राणीबागेतील यापूर्वीचा गर्दीचा विक्रम मोडीत: रविवारी एकाच दिवशी सुमारे ३१ हजार पर्यटकांची हजेरी

131
मुंबई महानगरपालिकेच्या भायखळास्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीबाग) रविवारी ३० ऑक्टोबर २०२२ रोजी एकाच दिवशी तब्बल ३१ हजार २३२ इतक्या पर्यटकांनी भेट दिली. या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा दिनांक २९ मे २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून या प्राणिसंग्रहालयाने आपल्या शिरपेचात आज नवीन तुरा रोवला आहे.

पर्यटकांचे आकर्षणाचे मोठे ठिकाण..

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनीदेखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे. कोविड कालावधीत संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद ठेवण्यात आलेले हे प्राणिसंग्रहालय कोविड निर्बंध संपल्यानंतर पर्यटकांसाठी आकर्षणाचे मोठे ठिकाण ठरले आहे. अभ्यागतांची वाढती संख्या आणि त्यासोबत महसुली उत्पन्नात होत असलेली भर यातून ते सातत्याने सिद्ध होत आहे. विशेषतः आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या कालावधीत या उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होते.

दोनच दिवसांत सुमारे ५८ हजार पर्यटक..

मे २०२२ महिन्यात २९ मे २०२२ रोजी एकाच दिवशी ३० हजार ३७९ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन विक्रमी संख्येची नोंद केली होती. त्या दिवशी सुमारे १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे महसुली उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरी जमा झाले होते. हा विक्रम रविवारी  ३० ऑक्टोबर २०२२ रोजी मोडीत निघाला आहे. रविवारी एकाच दिवसात तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे ११ लाख ०५ हजार ९२५ रुपयांचे महसुली उत्पन्न प्राप्त झाले.  शनिवारी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी  २७ हजार ३९२ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यातूनही ९ लाख ८८ हजार ०२५ रुपये उत्पन्नाची भर पडली. याचाच अर्थ या दोन दिवसांत ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून एकूण २० लाख ९३ हजार ९५० रुपये इतके विक्रमी महसुली उत्पन्नदेखील प्राप्त झाले आहे.

दोन वेळा मुख्य प्रवेशद्वार केले होते बंद….

विशेष म्हणजे, विक्रमी संख्येने पर्यटक दाखल होत असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच अतिरिक्त पंधरा सुरक्षा रक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. तसेच पर्यटकांचे व्यवस्थापन करताना काळजी म्हणून दोनदा मुख्य प्रवेशद्वार तात्पुरते बंद करून नियोजन करण्यात आले. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून देखील अतिशय योग्य रीतीने सर्वांना पक्षी, प्राणी आणि उद्यान पाहता येईल, याची प्राणिसंग्रहालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली.

एकाच महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत एक कोटींचा महसूल…

ऑक्टोबर २०२२ महिन्याचा उद्या अखेरचा दिवस शिल्लक आहे, तथापि रविवारी अखेर या एकाच महिन्यात सुमारे अडीच लाख पर्यटकांनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची  माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.