महापालिकेच्या जुन्या इमारतीत कबुतरांना नाही थारा

47
महापालिकेच्या जुन्या इमारतीत कबुतरांना नाही थारा
महापालिकेच्या जुन्या इमारतीत कबुतरांना नाही थारा

मुंबईतील १२९ वर्षे जुन्या असलेल्या पुरातन महापालिका मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून याअंतर्गत या इमारतीची मंगलोरी कौलांसह छत आणि भिंतीचे डागडुजी करत रखरखाव केला जात आहे. मात्र, या जुन्या इमारतींच्या दुरुस्तीमध्ये कबुतरांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. या इमारतींमधील मोकळ्या जागांमध्ये मोठ्याप्रमाणात कबुतर बसत असल्याने त्यांच्या विष्ठेमुळे आसपास परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन परिसर बकाल होतो. त्यामुळे या महापालिकेचे नुतनीकरण करताना त्यामध्ये कबुतर कुठल्याही पाईपवर किंवा मोकळ्या जागांवर बसणार नाही याची खबरदारी यामध्ये घेण्यात आली असून त्याअंतर्गत विशेष टोकदार जाळ्या त्याठिकाणी बसवण्यात आल्या आहे. जेणेकरून त्याठिकाणी कबुतरांना बसणे अवघड होऊन जाणार आहे.

मुंबईचे दमट हवामान व सततच्या ऊन पावसामुळे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीला असलेल्या दगडी भिंतीवर रासायनिक प्रक्रिया होऊन, इमारतीच्या दगडांना बुरशी येणे, दगडांच्या खाचांमध्ये वनस्पतींची वाढ होणे, नवीन भेगा तयार होणे, दगडांचे आवरण झिजणे आदी बाबींमुळे इमारतीचा बाहेरील भाग खराब दिसतो. ज्यामध्ये घुमट, तुळ्या, कमानी आदी बांधकामांच्या भागांची विशेष दुरुस्ती करून इमारतीचे आयुष्य वाढवणे तसेच अनेक ठिकाणाहून होणारी गळती थांबवण्यासाठीची प्रकिया करणे आदी कामांच्या दृष्टीकोनातून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्ट्रक्टवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट या सल्लागार कंपनीच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार असून सुमारे दहा कोटींच्या या कामासाठी एम देवांग कन्स्ट्रक्शन कंपनी नेमणूक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Board : प्रतिक्षा संपली, ‘या’ तारखेला लागणार दहावी – बारावीचा निकाल)

मुंबईत जी २०चे शिष्टमंडळ येणार असून ते महापालिका मुख्यालयालाही भेट देणार आहे. त्यामुळे महापालिकेची पुरातन वास्तू असलेल्या मुख्यालय इमारतीच्या दुरुस्ती व रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या या जुन्या इमारतीमध्ये मोठ्याप्रमाणात कबुतरांचा सुळसुळाट सुरू असून त्यांच्या विष्ठेमुळे अनेक भाग विद्रुप दिसत आहेत. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती तथा नुतनीकरण करताना कबुतरांना कुठेही बसता येणार नाही याची काळजी घेऊन त्याठिकाणी टोकदार प्लास्टिकचे आवरण लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे टोकदार प्लास्टिकचे आवरण इमारतीतील अग्निशमन प्रतिबंधक पाईप, इतर लाकडी बार तसेच मोकळ्या जागांमध्ये कबुतर बसत असल्याने त्याठिकाणी हे टोकदार प्लास्टिकचे आवरण बसवण्यात आले आहे. त्यामुळे नुतनीकरण केलेल्या इमारतींमध्ये कबुतरांना आतमध्ये शिरता आले तरी कुठेही त्यांना बसता येणार नाही. कबुतरांना थाराच मिळणार नसल्याने जरी इमारतींमध्ये त्यांनी प्रवेश केला तरीही त्यांना बसण्यास जागा नसल्याने ते निघुन जातील असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका मुख्यालयाची इमारत ही १२९वर्षे जुनी असून पुरातन वास्तू वारसा लाभलेली आहे. त्यामुळे या इमारतीचे मूळ स्वरुप राखण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक लाकडी खांबांचे पॉलिश करून त्यांना झळाळी देण्याचे काम सुरू आहे. तसेच दगडांनाही पॉलिश करून करून इतर भिंतींची रंगरंगोटी सुरू आहे. याअंतर्गत विद्युत कामे करण्यात आली असून तळ मजल्यावरील व्हरांड्यात बसवण्यात आलेले जुने पंखे काढून नवीन पंखे बसण्यात आले आहेत. परंतु हे पंखे जुन्या पुरातन वास्तू साजेशे नसून पूर्वीच्या पंख्यांच्या तुलनेत या पंख्यांचीही हवाही येत नसल्याने नक्की पंखे का बदलले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.