भिवंडीत काळाचा घाला, इमारत कोसळून १० जण ठार 

106

महेश सिंह

भिवंडी – भिवंडीमध्ये सोमवारी पहाटे ३.४० वाजता सर्वजण साखरझोपेत असतानांच धामणकर नाक्याजवळील पटेल कंपाउंड येथे तीन मजली इमारत कोसळली. या अपघातात १० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी ढिगारे उपसण्याचे काम सुरु असून २०-२५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. हा ढिगारा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.

दुर्घटना घडताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले, त्यामुळे २० जणांना वेळीच सुरक्षित बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू झाले. त्यानंतर बचावकार्याला वेग आला. या ढिगाऱ्यातून एक लहान मुलाला बाहेर काढण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असे भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

या घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचना केल्या. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, तसेच मृतांच्या नातलगांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंत्री शिंदे यांनी जाहीर केली. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले..

पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. महाराष्ट्रातील भिवंडी येथील इमारत पाडल्यामुळे मी दु:खी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांप्रति माझी सहानुभूती आहे. जखमींना लवकरात लवकर आरोग्यस्वास्थ्य लाभावे, अशी प्रार्थना. बचाव कार्य चालू असून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे पंतप्रधान म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.