Ganeshotsav 2026 : कोकणवासीयांना गणेशोत्सवाची भेट; सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

113
Ganeshotsav 2026 : कोकणवासीयांना गणेशोत्सवाची भेट; सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी
Ganeshotsav 2026 : कोकणवासीयांना गणेशोत्सवाची भेट; सीएसएमटी-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी
  • कल्याण : प्रतिनिधी

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सव तोंडावर असताना कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई ते सावंतवाडी रोड (Sawantwadi Road) दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कोकणात येणाऱ्या-जाणाऱ्या लाखो कोकणवासीय चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी या सेवेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांनाच अखेर यश आले आहे. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत तातडीने मंजुरी दिली. या निर्णयाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

कोकण रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी आणि मुंबई-कोकण दरम्यान अधिक सक्षम रेल्वे संपर्काची गरज लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेऊन मागणी केली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावर नवीन दैनिक रेल्वे सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती. नवीन रेल्वे सेवा गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या नावाने दररोज धावणार आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – दुलीप ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाचे नेतृत्व Tilak Varma करणार)

सुमारे ५१० किलोमीटर अंतरावरील या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच सणासुदीला गावी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना या नव्या सेवेचा मोठा लाभ होईल.

कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून पर्यटन उद्योगाला नवी चालना मिळेल. विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठी सोय ठरणार आहे. वाढलेली प्रवासी क्षमता आणि सुधारलेली कनेक्टिव्हिटी यामुळे कोकणातील स्थानिक अर्थव्यवस्था आणि व्यवसायालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.

नव्या दैनिक एक्स्प्रेसचे प्रस्तावित थांबे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.