Lok sabha Election 2024: मुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज! ७४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदान केंद्र आणि शंभर मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध.

218
Lok sabha Election 2024: मुंबई उपनगरातील मतदान केंद्रे झाली सज्ज! ७४ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघासाठीची मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठीचे साहित्य घेऊन मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले. आता मतदान प्रक्रियेसाठी ही मतदान केंद्रे सज्ज झाली असून 20 मे रोजी  सकाळी 7 वाजता मतदान सुरु होणार आहे. या मतदान केंद्रांना प्रतीक्षा आहे ती मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची! सर्वच मतदारांनी  त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदान करण्यासाठी जाताना सोबत मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नाही, ही बाब मतदारांना आवर्जून लक्षात ठेवावी लागणार आहे. (Lok sabha Election 2024)

मुंबई उपनगर जिल्ह्यात 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व आणि 29- मुंबई उत्तर मध्य या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातील 7384 मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज या मतदारसंघांतील 26 विधानसभा क्षेत्रात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी यांना करण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना नियुक्त मतदान केंद्रांवर पोहोच कऱण्यात आले. सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था कऱण्यात आली आहे. मतदार केंद्रांवर नाव शोधण्यासाठीही याठिकाणी स्वयंसेवक नियुक्त कऱण्यात आले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता मतदारांनी सकाळीच घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन कऱण्यात आले आहेत.

(हेही वाचा – शरद पवारांनी केलेल्या दाव्यावर Praful Patel काय म्हणाले? )

मतदान केंद्रांपासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदानाची सर्व प्रक्रिया गोपनीय आहे. मतदान केंद्रावरील गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतदारांच्या गोपनीयतेसाठी मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांनीही मतदानासाठी येताना मोबाईल आणू नयेत, असेही आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

मतदानासाठी मतदान ओळखपत्राशिवाय 12 पुरावे ग्राह्य

मतदारांनी मतदानासाठी जाताना भारत निवडणूक आयोगाने त्यांना दिलेले निवडणूक ओळखपत्र सोबत घेऊन जायचे आहे. ओळखपत्र मिळाले नसेल तर इतर 12 ओळखपत्र ही पुरावा म्हणून ग्राह्य धरणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यामध्ये, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, शासन, सार्वजनिक उपक्रम तसेच पब्लिक लिमिटेड कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना वितरित छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, बॅंक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड, मनरेगा रोजगार ओळखपत्र, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्तीवेतन दस्तऐवज, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे. 

तब्बल 74 लाखांहून अधिक मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 विधानसभा मतदारसंघात एकूण 7384 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 40 लाख 02 हजार 749 पुरुष, 34 लाख 44 हजार 819 महिला, तर 815 तृतीयपंथी असे एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यामध्ये 26- मुंबई उत्तर मतदारसंघात विधानसभेचे बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली (पूर्व), चारकोप, मालाड (पश्चिम) या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण 1702 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 68 हजार 983 पुरुष, 8 लाख 42 हजार 546 महिला, तर 443 तृतीयपंथी असे एकूण 18 लाख 11 हजार 942 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

(हेही  वाचा – Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये 25 केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा, नागरिकांना मतदान केंद्रांवरील गर्दी पाहता येणार

27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघात विधानसभेचे जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात  1753 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 38 हजार 365 पूरूष मतदार तसेच 7 लाख 96 हजार 663 महिला मतदार तर 60 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 35 हजार 088 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

28- मुंबई उत्तर पुर्व या मतदारसंघात विधानसभेचे मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व तसेच मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1682 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 8 लाख 77 हजार 855 पूरूष मतदार तसेच 7 लाख 58 हजार 799 महिला मतदार तर 236 तृतीयपंथी असे एकुण 16 लाख 36 हजार 890 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: नाशिकचे तापमान पुन्हा वाढले, राजकीय पक्षांची चिंता वाढली

29- मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघात विधानसभेचे विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला एससी, कलीना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात 1698 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 9 लाख 41 हजार 288 पूरूष मतदार तसेच 8 लाख 2 हजार 775 महिला मतदार तर 65 तृतीयपंथी असे एकुण 17 लाख 44 हजार 128 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.

30 मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघात अणूशक्ती नगर आणि चेंबुर या मतदारसंघात 549 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर 2 लाख 76 हजार 258 पूरूष मतदार तसेच 2 लाख 44 हजार 36 महिला मतदार तर 41 तृतीयपंथी असे एकुण 5 लाख 20 हजार 335 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. (Lok sabha Election 2024) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.