भारत जोडायचा असेल, तर पाकिस्तान आणि बांग्लादेशला सोबत घ्या; राहुल शेवाळे यांचे कॉंग्रेसला आव्हान

112

आपला देश अखंड असताना, कॉंग्रेसकडून भारत जोडो यात्रा काढली जात आहे. हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यांना खऱ्या अर्थाने भारत जोडायचा असेल, तर पाकिस्तान आणि बांग्लादेशला सोबत घेऊन यात्रा काढावी, असे आव्हान बाळासाहेबांच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी कॉंग्रेला दिले.

रणजित सावरकरांच्या मागणीची सरकार दखल घेईल

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींविरोधात गुरुवारी, 17 नोव्हेंबर रोजी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आणि सावरकरप्रेमी उपस्थित होते. तक्रार दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शेवाळे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन कोणी वातावरण खराब करीत असेल, महाराष्ट्राचे सुपूत्र असलेल्या एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करीत असेल, तर ते महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यासंदर्भात मी जी मागणी केली आहे ती महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने केलेली आहे. कारण हा महाराष्ट्राच्या जनतेचा, मराठी माणसाचा अपमान आहे. आणि हे सरकार ते कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्रात सत्तेवर असलेले सरकार स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे रणजित सावरकर यांनी जी मागणी केलेली आहे, तिची दखल राज्य सरकार घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांची पोलिसांत तक्रार, केली अटकेची मागणी)

कॉंग्रेसमुळेच देशाचे तुकडे झाले!

भारत आधीच जोडलेला आहे; त्यामुळे भारत जोडो यात्रेतून काहीही निष्पन्न होणार नाही. भारताचे तुकडे व्हावेत, असंतोष निर्माण व्हावा, जातिय तेढ निर्माण व्हावा, राष्ट्रपुरुषांचा अपमान व्हावा, अशी भावना या यात्रेमागे आहे. त्यामुळे त्यांची यात्रा खऱ्या अर्थाने भारत तोडो यात्रा आहे. त्यांना भारत जोडो यात्रा काढायची असेल, तर पाकिस्तान आणि बांग्लादेशला सोबत घेऊन काढावी. कारण भारताचा हा भाग परत मिळणार असेल, तर ही आनंदाची बाब आहे. कॉंग्रेसमुळेच देशाचे तुकडे झाले आहेत. तरीही ते भारत जोडो यात्रा काढत असतील, तर हे हास्यास्पद आहे, अशी टीकाही राहुल शेवाळे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.