- ऋजुता लुकतुके
FIFA World Cup 2026 मध्ये बेल्जियमविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात इराणला ०-० अशी बरोबरी मिळवून देण्यात गोलरक्षक अलीरेझा बेइरानवंद (Alireza Beiranvand) याची भूमिका निर्णायक ठरली. सात शानदार बचाव करत त्याने बेल्जियमच्या आक्रमणांना वारंवार रोखले आणि इराणच्या बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र बेइरानवंदची खरी कथा मैदानावरील कामगिरीपेक्षाही अधिक थक्क करणारी आहे.
आज जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा बेइरानवंद इराणच्या लोरेस्तान प्रांतातील एका गरीब भटक्या कुटुंबात वाढला. लहानपणी तो मेंढ्या राखण्याचे काम करत असे. फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेइरानवंदला कुटुंबाचा पाठिंबा नव्हता. अखेर त्याने घर सोडले आणि राजधानी तेहरान गाठली. तेथे काही काळ त्याला बेघर अवस्थेत राहावे लागले. उदरनिर्वाहासाठी त्याने कार वॉशमध्ये काम केले, कपडे तयार करणाऱ्या कारखान्यात मजुरी केली आणि पिझ्झा दुकानातही नोकरी केली.
प्रतिकूल परिस्थिती असूनही त्याने फुटबॉलचे स्वप्न सोडले नाही. कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने इराणच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आणि पुढे आशियातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक म्हणून नाव कमावले. २०१८ आणि २०२२ विश्वचषकातही त्याने इराणचे प्रतिनिधित्व केले होते.
(हेही वाचा – ‘मातोश्री’च्या दारात ‘हिंदू गब्बर’ची एन्ट्री! खासदारांच्या बंडानंतर Nitesh Rane यांच्या समर्थकांची थेट बॅनरबाजी)
बेइरानवंदच्या नावावर दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. फुटबॉल सर्वाधिक लांब फेकण्याचा विक्रम त्याने ६१ मीटरपेक्षा जास्त अंतरावर चेंडू फेकून केला. तसेच सर्वाधिक लांब ड्रॉप-किकचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. गोलरक्षक असूनही त्याच्या या अनोख्या कौशल्यामुळे तो जगभर चर्चेत आला.
बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. अनेक वेळा निश्चित गोल वाटणारे प्रयत्न त्याने परतवून लावले. विशेषतः दुसऱ्या सत्रातील जवळून आलेला एक जोरदार फटका रोखताना त्याने दाखवलेली चपळाई सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. त्याच्या भक्कम कामगिरीमुळे बेल्जियमला गोल करता आला नाही आणि इराणने मौल्यवान गुण मिळवले. बेल्जिअम हा बलाढ्य संघ मानला जातो. आणि आक्रमक फुटबॉलसाठी हा संघ प्रसिद्ध आहे. असं असताना, बेहरावंदची भिंत संघातील आघाडीचे खेळाडू भेदू शकले नाहीत. इराणसाठी हा सामना एकप्रकारे विजय मानला जात आहे.
एकेकाळी फुटपाथवर झोपणारा आणि रोजच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणारा हा युवक आज विश्वचषकात आपल्या देशाचा तारणहार ठरत आहे. त्यामुळे अलीरेझा बेइरानवंदची कहाणी ही केवळ फुटबॉलपटूची नव्हे, तर जिद्द, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी गाथा बनली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

