Mumbai Rain: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, मुंबईच्या पाणीसाठ्याची सध्याची आकडेवारी किती?

106
Mumbai Rain: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, मुंबईच्या पाणीसाठ्याची सध्याची आकडेवारी किती?
Mumbai Rain: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस, मुंबईच्या पाणीसाठ्याची सध्याची आकडेवारी किती?

Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाच्या सरी कोसळत असून पाणलोट क्षेत्रातही दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ८९.०८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. ज्यामुळे आता लवकरच मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलअभियंता विभागाने जारी केलेल्या अधिकृत अपडेटनुसार मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सातही तलावांमधील एकूण पाणीसाठा आवश्यक क्षमतेच्या ८९.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. कालपासून रविवार (ता.२) सकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ०.६७ टक्के वाढ झाली असून, पाणीसाठा ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.

शहराच्या जलाशयांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर (ML) इतकी आहे. त्यापैकी सध्या १२,८९,२८९ दशलक्ष लिटर (ML) इतका वापरण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे. मान्सूनच्या सततच्या पावसामुळे यात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी या कालावधीत हा पाणीसाठा ८८.९४ टक्के इतका नोंदवण्यात आला होता.

मुंबईतील सात तलावांपैकी मोडक सागर आणि विहार तलाव १०० टक्के भरले आहेत, तर तानसा ९९.५८ टक्के आणि तुळशी ९९.४६ टक्के भरले आहेत. मध्य वैतरणा ९१.६५ टक्के भरले आहे; मुंबईचा पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या भातसा धरणात ८७.१४ टक्के, तर अप्पर वैतरणा धरणात ७८.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

हेही वाचा – Amarnath Yatra: मुसळधार पावसानंतर अमरनाथ यात्रामार्ग पुन्हा सुरू, नवीन यात्रेकरू दर्शनासाठी रवाना

गेल्या २४ तासांत अप्पर वैतरणा येथे सर्वाधिक ११२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर मध्य वैतरणा (६६ मिमी), मोडक सागर (५८ मिमी), भातसा (३० मिमी), तानसा (२५ मिमी) आणि तुळशी (९ मिमी) या ठिकाणी पाऊस पडला, तर विहार तलाव परिसरात पावसाची नोंद झाली नाही. भांडुप संकुलात गेल्या २४ तासांत ५ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामुळे तेथील हंगामातील एकूण पावसाचे प्रमाण २,३०१ मिमीवर पोहोचले आहे.

हेही पहा – 
https://www.youtube.com/watch?v=fEqs8YVpvgM

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.