PM Modi Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यवतमाळ ग्रामीण शेतकरी चळवळीच्या वतीने, तालुक्यातील गोधनी शिवारात कापूस उत्पादक शेतकरी सुभाष मारेकर यांच्या शेतातील उभ्या पिकांच्या बांधावर प्रतीकात्मक आरती करण्यात आली.
कमी पावसामुळे दुष्काळाचे सावट
राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त, १७ सप्टेंबरपासून महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू केले आहे. दुसरीकडे, पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने यवतमाळसह विदर्भ आणि महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाल्याचे शेतकरी चळवळीचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Disha Salian Case मध्ये नवा ट्विस्ट; दिशाचे वडील थेट ‘मातोश्री’वर जाणार, नेमके आरोप काय?
सुरुवातीच्या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीन आणि तूर यांसारखी पिके पाण्याअभावी करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना ठोस मदत द्यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी शक्कल
या प्रतीकात्मक आरतीप्रसंगी शेतकरी चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते प्रा. पंढरी पाठे, सचिन मनवर आणि कृष्णा पुसनाके उपस्थित होते.
“पंतप्रधानांच्या वाढदिवशी उत्सव साजरे होत असताना देशाचा अन्नदाता मात्र शेतात उभ्या पिकांची राखरांगोळी पाहत आहे. सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्यासाठी आणि प्रशासनाला त्यांच्या अडचणींची जाणीव करून देण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला,” असे प्रा. पंढरी पाठे यांनी सांगितले.
हेही वाचा: Beed : बीडकरांच्या वर्षानुवर्षांच्या प्रतिक्षेचा अंत; मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, सातबारा कोरा होईपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी चळवळीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यवतमाळ ग्रामीण शेतकरी चळवळीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पावसाच्या खंडामुळे पिकांवर निर्माण झालेल्या संकटाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या प्रतीकात्मक आंदोलनाची चर्चा यवतमाळच्या ग्रामीण भागात होत आहे.
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


