मराठवाडा दुष्काळमुक्त करणार; CM Devendra Fadnavis यांचा पुनरुच्चार

11
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis
  • मुंबई प्रतिनिधी

CM Devendra Fadnavis : मराठवाड्याचा आधी स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला, आता दुष्काळाशी संघर्ष सुरु आहे. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही असा संकल्प आम्ही केला आहे. दुष्काळाची परिस्थिती बदलवण्यासाठी कोकणातील आणि कृष्णाखोऱ्यातील वाहून जाणारे पाणी आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु,असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथे बोलताना केला.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीवर भर दिला. कृष्णा खोऱ्यातील भीमा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणायचे काम आता सुरू करत आहोत. यामुळे धाराशिव, बीड आणि लातूरच्या भागापर्यंत पाणी आणता येईल.तसेच गोदावरीच्या खोऱ्यामध्ये उल्हास खोऱ्यातून, कोकणातून पाणी उचलून आणि नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. जवळपास ७० टीएमसी पाणी उल्हास खोऱ्यातून गोदावरीच्या खोऱ्यात आपल्याला आणता येईल आणि आपला मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. हे काम पुढील सात वर्षात पूर्ण होईल,असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Bijli Tigress: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ‘बिजली’ वाघिणीचा मृत्यू )

मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट सातत्याने घोंगावताना दिसते. यंदाचे वर्ष देखील दुष्काळाचे वर्ष आहे. पावसाचा मोठा खंड पडला असून मोठ्या प्रमाणात शेतीचचे , पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील. शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत आपण देऊ. नुकसानीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबर नंतर पूर्ण करुन आम्ही शेतकऱ्यांना मदत करु. पिण्याचे पाणी, जनावरांना चारा अशी सगळी व्यवस्था आणि नियोजन सरकारने केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

प्रत्येक घरी रोज पिण्याचे पाणी

छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेचे काम हे आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. या योजनेला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. योजनेतील अडचणी आपण दूर करतो आहोत. त्यामुळे लवकरच छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचे पाणी येईल. त्याकडे आपली वाटचाल ही सुरू झाली आहे,असेही फडणवीस म्हणाले.

मराठवाडा हा अनेक अडचणींचा सामना करणारा प्रदेश आहे. अशावेळी सगळ्यांना सोबत घेऊन मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर आणण्याचे आणि परिवर्तित करण्याचे कार्य आपण सुरू केले आहे. समाजातील सर्व घटकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तनआणण्याचा प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.