- ऋजुता लुकतुके
Oil Import : अमेरिकेने इराणवरील तेल निर्बंधांना (US Sanctions Iran) तात्पुरती सवलत दिल्यानंतर भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांनी पुन्हा इराणी कच्च्या तेलाच्या खरेदीचा (Crude oil purchases) विचार सुरू केला आहे. जवळपास सात वर्षांनंतर भारतात इराणी तेल येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने ६० दिवसांसाठी विशेष परवानगी जारी केली आहे. या निर्णयामुळे इराणला कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि त्यांचे उपपदार्थ जागतिक बाजारात विकण्याची मुभा मिळाली आहे. यामध्ये बँकिंग, विमा, वाहतूक आणि डॉलरमधील व्यवहारांनाही परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भारतातील किमान तीन रिफायनरी इराणी तेल खरेदीसाठी उत्सुक आहेत. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्या केंद्र सरकारच्या सूचनांची आणि अमेरिकेकडून मिळणाऱ्या अधिक स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांची प्रतीक्षा करत आहेत. विशेषतः पेमेंट व्यवस्था, विमा आणि निर्बंधांशी संबंधित अटींबाबत अधिक स्पष्टता आवश्यक असल्याचे मानले जात आहे.
(हेही वाचा – Iran US peace deal : इराणच्या युद्धात शांतता हे मृगजळच)
भारताने २०१९ मध्ये अमेरिकन निर्बंधांनंतर इराणकडून तेल आयात (Oil Import) जवळपास पूर्णपणे बंद केली होती. त्यानंतर भारताने रशिया, इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांकडून तेल खरेदी वाढवली. मात्र इराणी तेलाची गुणवत्ता, कमी वाहतूक खर्च आणि अनुकूल व्यापारी अटी यामुळे भारतीय रिफायनऱ्यांमध्ये त्याला अजूनही मागणी असल्याचे मानले जाते.
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz) तणाव आणि जागतिक पुरवठ्यावरील दबावामुळे भारत ऊर्जा सुरक्षेबाबत अधिक सावध झाला आहे. अशा परिस्थितीत इराणी तेल पुन्हा उपलब्ध झाल्यास भारताला पुरवठ्याचे स्रोत अधिक विविध करण्यास मदत होऊ शकते. याआधी मार्च महिन्यात काही भारतीय कंपन्यांनी अमेरिकेच्या तात्पुरत्या सवलतीनंतर इराणी तेल खरेदीची चाचपणी केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीजने सुमारे ५० लाख बॅरल इराणी तेल खरेदी केल्याची माहितीही समोर आली होती, तर काही सरकारी कंपन्यांनी सावध भूमिका घेतली होती.
तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिका-इराण करार अंतिम झाला आणि निर्बंध सवलती दीर्घकालीन स्वरूपात कायम राहिल्या, तर इराण पुन्हा भारताच्या प्रमुख तेलपुरवठादारांपैकी एक बनू शकतो. त्यामुळे भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

