Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले; शोध मोहीम सुरू

90
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले; शोध मोहीम सुरू
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, छत्रपती संभाजीनगरचे ५ पर्यटक समुद्रात बुडाले; शोध मोहीम सुरू

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत छत्रपती संभाजीनगर येथील पाच पर्यटक समुद्रात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे पाचही जण सध्या बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर बचाव मोहीम राबविण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथून १९ जणांचा एक समूह पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारात या समुहातील काही जण समुद्रात उतरले. मात्र समुद्रातील पाण्याचा वेग, लाटांची तीव्रता आणि खोल भागाचा अचूक अंदाज न आल्याने पाच जण समुद्राच्या प्रवाहात ओढले गेले. काही क्षणांतच ते खोल पाण्यात गेल्याने त्यांचा संपर्क तुटला.

हेही वाचा  – Mamata banerjee ना मोठा धक्का! TMC ची तीन बँक खाती गोठवली; एकूण किती कोटी रुपयांवर रोख?

पर्यटक समुद्रात अडकल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. समुद्रात उतरून पर्यटकांना शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र समुद्रातील प्रतिकूल परिस्थितीमुळे या मोहिमेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या समु्द्रात तीव्र करंट असून पाण्याचा प्रवाह वेगाने आत खेचणारा आहे. याशिवाय समुद्राला उधाण आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने लाटा उंच उसळत आहेत. त्यामुळे शोधमोहीम राबवताना बचाव पथकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.

पर्यटकांचा शोध सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी उपलब्ध यंत्रणा कार्यरत करण्यात आली असून किनारपट्टीवरील विविध भागांतून शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे गणपतीपुणे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पर्यटकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी समुद्रातील इशारे, सुरक्षाविषयक सूचना आणि जीवरक्षकांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते, मात्र पाण्याचा अंदाज चुकल्यास काही क्षणांत गंभीर दुर्घटना घडू शकते. याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे. बेपत्ता पाच पर्यटकांचा शोध सुरू असून त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.