मार्सेलिस येथे वीर सावरकर यांचे स्मारक भारतीयांसाठी अभिमानास्पद!

179

८ जुलै रोजी वीर सावरकर यांनी मार्सेलिस येथे जी उडी मारली त्याची सगळीकडे जोरदार चर्चा झाली. वीर सावरकर यांच्या धाडसी कृतीबद्दल मार्सेलिस येथे त्यांचे स्मारक उभारण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात जागा मिळाली होती. असे ऐकिवात आहे. यानंतर बहुतेक या स्मारकाचा विषय प्रलंबित राहिला असावा, असे दिसते. आता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रयत्नाने केंद्र सरकार मार्सेलिस येथे स्मारक उभे करण्याचा विचार करत आहे. यानिमित्ताने हे स्मारक झाले तर हा केव्हाही आनंदाचा विषय आहे.

जगातील वर्तमानपत्रांनी नोंद घेतली

वीर सावरकरांनी त्यावेळी केलेल्या पराक्रमाची जगातील ११४ वर्तमानपत्रांनी नोंद घेतली होती. ही आपल्या भारतीयांसाठी एका परीने अभिमानास्पद घटना होती. अशी उडी मारल्यामुळे काय परिणाम होणार, हे वीर सावरकरांना माहिती होते. यामुळे दोन घटना होणार होत्या, एक तर ते पकडले जाणार होते किंवा सुटका करवून घेऊन कुठेतरी राजकीय आश्रय घेणार होते. मग त्यांनी राजकीय आश्रय का घेतला नाही, याचे साधे उत्तर आहे. कोणत्याही देशात राजकीय आश्रय घेणे, ही एक प्रकारची राजकीय आत्महत्या आहे. कारण तुमच्या देशामध्ये केल्या गेलेल्या कृत्यामध्ये तुम्हाला भाग घेण्यास बंदी येते. त्यामुळे वीर सावरकरांनी असे करण्याऐवजी अशी काहीतरी सनसनाटी उत्पन्न केली. कारण अशा सनसनाटीला बातमी मूल्य मिळत असते. म्हणूनच वीर सावरकर यांच्या उडीची जगातील वर्तमानपत्रांनी नोंद घेतली.

(हेही वाचा हलाल प्रमाणपत्र देणारी संघटना दहशतवाद्यांना करतेय अर्थपुरवठा, चौकशीची मागणी)

तमाम देशबांधवांना आनंद होईल

त्यांना भारतात आणण्यात आले, असे सांगितले जाते. मात्र त्यावेळी युरोपियन महासंघात काय घडले होते, हे कुणीच सांगत नाही. त्या वेळी ‘हेग’मध्ये यावर एक अभियोग भरवण्यात आला होता. त्यावेळी आज जशी अमेरिका आहे तसे ब्रिटन सगळ्यात शक्तीशाली होता. त्यामुळे ब्रिटनच्या बाजूने निर्णय लागणे हे स्वाभाविक होते. त्यानंतरच जनतेमध्ये जनक्षोभ उसळला. त्यावेळी वीर सावरकर यांची बाजू घेऊन लढणारा हा कार्ल मास्कचा नातू होता. तेव्हा तो फ्रेंच संसदेचा एक सदस्य होता. तो वीर सावरकर यांची बाजू घेऊन लढला हे सगळ्यात महत्त्वाचे. त्यानंतर वीर सावरकर यांना अंदमानात जावे लागेल, हे सर्वश्रुत आहे. आपल्याकडील काही नतद्रष्टे आहेत, ज्यांनी वीर सावरकर यांच्या ऐतिहासिक उडीवर टीका केली आहे. ज्यांनी स्वतः कधीच काही केले नाही. हे मुळात हास्यास्पद आहे. पण मनमोहन नातू मात्र ही उडी बघून म्हणतात, ‘ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरुजावर फडफडलेला झाशीतील घोडा हसला, वासुदेव बळवंताच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला’, अशी कविता करतात. जर या उडीचे महत्त्व लोकांना नसते तर असा उल्लेख कुणी केला असता का ? वीर सावरकर यांच्यावर त्या काळातही काही पुस्तके लिहिली गेली. हवे तेवढे संदर्भ मिळतात, पण काहींना या संदर्भाकडे बघायचेच नसते आणि केवळ कोणत्या ना कोणत्या कारणाने दोषारोप करायचे असतात.

आमचे गांधी, तुमचे सावरकर, अशी वाटणी करायची असते, असे लोक काहीही बोलू शकतात. आपण मात्र तसे करायला नको. स्वातंत्र्यवीर सावरकर ‘यांना वंदन करणारे असे जर स्मारक झाले, तर त्याचा तमाम देशबांधवांना आनंद व्हायला पाहिजे यात शंकाच नाही.

  • लेखक – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहासकार, राष्ट्रीय व्याख्याते.

(हेही वाचा देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग, काय म्हणतात तज्ज्ञ?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.