्च २०२१ रोजी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच केल्याचा गंभीर आरोप हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केला होता.(Antilia Bomb Scare Case)
एटीएसकडून एनआयएकडे तपास
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे (ATS) होता, मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला. तपासादरम्यान एनआयएने कारवाई करत सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण दहा जणांना अटक केली होती.(Antilia Bomb Scare Case)
अखेर खटल्याचा मार्ग मोकळा
गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणात डिस्चार्ज अर्ज आणि विविध याचिकांमुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित होती. मात्र, आता एनआयए न्यायालयाने आरोपींवर अधिकृतपणे UAPA आणि हत्येशी संबंधित कलमांखाली दोषारोप निश्चित केल्याने, साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होऊन खटल्याची सुनावणी वेगाने पार पडणार आहे.(Antilia Bomb Scare Case)
Join Our WhatsApp Community


