Tuljapur : तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन व्यवस्थेत मोठे बदल; काय आहेत नवीन नियम, घ्या जाणून

तुळजापूर हे प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असून, तिथे भाविकांची वाहती गर्दी असते

125
तुळजाभवानी मंदिराचे दर्शन आणि प्रवेश व्यवस्थापन
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी नवीन नियम लागू झाले आहेत.

Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने (Tuljabhavani Mandir) भाविकांच्या दर्शनाचा अनुभव अधिक सुलभ आणि शिस्तबद्ध करण्यासाठी दर्शन व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, देणगी दर्शन आणि धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांग व्यवस्थेत बदल करण्यात आले असून, दोन्ही प्रकारच्या भाविकांना आता एकाच ठिकाणाहून प्रवेश जाईल.

मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ५०० रुपयांच्या देणगी दर्शन पासधारक तसेच रेफरल देणगी दर्शन पासधारक भाविकांना नियोजित मार्गाने प्रवेश दिला जाईल. त्यानंतर कल्लोळ तीर्थ परिसरातून टोळभैरव पायऱ्यांच्या मार्गे त्यांना दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावर पोहोचवण्यात येणार आहे.

हेही वाचा: Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले; शोध मोहीम सुरू

याशिवाय २०० रुपयांच्या देणगी दर्शन पासधारकांसाठी स्वतंत्र प्रवेश मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या भाविकांना बिडकर पायऱ्यांमार्गे दर्शन मंडपाच्या पहिल्या मजल्यावरील आपत्कालीन प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही याच परिसरातून नियोजित पद्धतीने दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे.

गर्दी व्यवस्थापनावर भर

तुळजापूर हे प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असून, ते सर्वाधिक गर्दी होणाऱ्या देवस्थानांपैकी एक मानले जाते. विशेषतः सुट्टीच्या दिवशी, नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक पर्वकाळात येथे हजारो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. अशा परिस्थितीत दर्शन रांगांचे प्रभावी व्यवस्थापन, भाविकांचा वेळ वाचवणे आणि दर्शन प्रक्रिया अधिक सुव्यवस्थित करणे हा या बदलामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.

दर्शन प्रक्रिया अधिक सुलभ

या नव्या व्यवस्थेमुळे, विविध प्रकारच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हालचाल अधिक शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दर्शन मंडपात होणारी गर्दी कमी करणे, प्रवेश मार्गांवरील गोंधळ टाळणे आणि भाविकांना निश्चित मार्गदर्शन उपलब्ध करून देणे यासाठी हा बदल उपयुक्त ठरेल, असा विश्वास मंदिर प्रशासनाला आहे.

हेही वाचा: Mamata banerjee ना मोठा धक्का! TMC ची तीन बँक खाती गोठवली; एकूण किती कोटी रुपयांवर रोख?

दरम्यान, अलीकडच्या काळात मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि शिस्त वाढवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. थेट दर्शनाच्या नावाखाली पैशांची मागणी केल्याच्या तक्रारींवरही प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाई केल्याचे समोर आले होते.

भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून करण्यात आलेली ही नवीन व्यवस्था, आगामी काळात दर्शन प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुकर करण्यास मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.