Urban Naxal : राजकीय पक्षांमध्‍ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी अराजकतेची चाहूल

122
  • रमेश शिंदे

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी (Rahul Gandhi) जी वक्तव्ये करत आहेत. त्यावरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा आऊट सोर्सिंग करत आहे’, असे वक्तव्य केले. हीच स्थिती सध्या शिवसेनेच्या ठाकरे गटाची झाली आहे. शिवसेनेत फूट पडताच या गटात सुषमा अंधारे यांनी संधी साधून पक्षात प्रवेश केला. कालपर्यंत हिंदुविरोधी विचार मांडणाऱ्या सुषमा अंधारे उद्धव ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून तेच विचार मांडत आहेत. अशा प्रकारे राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची (Urban Naxal) घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर यांनी रमेश शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

काँग्रेसचे नेते आणि इंदिरा गांधी यांची वामपंथीयांशी जवळीक  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्‍थानमध्‍ये केलेले ‘काँग्रेस अर्बन (शहरी) नक्षलवादाची विचारधारा आऊट सोर्सिंग करत आहे’ हे वक्‍तव्‍य केवळ निवडणूक प्रचारातील वक्‍तव्‍य आहे, असे आपण समजू नये. हा सगळ्‍यात महत्त्वाचा मुद्दा आहे; कारण अनेकदा असे वाटते की, निवडणूक काळातील प्रचारामध्‍ये वेगवेगळ्‍या गोष्टी केवळ प्रसिद्धीसाठी बोलल्‍या जातात; परंतु काँग्रेसचा इतिहास जरी आपण बघितला, तरीसुद्धा पूर्वीच्‍या इतिहासापासून काँग्रेसने डाव्‍या विचारसरणीशी नेहमीच मैत्री ठेवली आहे. नेहरूंच्‍या काळामध्‍ये ‘हिंदी-चीनी भाई भाई’ अशी १९६२ च्‍या भारत-चीन युद्धापर्यंत आपल्‍या देशात ते प्रचार करत होते. डाव्‍या विचारांचा चीन आपला मित्र आहे, तो कधीच भारतावर आक्रमण करणार नाही, असा समज त्‍यांनी करून ठेवला होता. प्रत्‍यक्षात चीनच्‍या माओ ने भारतावर आक्रमण करून त्‍यांना स्‍वप्‍नातून खाडकन जागे केले. त्‍यानंतर त्‍यांची सुपुत्री इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केल्‍यानंतर त्‍यांना पुढच्‍या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पराभव पत्‍करावा लागला.  पराभव पत्‍करल्‍यानंतर त्‍यांनी त्‍या काळामधल्‍या वामपंथीयांशी वैचारिक जवळीक साधली. वामपंथी विचारांना त्‍यांनी मान्‍यता दिली. आणीबाणीच्‍या काळात इंदिरा गांधी यांनी संविधानामध्‍ये बदल करून फार मोठी गोष्ट केली की, त्‍या काळात ४२वी सुधारणा म्‍हणून त्‍यांनी सेक्‍युलरवाद आणि समाजवाद भारतावर लादला. संविधानात साम्‍यवाद थेट आणता येत नव्‍हता म्‍हणून त्‍यांनी समाजवाद आणला. वास्‍तविक पाहता समाजवाद आणि साम्‍यवाद यांमध्‍ये खूप काही भेद नाहीच. आणीबाणीच्‍या काळानंतर पुन्‍हा विजय मिळविल्‍यानंतर इंदिरा गांधींनी (Indira Gandhi)  दिल्लीतील ‘जे.एन.यु.’ हे विद्यापीठ वामपंथीयांना आंदणच देऊन टाकले. त्‍यामुळे काँग्रेस आणि डाव्‍या विचारसरणीच्‍या पक्षांची, संघटनांची वैचारिक जवळीक ही स्‍पष्टपणे दिसतेच.

(हेही वाचा हलाल हा झिजिया करच, ‘हलाल’ला ‘झटका’ देण्याचे रमेश शिंदेंचे परिषदेत आवाहन)

नक्षलवाद हा आतंकवादच !

राजकीय पक्ष किंवा संघटना यांच्‍याशी वैचारीक जवळीक असणे हा भाग वेगळा आहे; परंतु राहुल गांधींच्‍या विदेशातील वक्‍तव्‍यांनंतर आता मा. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदी असताना गंभीर आरोप केला आहे की, काँग्रेसला (Congress) आता शहरी नक्षलवाद्यांकडे आऊटसोर्स केले आहे. हा खूप गंभीर विषय आहे;  कारण पंतप्रधानांनी असे म्‍हणणे याचा अर्थ काँग्रेसकडे आता स्‍वतःची वैचारिक क्षमता उरलेली नाही, काँग्रेस स्‍वतःच्‍या विचारांनी चालत नाही, काँग्रेस ज्‍या विचारांचा प्रचार पूर्वी करत होती, त्‍या विचारांना तिलांजली दिली आहे. आता त्‍यांचे विचार, धोरणे आउटसोर्स केली जात आहेत. त्‍यांचे हे विचार डाव्‍या विचारांच्‍या आधारे लोकशाही उलथवून टाकण्‍याचा प्रयत्न करणार्‍या  अर्बन नक्षलवाद्यांचे आहेत. हे जे कम्‍युनिस्‍ट विचार आहेत, ते देशातील लोकशाहीला घातक आणि हिंसेच्‍या मार्गाने चालणार्‍या शहरी नक्षलवाद्यांकडून घेतले जात आहेत. देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष आता अशा विचारांच्‍या, धोरणांच्‍या आधारे चालवला जात असेल, तर ही फार गंभीर गोष्ट आहे. हे डाव्‍या विचारांचे विचारवंत आतापर्यंत आपल्‍या विद्यापीठांमधून उग्रवाद, नक्षलवाद आणि आतंकवाद यांना नेहमी वेगळे दाखवण्‍याचा प्रयत्न करतात. त्‍यात जिहादी आतंकवादाला भयंकर दाखवले जाते आणि जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर असणार्‍या नक्षलवादाला सौम्‍य दाखवण्‍याचा प्रयत्न केला जातो. नक्षलवाद्यांचा लढा म्‍हणजे जनसामान्‍यांचा राजकीय व्‍यवस्‍थेच्‍या विरोधातील लढा आहे, तो आदिवासींचा लढा आहे, या दृष्टिकोनातून भूमिका मांडली जाते. उग्रवादाच्‍या संदर्भातदेखील अशाच प्रकारे समर्थन केले जाते. वास्‍तविक पहाता जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्‍या अमानवी कृत्‍यांमध्‍ये तसा काही भेद आढळत नाही. नक्षलवाद हा केवळ  जंगलामधील आदीवासींचा अन्‍यायाच्‍या विरोधातील लढा नाही, तर तो लढा एका विशिष्ट उद्देशाने उभा केलेला आहे, त्‍यांच्‍या लढ्याच्‍या मागे निश्‍चित वामपंथी विचारधारा आहे. त्‍यांच्‍या समर्थनार्थ अनेक डावे विचारवंत उभे आहेत, मग त्‍यांच्‍यामध्‍ये स्‍टॅन स्‍वामी असो, प्रा. साईबाबा, वरवरा राव असो, अ‍ॅड. अरुण परेरा असो, प्रा. आनंद तेलतुंबडे असोत किंवा नलिनी सुंदर, सुधा भारद्वाज यांच्‍यासारख्‍या विद्वान महिला असोत. त्‍यांची एक प्रचंड मोठी शक्‍ती आहे. गौतम नवलखापासून ते निखिल वागळे, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सिद्धार्थ वरदराजन, रवीश कुमार या सगळ्‍या डाव्‍या विचारांच्‍या पत्रकारांची विचारधारा नक्षलवाद्यांच्‍या समर्थनच करते. आज दुर्दैवाने आपल्‍याला म्‍हणावे लागते की, ’द हिंदू’ सारखे वर्तमानपत्र ज्‍या ’हिंदू’ शब्‍दाने चालते, तिथेही अर्बन नक्षलवादाचा वैचारिक प्रचार मोठ्या प्रमाणात दिसतो. हा प्रचार एक प्रकारे नक्षलवाद्यांच्‍या हत्‍याकांडांचे समर्थन करतो. अशा विचारांना काँग्रेससारख्‍या राजकीय पक्षाने त्‍यांना जवळीक करणे आणि त्‍यांची राजकीय भूमिका आपली वैचारिक भूमिका म्‍हणून मांडणे ही फार गंभीर गोष्ट आहे.

नक्षलवाद्यांकडून दहशतवाद्यांपेक्षा अधिक हत्‍या

जेव्‍हा एखादा राजकीय पक्ष सत्तेमध्‍ये येतो, तेव्‍हा त्‍या पक्षाकडे सर्व यंत्रणा आपोआपच येते, कायदा बनवण्‍याचा अधिकार येतो,  त्‍यांच्‍याकडे गृहविभाग असतो, त्‍यामुळे पोलिसांचे सर्व नियंत्रण त्‍यांच्‍याकडे असते. त्‍यामुळे कायदा-सुव्‍यवस्‍थेच्‍या नावे त्‍यांना हवे ते करता येते. आपल्‍याकडे केंद्र आणि राज्‍यांच्‍या दृष्टिकोनातून भिन्न संकल्‍पना आहेत. केंद्रातली सगळी यंत्रणा ही राज्‍यांमध्‍ये वापरली जात नाही, राज्‍यालाही स्‍वायत्तता आहे. अशा परिस्‍थितीमध्‍ये काँग्रेससारख्‍या पक्षाच्‍या नेत्‍यांनी जर या शहरी नक्षलवादाचे (Urban Naxal) सहाय्‍य घेतले असेल, त्‍याला आऊटसोर्स करून त्‍यांची विचारधारा घेतली असेल, तर ही फार गंभीर गोष्ट आहे; कारण नक्षलवाद या देशामध्‍ये नेमके काय करतो आहे, हे जनतेला माहिती आहे. या डाव्‍या विचारांच्‍या नक्षलवादाने हजारो जवानांची, हजारो सामान्‍य नागरिकांची हत्‍या केलेली आहे. आपण असे म्‍हणू शकतो की, २००९ ते २०१९ या दहा वर्षांचा जर आपण कालावधी बघितला, तर नक्षलवाद्यांनी केलेल्‍या हत्‍या या २,१९१ आहेत आणि जिहादी आतंकवाद्यांनी त्‍या काळामध्‍ये केलेल्‍या हत्‍या या ३९९ आहेत. याचा अर्थ जिहादी आतंकवाद्यांच्‍या तुलनेत नक्षलवाद्यांनी साधारणपणे पाचपट जास्‍त हत्‍या केलेल्‍या आहेत. अशाच प्रकारे जवानांच्‍या तसेच पोलिसांच्‍या हत्‍यांच्‍या संदर्भात पाहिल्‍यास नक्षलवाद्यांनी केलेल्‍या पोलीस/जवानांच्‍या हत्‍या १३४२ आहेत, तर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्‍या हत्‍या ६७५, म्‍हणजेच नक्षलवाद्यांनी केलेल्‍या हत्‍या तुलनेत दुप्‍पट आहेत; परंतु या भयंकर नक्षलवादाची जाणीव आपल्‍याकडे हे पुरोगामी डावे पत्रकार करून देत नाहीत. एवढ्या प्रचंड प्रमाणात हत्‍या केल्‍या जात असताना हे डावे पत्रकार नक्षलवादाला स्‍वातंत्र्याचा लढा आहे, हा वनातील दीन-दलितांचा लढा आहे, हा अन्‍यायी व्‍यवस्‍थेच्‍या विरुद्ध लढा आहे, असे सांगत रहातात; परंतु ही व्‍यवस्‍था कोणी निर्माण केली, तर ती याच देशातल्‍या लोकांनी निर्माण केली. या देशातल्‍या लोकांनी ती स्‍वीकारलेली आहे. काश्‍मीरमधून निरपराध हिंदूंना अत्‍याचार करून बाहेर काढण्‍यात आले; मात्र त्‍यांनी या अन्‍यायाच्‍या विरोधात लढा उभारून हातात बंदुका घेतल्‍या नाहीत, मग नक्षलवादी न्‍याय मागण्‍यासाठी हातात बंदुका घेऊन आतंकवादी कारवाया का करतात? आणि त्‍यांचे समर्थक पुरोगामी पत्रकार किंवा अन्‍य सेक्‍युलरवादी मंडळी बनत आहेत, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा परिस्‍थितीत काँग्रेस पक्षाच्‍या माध्‍यमातून राजकीय स्‍तरावर हा अर्बन नक्षलवादाचा विचार स्‍वीकारला जाऊ लागला, तर आपल्‍याला म्‍हणावे लागेल की, हा नक्षलवाद जो आतापर्यंत दंडकारण्‍य, भामरागड, बस्‍तर किंवा गडचिरोलीतपर्यंत मर्यादित होता, तो नक्षलवाद आपल्‍या अतिशय जवळ यायला वेळ लागणार नाही.

(हेही वाचा Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय?)

राष्ट्र तोडण्‍याची राहुल गांधींची विचारधारा

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) इंग्‍लंडच्‍या दौर्‍यामध्‍ये भाषण केले, ते भाषण करत असताना त्‍यांनी सांगितले की, ‘भारत हे राष्ट्र नाही, तर भारत हा राज्‍यांचा संघ आहे’; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्‍पना मांडली, त्‍यात राज्‍यांचा संघ म्‍हटलेले नाही, तर संघीय दृष्टिकोनातून राज्‍ये म्‍हटले आहे. त्‍यामुळे राज्‍यांना स्‍वायत्तता देत असताना राष्ट्र ही संकल्‍पना त्‍यांनी मान्‍य केलेली होती. म्‍हणूनच त्‍यांनी फाळणीच्‍या वेळी सांगितले होते की, आपण फाळणी तेव्‍हाच स्‍वीकारू, ज्‍यावेळी या देशातला सगळा मुसलमान पाकिस्‍तानमध्‍ये जायला पाहिजे आणि तेथील जो हिंदू आहे, तो हिंदू समाज पूर्णपणे भारतात आला पाहिजे. आता जी संकल्‍पना राहुल गांधी मांडत आहेत, ती डाव्‍या विचारसरणीच्‍या आधारे असून, त्‍यांची मनोभूमिका अशी बनलेली आहे की, ‘ब्रिटिशांनी आजच्‍या भारताची निर्मिती केली. राष्ट्र ही संकल्‍पना भारतामध्‍ये ब्रिटिशांनी आणली.’ मला असे वाटते की एवढ्या मोठ्या नेत्‍याने एवढ्या मूर्खपणाच्‍या गोष्टी कराव्‍यात, याच्‍यापेक्षा काही मोठे दुर्दैव नाही; कारण आपल्‍या ऋग्‍वेद, अथर्ववेद आदी वेदांमध्‍येच ‘राष्ट्रा’चा उल्लेख आहे. राष्ट्राची प्रार्थना देखील वेदांत आहे. म्‍हणजे वैदिक काळापासून जर आपला इतिहास बघितला, तर त्‍या काळामध्‍ये राष्ट्र ही संकल्‍पना आपण मांडलेली आहे. आजही स्‍वतंत्र भारतात राष्ट्रगान, राष्ट्रभाषा, राष्ट्रगीत हे शब्‍दही आपल्‍या प्राचीन राष्‍ट्र संकल्‍पनेतूनच आलेले आहे. आर्य चाणक्‍याने देखील राष्ट्र निर्माण करायचे आहे, असे म्‍हटले आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍य हे या राष्ट्राचेच वेगळे स्‍वरूप मांडले; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हिंदवी स्‍वराज्‍य स्‍थापन केल्‍यावर त्‍यांनी सर्वात महत्‍वाची गोष्ट केली, ती म्‍हणजे, प्रथम आपली कालगणना चालू केली. शब्‍द व्‍यवहार कोष निर्माण केला. भाषेचे वेगवेगळे अष्टप्रधान मंत्रिमंडळ निर्माण केले. भारतातील प्राचीन काळापासूनच्‍या ह्या सगळ्‍या गोष्टी बघितल्‍या तर राहुल गांधींनी आज पोरकटपणे इंग्‍लंडसारख्‍या देशात जाऊन सांगणे कि, भारताला राष्ट्र ही संकल्‍पना ब्रिटिशांनी दिली’. अर्थात यातून त्‍यांची बौद्धिक क्षमता लक्षात येते. त्‍यावेळी ते असेही म्‍हणतात की, चीन हे राष्ट्र आहे, कारण का तर चीनमध्‍ये ‘येलो रिव्‍हर’ संपूर्ण राष्ट्राला व्‍यापते, म्‍हणजे आमच्‍याकडे गंगा नदी आहे, याचा त्‍यांना विसरच पडलेला आहे आणि गंगा नदी फक्‍त भारताला नाही, तर बांगलादेशाला सुद्धा व्‍यापते. त्‍यामुळे ह्या दृष्टीकोनातून जर लक्षात घेतले तर त्‍यांचे हे केवळ मुर्खपणाचे वक्‍तव्‍य आहे, असे म्‍हणून चालणार नाही. ही केवळ त्‍यांच्‍या डोक्‍यातून बाहेर पडलेली एक सामान्‍य संकल्‍पना नाही, तर हे काही विशिष्ट उद्देशाने केलेले वक्‍तव्‍य आहे. अर्बन नक्षलवाद्यांकडून ‘जेएनयु’मध्‍ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्‍या घोषणांद्वारे हीच संकल्‍पना मांडण्‍यात आली होती. याचा डाव्‍या विचारांच्‍या सोविएत युनियनशी संबंध आहे. पूर्वी कम्‍युनिस्‍ट रशियालाच सोविएत युनियन म्‍हटले जात होते. त्‍या वेळी या सोविएत संघामध्‍ये १५ राज्‍ये समाविष्ट होती आणि ह्या १५ राज्‍यांतील बहुतांश राज्‍ये मुसलमान होती. पूर्वीच्‍या काळामध्‍ये कम्‍युनिस्‍ट रशियाची विस्‍तारवादी सेना ज्‍या ज्‍या भागांमध्‍ये गेली, त्‍या सगळ्‍या भूभागांवर त्‍यांनी ताबा मिळवला. अगदी अफगाणिस्‍तानपर्यंत त्‍यांची सेना आली होती. त्‍यांनी कम्‍युनिस्‍ट ताकदीच्‍या आधारे या राज्‍यांना ताब्‍यात ठेवले; मात्र त्‍या ठिकाणी जी मूलभूत परंपरा होती, मग ती ताजिकीस्‍थान, अझरबैजान, किरगिझीस्‍थान, तुर्कमेनीस्‍थान असेल किंवा कझाकिस्‍थान असेल, त्‍यांची संस्‍कृती आणि रशियाची संस्‍कृती एक नव्‍हतीच, म्‍हणून त्‍यांनी कम्‍युनिस्‍ट राजसत्ता कमकुवत झाल्‍यावर रशियाचे प्रमुख गोर्बाचेवच्‍या उत्तरकाळामध्‍ये बंड करून आम्‍हाला स्‍वतंत्र राष्ट्रे हवी आहेत, अशी संकल्‍पना मांडली. त्‍यांना त्‍या काळात स्‍वातंत्र्य मिळाले. वामपंथी इतिहासातील या घटनांच्‍या संदर्भात राहुल गांधींच्‍या वक्‍तव्‍याचा संबंध जर आपण घेतला, तर तो अतिशय गंभीर आहे. राहुल गांधी यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार भारत हे राष्ट्र नाही, तर केवळ राज्‍यांचा संघ आहे, असे म्‍हटले तर, उद्या खलिस्‍तानवादी पंजाबचा तुकडा वेगळा करून मागतील, तामिळनाडूतील द्रविडीयन विचारांचे नेते वेगळा देश मागू शकतात. भारताचे शेकडो तुकडे करण्‍याची ही संकल्‍पना आहे. भारताचे तुकडे करण्‍याची ही संकल्‍पना एकीकडे राहुल गांधी या माध्‍यमातून विदेशात मांडत आहेत. प्रत्‍यक्षात राष्ट्र म्‍हणून आपले अस्‍तित्‍व प्राचीनकाळापासूनच आहे. अगदी एक लहानसे उदाहरण घ्‍या, आपल्‍याकडे जी मकर संक्रांत आहे, ही मकर संक्रांत काश्‍मीरमध्‍ये उत्तरायण म्‍हणून साजरी होते, पंजाबमध्‍ये लोहडी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, आसाम राज्‍यात माघी बिहु, मध्‍य भारतात सुकरात, संक्रांती आणि केरळ राज्‍यात पोंगल म्‍हणून साजरी केली जाते. याचाच अर्थ असा होतो की, एकच मकर संक्रांत सण भारताच्‍या विविध राज्‍यांमध्‍ये विविध नावांनी, विविध प्रकारे साजरी केली जाते. संपूर्ण भारतात सांस्‍कृतिकदृष्ट्‌या ऐक्‍य असल्‍याशिवाय हे कसे शक्‍य आहे ? म्‍हणून जरी भारतात नावे वेगळी असली, भाषा वेगळी असली, तरी आमचे राष्ट्र एकच आहे, ही मूळ संकल्‍पना होती आणि राहुल गांधी ही मूळ संकल्‍पनाच तोडायला निघाले आहेत आणि याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर शहरी नक्षलवादाचा विचार आंदण घेण्‍याचा विचार मांडला आहे.

शहरी नक्षलवाद्यांचा विद्यापीठांतील प्रभाव आणि विद्यार्थ्‍यांचे ब्रेनवॉश  

शहरी नक्षलवाद या आजच्‍या संकल्‍पनेच्‍या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर, त्‍यामागील मूळ संकल्‍पना ही नक्षलवादाचीच आहे. जसे आपण म्‍हटले की 1967 मध्‍ये डाव्‍या विचारांचे नेते कनू संन्‍याल, चारू मुजुमदार यांनी नक्षलबाडी या गावामधून हिंसक नक्षलवादाला प्रारंभ केला. त्‍यानंतर तेरा वर्षांनी १९८०च्‍या दशकामध्‍ये शहरी नक्षलवादाला प्रारंभ करण्‍यात आला; कारण नक्षलवाद्यांच्‍या हिंसक कारवायांना वैचारिक अधिष्ठान प्राप्‍त करून देणे आणि त्‍यासाठी शहरातील युवकांचे रिक्रूटमेंट करणे आवश्‍यक होते. डाव्‍या विचारसरणीचे लोक हे तोपर्यंत वेगवेगळ्‍या विद्यापीठांमध्‍ये प्राध्‍यापक म्‍हणून प्रस्‍थापित झालेले होते, ते इतिहासकार, पत्रकार बनले होते, ते स्‍वतःला मानवतावादी कार्यकर्ते आहोत, असे म्‍हणू लागले होते. अशा माध्‍यमांतून ते नक्षलवादाची भीषणता, अमानुषता लपवण्‍यासाठी त्‍याला तात्त्विक मुलामा देण्‍याचे कार्य करत होते. हे शहरी नक्षलवादी वेगवेगळ्‍या युनिव्‍हर्सिटीमध्‍ये जाऊन तेथे वैचारिक प्रचार करायला लागले. भारतातील वर्गसंघर्ष, वर्णसंघर्ष, स्त्री-मुक्‍ती अशा वेगवेगळ्‍या विषयांवर आंदोलने करून विद्यापीठांमधून त्‍यांनी विद्यार्थ्‍यांचे ब्रेनवॉशिंग करायला सुरुवात केली. याचे सगळ्‍यात प्रसिद्ध उदाहरण म्‍हणजे, जेएनयूमध्‍ये ’भारत तेरे तुकडे होंगे’, ‘अफझल हम शर्मिंदा है, तेरे कातील जिंदा है’, च्‍या देशविरोधी आणि आतंकवाद समर्थक घोषणा दिल्‍या गेल्‍या. या घोषणा भारताच्‍या राजधानीमध्‍ये दिल्‍या गेल्‍या, घोषणा देणारे विद्यार्थी भारतीयच होते. यातून हे अर्बन नक्षलवादी कशा प्रकारे ब्रेनवॉशिंग करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. भारताची भावी पिढीच विद्यापीठात भारताचे तुकडे तुकडे करायचे स्‍वप्‍न बघत असेल, तर त्‍याला हे विचार त्‍यांच्‍या डोक्‍यात भिनवणारे शहरी नक्षलवादीच कारणीभूत आहेत. याचा परीणाम म्‍हणजे, हेम मिश्रा नावाचा जेएनयूचा विद्यार्थी हा नक्षलवाद्यांसोबत सापडला. त्‍याचप्रमाणे आज कबीर कला मंच नावाची संघटना मुंबई-पुण्‍यामध्‍ये काम करते. मुंबईमधल्‍या टाटा इन्‍स्‍टिट्यूट ऑफ सोशल सायन्‍सचे काही विद्यार्थी एकत्र येऊन पुण्‍यामध्‍ये कबीर कला मंच चालू करतात. कबीर कला मंचमध्‍ये संत कबीरांचे नाव सांगितले जातात, डफली वाजवून गाणी म्‍हटली जातात, भजने म्‍हटली जातात; परंतु ह्या भजनांच्‍या मागून हळूहळू विद्रोही विचार येतो आणि मग देशद्रोही विचार येतो.

(हेही वाचा दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आदींच्या हत्यांचा तपास केवळ राजकीय हेतूने – डॉ. अमित थडानी)

कबीर कला मंच शहरी नक्षलवादाचे प्रमुख व्‍यासपीठ

ज्‍याचा परिणाम म्‍हणजे आज पुण्‍यासारख्‍या शहरामधून दोन विद्यार्थी गडचिरोलीमध्‍ये खांद्यावरती बंदुका घेऊन फिरत आहेत, यावरून हा राष्ट्रविरोधी विचार, हा नक्षलवाद आपल्‍या अतिशय जवळ आलेला आहे. ह्या अर्बन नक्षलवादाचे स्‍वरूप जे आहे, ते आज सामान्‍यांपर्यंत पोहोचले नाही. जसे जिहादी भरती करतात, तशी नक्षलवादामध्‍ये भरती केली जाते. या विषयावर महाराष्ट्रामध्‍ये आर.आर. पाटील गृहमंत्री असताना गुप्तचर विभागाचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता. ज्‍यामध्‍ये महाराष्ट्रात काम करणार्‍या ५० सामाजिक संघटना नक्षलवाद्यांचे समर्थन करायचे काम करतात किंवा नक्षलवाद्यांना साहाय्‍य करतात, असे म्‍हटले होते. हा काही आताच रिपोर्ट नाही, हा २०११ चा रिपोर्ट आहे, म्‍हणजे जवळपास बारा वर्षांपूर्वीचा रिपोर्ट आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी ५० संघटनांची नावे दिलेली आहेत. नक्षलवाद महाराष्ट्रातल्‍या वेगवेगळ्‍या भागांमध्‍ये पोहोचला आहे, हे त्‍या काळामध्‍ये उघड झाले होते. आम्‍ही हल्लीच भीमाशंकरला गेलो होतो. त्‍या ठिकाणी आमची काही हिंदुत्‍ववादी कार्यकर्त्‍यांची बैठक होती. तिथे काही हिंदुत्‍ववादी संघटनांच्‍या प्रमुखांनी सांगितले की, स्‍थानिक पोलीस अधिकार्‍यांचे असे म्‍हणणे आहे की, जो गडचिरोलीमधला नक्षलवाद आहे, त्‍याचा प्रचार सध्‍या भीमाशंकरच्‍या जंगलांमध्‍ये चालू आहे आणि येत्‍या पाच वर्षांत तुम्‍हाला भीमाशंकरला यायचे असेल, तर नक्षलवाद्यांची परवानगी घेऊन यावे लागेल. म्‍हणजे आपल्‍या एका तीर्थक्षेत्राच्‍या जवळ जर नक्षलवादाचा प्रचार चालू आहे. काही दिवसांपूर्वी मी सांगली जिल्‍ह्यातील विटा या भागामध्‍ये गेलो असताना त्‍या ठिकाणी स्‍थानिकांनी मला आश्‍चर्यजनक अशी माहिती दिली की, आमच्‍या गावातून सात जण हे कबीर कला मंचमध्‍ये सहभागी झाले आणि आज त्‍यांचा ठावठिकाणा नाही. बहुतांश ते नक्षलवादी बनण्‍यासाठी बाहेर पडले आहेत. कबीर कला मंचचे सगळे सदस्‍य हे  उच्‍चशिक्षित आहेत. ते या सगळ्‍या व्‍यवस्‍थेचा कणा म्‍हणून काम करत आहेत. या कबीर कला मंचच्‍या सदस्‍यांचे शिबिर कोणी घेतले, तर मिलिंद तेलतुंबडे आणि अंजला सोनटक्‍के यांनी. भारत सरकारने मिलिंद तेलतुंबडे याला भारतातला सगळ्‍यात खतरनाक नक्षलवादी म्‍हणून घोषित केले होते आणि त्‍याचे हल्लीच एन्‍काऊंटर झाले. ज्‍या एन्‍काऊंटरमध्‍ये २६ नक्षलवाद्यांबरोबर मिलिंद तेलतुंबडेला देखील महाराष्ट्र पोलिसांनी संपवले. मिलिंद तेलतुंबडेचा सख्‍खा भाऊ आनंद तेलतुंबडे हा कोरेगाव-भीमाच्‍या दंगलीमध्‍ये आरोपी आहे, आणि तो गोवा आयआयटीचा प्रोफेसर आहे, म्‍हणजे इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारख्‍या ठिकाणी जर अशा विचारांचे लोक असतील, तर नेमके काय होईल? सुधा भारद्वाज जिला पंतप्रधानांची हत्‍या करण्‍याच्‍या कटाच्‍या प्रकरणामध्‍ये आरोपी बनवले. ती सुधा भारद्वाज कानपूर आयआयटीची प्रथम आलेली विद्यार्थिनी होती; परंतु अशी  विद्यार्थिनी जर या प्रकारची हिंसक विचारधारा पसरवण्‍याचे काम करत असेल, तर नेमके काय होईल ?  याच दृष्टिकोनातून डाव्‍या विचारांचे पत्रकार असोत, संपादक असोत की आणखी कोणी असोत; परंतु ह्या सगळ्‍यांचा चेहरा वेगळा आहे, कुणाचा मानवतावादी, कुणाचा पर्यावरणवादी, कुणी पत्रकारितेमध्‍ये आहे; परंतु उद्देश मात्र सगळ्‍यांचा एकच आहे, तो म्‍हणजे नक्षलवाद्यांचे समर्थन, नक्षलवाद्यांना पाठिंबा. यासंबंधीचा अहवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्‍या काळांमध्‍ये बनवला असेल तर आपण ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.

नक्षलवादाशी संबंध असलेली अंनिस सरकारची मदतनीस  

काँग्रेस सरकारच्‍या काळात जो शहरी नक्षलवादाचा अहवाल प्रकाशित झाला, त्‍यामध्‍ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव होते. ही समिती महाराष्ट्र शासनाच्‍या वतीने शाळा-महाविद्यालयांत वैज्ञानिक जाणिवांचा प्रचार करणारे कार्यक्रम घेते. म्‍हणजे ज्‍या समितीवरती मुळात नक्षलवादाशी संबंध असल्‍याचा आरोप आहे, त्‍यांचा नरेश बनसोड नावाचा कार्यकर्ता जो गोंदिया जिल्‍ह्याचा प्रमुख होता, हा नक्षलवाद्यांबरोबर कारवाईमध्‍ये सापडलेला आहे. अशा संघटनेला जर महाराष्ट्र सरकार सध्‍या वैज्ञानिक जाणीवा प्रकल्‍पमध्‍ये सहभागी बनवून घेत असेल आणि त्‍यांच्‍याबरोबर काम करत असेल, तर हे गंभीर आहे. हल्लीच दाभोळकरांचा स्‍मृती दिवस झाला आणि ह्या स्‍मृती दिनाच्‍या दिवशी त्‍यांनी असे घोषित केले की, आम्‍ही महाराष्ट्रातल्‍या संपूर्ण शाळांमध्‍ये एक जागरण अभियान करणार आहोत. या अभियानात अंनिसची मदत महाराष्ट्र शासन करत असेल, तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. अंनिसने बनवलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा महाराष्ट्रामध्‍ये लागू आहे. याला हिंदुत्‍ववाद्यांनी प्रचंड प्रमाणामध्‍ये विरोध केला होता. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या शहरी नक्षलवाद्यांचे साहाय्‍य हे हिंदुत्‍ववाद्यांना देखील घ्‍यावसे वाटते हीच सगळ्‍यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. म्‍हणून या दृष्टीने देखील आपण गांभीर्याने बघायला हवे. नेमके कोणाचे साहाय्‍य आपण घेत आहोत, त्‍यांची नेमकी कोणती विचारधारा आहे, याचा विचार सरकारने करायला पाहिजे. त्‍यांचा सामाजिक मुखवटा वेगळा आहे आणि तो जास्‍त प्रभावी आहे; परंतु ह्या मुखवट्याच्‍या मागचे खरे स्‍वरूप, खरे चेहरे शोधणे हे सरकारचे काम आहे. आज गौतम नवलखा वगैरे या सगळ्‍यांना देवेंद्र फडणवीस यांच्‍या सरकारने कोरेगाव-भीमा दंगलीच्‍या मागचे नक्षलवादी चेहरे किंवा अर्बन नक्षलवादी म्‍हणून उघड केले असेल, तर माझी अपेक्षा आहे की, सरकार आपलेच आहे, तर मग अशा वेळी त्‍यांनी ह्या सगळ्‍या बाकीच्‍या ५० संघटना कोण आहेत की ज्‍यांचा नक्षलवादाशी संबंध आहे, त्‍या लोकांना कळू द्या. त्‍या पन्‍नास संघटनांचे नक्षलवाद्यांशी नेमके संबंध काय, हेही लोकांना कळू द्या, ही गोष्ट आज सरकारने जाहीर करणे फार महत्‍वाचे आहे.

(हेही वाचा Temple : देशभरातील साडेचार लाख मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात लढा उभारावा – सुनील घनवट)

सुषमा अंधारे हिंदुत्‍ववादी पक्षामध्‍ये अराजक निर्माण करणार्‍या संधीसाधू?

शहरी नक्षलवाद्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत, हे नक्षलवादी वेगवेगळ्‍या चेहर्‍यांनी संधीचा फायदा उचलतात. कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणामध्‍ये त्‍या काळामध्‍ये पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्‍या विरोधात गुन्‍हा जो नोंदवला, तो गुन्‍हा नोंदवणार्‍या अनिता साळवे आणि अंजना गायकवाड या दोघी होत्‍या. त्‍यानंतर भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्‍याच विरोधात आणखी एक गुन्‍हा ३ जानेवारीला नोंदवला गेला आणि हा गुन्‍हा नोंदवणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव सुषमा दगडू अंधारे (Sushama अंधारे) होते. त्‍यांनीदेखील त्‍या काळामध्‍ये सांगितले की, हिंदुत्‍ववाद्यांनीच ही दंगल भडकवली आहे. या दंगलीमागे संभाजीराव भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे आहेत. प्रत्‍यक्षात या विषयीचे न्‍यायालयीन कमिशन नेमले गेले आणि या न्‍यायालयीन कमिशनच्‍या पुढे स्‍पष्ट झाले की, त्‍या दिवशी संभाजीराव भिडे गुरुजी हे पुण्‍यात नव्‍हतेच, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना मातृशोक झाला असल्‍याने तिथे सांगलीत ईश्‍वरपूर येथे उपस्‍थित होते. याच्‍या बातम्‍या छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्‍या होत्‍या. ही माहिती असताना देखील अशा प्रकारची खोटी तक्रार करून हिंदुत्‍ववाद्यांना आतंकवादी, दंगलखोर असे दाखवून हिंदुत्‍ववादी आणि दलित समाज यांच्‍यामध्‍ये दरी निर्माण करण्‍याचे काम त्‍या काळामध्‍ये या लोकांनी केले. त्‍यामध्‍ये सुषमा अंधारे हे प्रथम नाव आहे. अशी तक्रार नोंदवणारी सुषमा अंधारे आज शिवसेनेसारख्‍या हिंदुत्‍ववादी पक्षात फूट पडल्‍यावर लगेचच प्रवेश करते. राजकीय अराजकाच्‍या काळात शहरी नक्षलवाद्यांनी घेतलेली ही संधी आहे. राजकीय पक्षातले नेते जास्‍त सूज्ञ असतात. मला असे वाटते की, या दृष्टिकोनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निश्‍चितपणे अधिक माहिती असणार ! परंतु आज राजकीय पक्षांमध्‍ये वैचारिक भेदच राहिलेला नाही; कारण हिंदुत्‍ववाद्यांबरोबर सेक्‍युलरवादी मिळून सरकार बनवत आहेत, सेक्‍युलरवाद्यांबरोबर वामपंथी घुसखोरी करत आहेत. शहरी नक्षलवाद्यांना ही चांगली संधी आहे. जर हिंदुत्‍वाला विरोध करणार्‍या व्‍यक्‍ती हिंदुत्‍ववादी  पक्षांमध्‍ये येऊन काम करायला प्रारंभ करत असतील, तर त्‍या आपल्‍या हिंदुत्‍ववादी विचारधारेचा उपयोग स्‍वार्थासाठी करून घेणार आहेत आणि भविष्‍यामध्‍ये अशी व्‍यक्‍ती हिंदुत्‍ववादी विचारांना फार घातक असणार आहे. आज सुषमा अंधारे सगळ्‍या व्‍यासपीठांवरून हिंदुत्‍वाची भूमिका मांडतात, शिवसेनेची भूमिका मांडतात. ज्‍या व्‍यक्‍तीची हिंदुत्‍वविरोधी विचारांची पार्श्‍वभूमी आहे, अशा व्‍यक्‍तीकडे हिंदुत्‍वाची भूमिका मांडण्‍याचा खरेच अधिकार आहे का? नैतिकता म्‍हणून त्‍यांनी याकडे पाहायला हवे. म्‍हणून मला असे वाटते की या दृष्टिकोनातून राजकीय पक्षाने देखील आत्‍मपरीक्षण केले पाहिजे. राजकीय पक्षांमध्‍ये भेद होत असतात, काही वेळा पक्षाचे कार्यकर्ते बाजूला जाऊन तुकडे होतात, मात्र तेच परत आल्‍यावर पक्ष पुन्‍हा जोडलेही जातात; परंतु एकदा जर हिंदुत्‍वाचा विचार गमावला, तर मग पुन्‍हा आपण त्‍या विचारांच्‍या आधारे एकत्र येऊ शकत नाही.

नक्षलवाद हा अराजकाच्‍याच माध्‍यमातून फोफावू शकतो. काल-परवापर्यंत सुषमा अंधारे हिंदू धर्मातील भेद, वर्णवर्चस्‍ववाद, ब्राह्मण्‍यवाद, देवतांचे अनावश्‍यक अनुष्ठान, अंधश्रद्धा अशा अनेक गोष्टी मांडत होत्‍या. आज त्‍याच सुषमा अंधारे यांनी त्‍यांच्‍या या मूळ विचारांना तिलांजली दिली आहे की, त्‍यांना त्‍यांची विचारधारा हिंदुत्‍ववादी पक्षामध्‍ये घुसवून हिंदुत्‍ववाद्यांमध्‍ये अराजक निर्माण करावयाचे आहे, याचा निश्‍चितपणे अभ्‍यास करायला हवा. माझ्‍यासारख्‍या सामान्‍य कार्यकर्त्‍यांपेक्षा आज राजकीय पक्षांचे नेते फार मोठे आहेत, त्‍यांनीच याचा विचार करायला हवा की, आपण आपल्‍या पक्षांमध्‍ये ज्‍यांना घेत आहोत, ते केवळ संधी म्‍हणून परिस्‍थितीचा लाभ घेण्‍यासाठी आपल्‍याकडे येत आहेत की, ते काही विशिष्ट उद्देश ठेवून आपल्‍याकडे येत आहेत. ज्‍यावेळी देशामध्‍ये अराजक माजलेले असते, त्‍याचवेळी देशविरोधी किंवा राष्ट्रविघातक शक्‍ती देशात प्रवेश करत असतात. त्‍यामुळे जशी राष्ट्राची सीमा सुरक्षित असणे गरजेचे आहे, तसेच पक्षांच्‍या सीमाही सुरक्षित असायला हव्‍यात आणि त्‍या दृष्टीनेही जागरूकता निश्‍चित असायला हवीव्‍यात. अन्‍यथा शिवसेनेसारख्‍या पक्षात दुफळी निर्माण होताच सुषमा अंधारे यांच्‍या सारख्‍या व्‍यक्‍ती प्रवेश करून अराजक माजवू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.