Abhijeet Dipke भोवती वाढते राजकीय आकर्षण; दोन्ही शिवसेनांकडून संपर्क वाढवण्यामागे नेमकं कारण काय?

80
Abhijeet Dipke भोवती वाढते राजकीय आकर्षण; दोन्ही शिवसेनांकडून संपर्क वाढवण्यामागे नेमकं कारण काय?
Abhijeet Dipke भोवती वाढते राजकीय आकर्षण; दोन्ही शिवसेनांकडून संपर्क वाढवण्यामागे नेमकं कारण काय?
  • विशेष प्रतिनिधी

‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर त्याचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) हे राज्याच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. विशेषतः तरुणांमध्ये निर्माण झालेल्या त्यांच्या प्रभावामुळे आता शिवसेनेच्या (Shiv Sena) दोन्ही गटांकडून त्यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विविध वृत्तांनुसार, सुरुवातीपासूनच आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेना (उबाठा) पक्षाने अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्याशी सातत्याने संपर्क कायम ठेवला आहे. दुसरीकडे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांनीही दिपके यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी छत्रपती संभाजीनगर येथील दिपके यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. आंदोलनाच्या यशाचे कौतुक करत त्यांनी अभिजीत दिपके यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनीही दिपके यांच्या घरी भेट देत त्यांच्या आंदोलनाचे समर्थन केले आणि विद्यार्थी व शेतकरी प्रश्नांवर पुढेही आवाज उठवत राहण्याचे आवाहन केले.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही अभिजीत दिपके यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, कुटुंबीयांची विचारपूस केली तसेच आंदोलनाच्या यशाबद्दल अभिनंदन केले. पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनीही त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

(हेही वाचा – “खऱ्या हुकूमशाहीची उदाहरणं तुमच्याच कुटुंबात…”; Shehzad Poonawalla यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल!)

विशेष म्हणजे, सीजेपीचे आंदोलन सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी हा लढा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे सांगत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे स्वतः आंदोलकांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी “महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे” असा विश्वासही व्यक्त केला होता. आदित्य ठाकरे तसेच शिवसेनेच्या नेत्यांनीही आंदोलनाला सातत्याने पाठिंबा दिला होता.

दुसरीकडे, शिंदे गटाने आंदोलन संपल्यानंतर दिपके यांच्याशी संपर्क वाढवला. संजय शिरसाट यांनी आपण अभिजीत दिपके यांना लहानपणापासून ओळखत असल्याचे सांगत ही भेट राजकीय नसून वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केले. आंदोलन सुरू असताना भेट दिली असती, तर त्याचा वेगळा अर्थ काढला गेला असता, म्हणून आंदोलन संपल्यानंतरच भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय विश्लेषकांच्या मते, नीट (NEET) आंदोलनानंतर देशभरातील तरुणांमध्ये अभिजीत दिपके यांची निर्माण झालेली प्रतिमा आणि ‘जेन झी’मध्ये मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता विविध राजकीय पक्ष त्यांच्याशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी काळात अभिजीत दिपके यांच्या राजकीय भूमिकेकडे आणि त्यांच्याभोवती घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.