Mamata banerjee : पश्चिम बंगालमधील (West bengal) तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, आता टीएमसीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या तीन बँक खात्यांवरील व्यवहारांवर पोलिसांनी निर्बंध लावले असून, आता या तिनही खात्यांमधून रक्कम काढता येणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या तीन खात्यांमध्ये सुमारे 440 कोटी रुपये जमा आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तृणमूल काँग्रेसचे नेते अरूप बिस्वास (Aroop Biswas) यांनी अलीकडेच संबंधित खासगी बँकेला पत्र पाठवून, टीएमसची ही खाती गोठवण्याची विनंती केली होती. याशिवाय पक्षातील बंडखोर गटाशी संबंधित सुमारे दहा आमदारांनीही या प्रकरणी बिधाननगर पोलिस आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित खात्यांवरील डेबिट व्यवहारांवर बंदी घातली.
‘खरी तृणमूल’ कोणाची? पक्षात संघर्ष तीव्र
दरम्यान, सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये ‘खरी तृणमूल काँग्रेस’ कोणाची, यावरून मोठा वाद सुरू आहे. पक्षाविरोधात बंड पुकारलेल्या काही खासदारांनी आधीच स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली आहे. तर अनेक नाराज आमदार स्वतःलाच ‘मूळ तृणमूल काँग्रेसचे खरे प्रतिनिधी’ असल्याचा दावा करत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अरूप विश्वास यांनी बँकेला पत्र लिहिले, तेव्हा ते पक्षाचे अधिकृत खजिनदार (Treasurer) होते. मात्र, 5 जून रोजी झालेल्या संघटनात्मक फेरबदलामध्ये त्यांच्या जागी माजी राज्यसभा सदस्य शुभाशीष चक्रवर्ती यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. तथापि, बँकिंग प्रक्रियेतील आवश्यक औपचारिकता अद्याप पूर्ण न झाल्याने शुभाशीष चक्रवर्ती यांची अधिकृत स्वाक्षरीकर्ते (Authorized Signatory) म्हणून नोंद झालेली नाही. त्यामुळे बँकेच्या नोंदींमध्ये अरूप विश्वास यांचेच नाव अद्याप अधिकृत खजिनदार म्हणून कायम आहे.
बंडखोर आमदारांची तक्रार; निधीच्या स्रोतांवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, गुरुवारी काही बंडखोर तृणमूल आमदारांनी बिधाननगर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीत संबंधित खात्यांमध्ये पद आणि प्रभावाचा गैरवापर करून बेकायदेशीर मार्गाने मिळवलेला निधी जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी असेही म्हटले आहे की, तातडीने कारवाई करण्यात आली नाही तर डिजिटल व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्राथमिक तपास सुरू केला आहे.
440 कोटी रुपयांच्या व्यवहारांवर निर्बंध
प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी संबंधित बँकेला तीनही खात्यांमधील डेबिट व्यवहारांवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले. मात्र, तक्रारीमध्ये खातेदारांची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेली नाहीत.
निवडणूक आयोगाकडे पूर्वी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, या खात्यांपैकी एक खाते अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या नावावर असून उर्वरित दोन खाती पक्षाच्या त्रिपुरा आणि गोवा राज्यांतील संघटनांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
कुणाल घोष यांची प्रतिक्रिया
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांनी सांगितले की, कोणत्याही नागरिकाला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा लोकशाही अधिकार आहे. मात्र अशी तक्रार करण्यापूर्वी पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणे योग्य ठरले असते.
ते पुढे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात तपासाला प्राधान्य दिले जात आहे की पक्षाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
या प्रकरणात पोलिसांनी खात्यांवरील व्यवहारांवर तात्पुरती रोक लावली असून आरोपांची चौकशी सुरू आहे. अद्याप कोणत्याही न्यायालयाने किंवा तपास यंत्रणेने आर्थिक गैरव्यवहार सिद्ध केलेला नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत सर्व आरोप हे केवळ आरोपांच्या स्वरूपातच पाहिले जात आहेत.


