आरोग्य आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या आठ प्रस्तावांना महापालिका प्रशासकांची मान्यता

50

स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विचारात न घेतलेले प्रस्ताव आता प्रशासकाच्या अखत्यारितच मंजूर केले जातील असे स्पष्ट असतानाच आता प्रशासक असलेल्या इक्बालसिंह चहल यांनी बुधवारी आणखी आठ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. आरोग्य विभागाचे तीन आणि पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या चार प्रस्तावांना प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर केलेले नालेसफाईसह चर बुजवण्याच्या कामांचे प्रस्ताव नियमबाह्य मंजूर केल्याची टिका होत असताना प्रशासकांनी स्थायी समितीने राखून ठेवलेल्या १२३ पैंकी ८ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रशासकांनी आता खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : मनमानी करणाऱ्या बेस्टच्या अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम )

सात प्रस्तावांना मंजुरी

महापालिकेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या ३८० प्रस्तावांपैंकी १२३ प्रस्तावांवर समितीने निर्णय घेतला नाही. त्यामुळे या प्रलंबित प्रस्तावांवर प्रशासक म्हणून इक्बालसिंह चहल हे निर्णय घेणार असे असतानाही त्यांनी २५ दिवसांनंतर नालेसफाई व चर बुजवण्याच्या कामांचे दहा प्रस्तावांना मंजुरी दिली. मात्र, हे प्रस्ताव मंजूर करताना पटलावरील प्रस्ताव म्हणून विचारात न घेता खात्यांकडून स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करत प्रशासकांनी त्यांना मंजुरी दिली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या पटलावरील त्या दहा प्रस्तावांवर निर्णय न घेता स्वतंत्रपणे हे प्रस्ताव सादर केल्याने प्रशासनाने मंजूर केलेले ते दहाही प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने दिले होते.

परंतु बुधवारी प्रशासकांनी आठ प्रस्तावांना मंजुरी देताना पटलावरीलच प्रस्ताव विचारात घेतले. यासाठी प्रत्येक खात्यांकडून प्रस्ताव सादर करण्यात आले नाही. यामध्ये आरोग्य विभागाचे सर्जिकल ड्रेसिंग,हँड सॅनिटायझर व लिक्विड ऑक्सिजन आदी तीन प्रस्तावांचा समावेश आहे. तर उर्वरीत पाच प्रस्ताव हे मालाडमधील व अंधेरीमधील पर्जन्य जलवाहिनी विभागांच्या कामांचे आहेत. प्रशासकांच्या मान्यतेनंतर त्वरीत कार्यादेश बजावून साहित्यांचा पुरवठा तसेच प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

प्रशासकांनी मंजूर केलेले प्रस्ताव

  • सन २०२१-२२च्या औषध अनुसूची क्रमांक ७ अन्वये सर्व महापालिका रुग्णालये, प्रसुतीगृहे, दवाखाने इत्यादींना सर्जिकल ड्रेसिंगचा पुरवठा करणे
  • कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या वापरासाठी हँड सॅनिटायझरचा पुरवठा
  • महापालिका रुग्णालयासंह कोविड सेंटरमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा
  • मालाड/ पश्चिम मधील नेव्ही नगर परिसरातील पूरपरिस्थिती नियंत्रणाकरता सोमवार बाजार आणि चौक्सी हॉस्पिटल, मार्वे रोड जवळील पर्जन्य जलवाहिन्यांच्या सुधारणा
  • मालाड भंडारवाडामधील विविध ठिकाणच्या पर्जन्य जलवाहिनी सुधारणा आणि बांधकामांची कामे
  • अंधेरी पश्चिम मधील ऑल इंडिया सेल्फ गव्हर्नमेंट पासून रोडच्या पश्चिम बाजूस सी.डी. बर्फीवाला रोडपर्यंत तसेच संतोषी माता मंदिर पासून एन.एस.फडके रोड पर्यंतच्या लेनवरील रस्त्यालगतची पूरपरिस्थिती नियंत्रणाकरता पर्जन्य जलवाहिन्या तथा कल्व्हर्टचे बांधकाम
  • मालाडमधील महर्षी वाल्मिकी मंदिर येथील विविध ठिकाणच्या पर्जन्यजलवाहिन्यांची सुधारणा

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.