Ravindra Waikar यांना अद्यापही ‘शिवतीर्था’वर जाण्याचा सापडत नाही मुहूर्त?

141
मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला ‘शिवतीर्थ’ वर भेट घेण्यास येत असून मंगळवारी महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मात्र, आतापर्यंत सर्व उमेदवार शिवतीर्थावर जावून पायधूळ झाडत असतानाच उत्तर पश्चिममधील शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे अद्यापही राज ठाकरेंची भेट घेण्यास आले नसल्याने वायकर हे ठाकरेंच्या भेटीला जातील का, याकडे सर्वांचे डोळे लागून आहेत.

राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या, पण…

शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा जाहिर केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला जावून त्यांचे आशिर्वाद घेत आहे. दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे हे सर्व प्रथम राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते आणि अयोध्येतून आणलेला शिवधनुष्य बाण सोबत घेऊन गेले होते. त्यानंतर कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के यांनी तर त्याच दिवशी मुलुंडमधील भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी मनोज कोटकसह भेट घेतली होती. त्यानंतर उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनीही ऍड आशिष शेलार यांच्यासह राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जावून भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी दक्षिण मुंबईच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांनीही भेट घेतली.

रविंद्र वायकर यांनी मनसेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न

मात्र, उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले नाहीत. वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु असतानाच मनसेच्या नेत्या शालिनीताई ठाकरे यांनी विरोध करून मनसे त्यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा दिला होता. रविंद्र वायकर यांनी मनसेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला तसेच या जोगेश्वरी भागात मनसैनिकांना प्रचंड त्रास दिला. त्याचा राग असल्याने वायकर यांना विरोध होत आहे.
पंरतु राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याने मनसेचे नेते काही प्रमाणात कामाला लागले आहेत. तर काही नेते आजही नाराज आहेत. त्यातच वायकर (Ravindra Waikar) हे राज ठाकरेंची भेट घेण्यास न गेल्याने काही मनसैनिक प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे वायकर जोपर्यंत शिवतीर्थावर जावून साहेबांची भेट घेत नाही तोवर त्यांचा प्रचार न करण्याचा निर्धार मनसैनिकांनी केला असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यामुळे मनसैनिक सहकार्य करत नसतानाही वायकर यांना राज ठाकरेंची भेट घेण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वायकर यांना मनसेची मदत हवी आहे की त्यांना स्वत:च्या ताकदीवरच विश्वास आहे असा प्रश्न जनतेलाच पडला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.