“अभ्यास करुन अजीर्ण झालं असेल तर राज्याचं आरोग्य खातं सक्षम आहे”, राऊतांचा राज्यपालांना टोला

69

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा महाराष्ट्रात पेच कायम असून या निवडीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात तू-तू मै-मै सुरू आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात करण्यात आलेले बदल हे घटनेतील तरतुदींशी सुसंगत आहेत का, हे तपासण्यात येत असल्याचे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पाठवून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला संमती नाकारली आहे. विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्रं लिहून जोरदार हल्ला केला. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांना टोला लगावला आहे.

मंगळवारी संजय राऊत यांनी माध्यामांशी संवाद साधताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. राज्यपाल हुशार आहेत. विद्धवान आहेत. अभ्यासू आहेत. पण अभ्यास आणि विद्धतेचं अजीर्ण होऊ नये. नाही तर पोटाचा त्रास होतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी आज कानपूर दौऱ्यावर; मेट्रो विभाग, बिना पंकी प्रकल्पाचा करणार शुभारंभ)

काय म्हणाले राऊत

”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेले उत्तर तुमच्या समोर आहे. राज्यपालांनी इतका अभ्यास करु नये असं मी कालही म्हणालो होतो. घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणुक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती होत नाही. राज्यपाल अभ्यासू, विद्वान आहेत. पण त्या अभ्यासाचे आणि विद्वत्तेचे अजीर्ण होऊ नये. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झाल्यावर पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल महाराष्ट्राचं आरोग्य खातं सक्षम आहे. ते उपचार करतील”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आघाडीत बिघाडीचा प्रश्नच नाही

विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीवरून आघाडीत मतभेद आहेत का? यावर बोलताना ते म्हणाले, आघाडीत बिघाडीचा प्रश्नच येत नाही. राज्यपाल जर घटनेच्या विरुद्ध वागत असतील तर राज्यपालांनी राजकीय वर्तन करावा असा त्यांच्यावर दबाव असेल तर सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील, असा इशारा त्यांनी दिला.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.