Mumbai Crime : मुंबईत ‘ओटीपी फार्मिंग’चा पर्दाफाश! कंबोडियातील सायबर भामट्यांवर पोलिसांची धडक कारवाई

7
Mumbai Crime
Mumbai Crime

Mumbai Crime : शेअर बाजारात गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला ‘ओटीपी फार्मिंग’च्या (OTP Farming) माध्यमातून बनावट व्हॉट्सॲप खाती पुरवणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ६६९ बनावट सिमकार्ड्स आणि १०० मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. हे आरोपी कंबोडियास्थित सायबर गुन्हेगारांना भारतातून रसद पुरवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

एका नामांकित गुंतवणूक कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून ठगांनी तक्रारदाराशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला होता. शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर २२ लाख ३० हजार रुपये भरून घेत फसवणूक केली गेली. याप्रकरणी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात (पश्चिम विभाग) गुन्हा दाखल झाल्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खणून काढली.

पोलिसांनी प्रमोद कुमार उर्फ बिपिन, धर्मेंद्र गुप्ता आणि राजीव कुमार गुप्ता या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून ९१ कीपॅड मोबाईल व ९ स्मार्टफोन्ससह १०० मोबाईल हँडसेट, ६६९ सक्रिय सिमकार्ड्स, १ सीपीयू (CPU), वाय-फाय राउटर, फिंगरप्रिंट स्कॅनर, १२० मोबाईल बॅटऱ्या आणि २० चार्जर्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Nepal Flood Updates : पुरानंतर 6,150 जण अजूनही बेपत्ता; ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह, समोर येतंय धक्कादायक वास्तव )

अशी चालायची ‘ओटीपी फार्मिंग’ची मोडस ऑपरेंडी (कार्यपद्धती):……..

आरोपी राजीव गुप्ता हा पीओएस (POS) एजंट असून तो इतर व्यक्तींच्या नकळत त्यांच्या कागदपत्रांवर बनावट सिमकार्ड्स अ‍ॅक्टिव्हेट करत असे व कमिशन घेऊन धर्मेंद्र गुप्तामार्फत मुख्य आरोपी प्रमोद कुमारला पुरवत असे.मुख्य आरोपी प्रमोद कुमार साध्या ‘कीपॅड’ मोबाईलमध्ये ही सिमकार्ड्स टाकून मोठ्या प्रमाणावर ‘ओटीपी फार्मिंग’चा सेटअप चालवत होता. या भारतीय क्रमांकांवरून तयार होणारे व्हॉट्सॲपचे ओटीपी तो कंबोडिया व परदेशातील मुख्य सूत्रधारांना टेलिग्रामद्वारे प्रति ओटीपी १३ डॉलर्स (USDT) दराने विकत असे.

परदेशातील ठग या भारतीय व्हॉट्सॲप क्रमांकांचा वापर करून भारतीय नागरिकांना जाळ्यात ओढत आणि शेअर मार्केटमध्ये भरघोस नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळत होते.

फसवणुकीची रक्कम भाड्याने घेतलेल्या ‘म्युल’ बँक खात्यांमध्ये (Mule Accounts) जमा केली जात असे आणि आरोपी प्रमोद कुमारसारखे दलाल स्वतःचा मोबदला क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) स्वरूपात घेत असत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.