शिवसैनिकच करतात बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे पावित्र्य कमी!

98
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री आणि आमदार यांनी भेट देऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन केले. या स्मृतिस्थळाच्या भेटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण केले. राज्याचे मुख्यमंत्री हे कोणा एका पक्षाचे नसतात, तर त्या राज्याचे प्रथम नागरिक म्हणून असताना. राज्याचे पालक असतात.  राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे मंत्री हे जर स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करत असतील, तर अशा ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडण्याचा हा प्रकार पाहून  त्यांच्या वैचारिक आणि बौद्धिक क्षमतेची किव करावीशी वाटते.

स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर

बाळासाहेब हे लोकनेते होते. हिंदूंचे नेते होते. हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कार करणारे ते होते आणि त्यामुळे ते एका कोणा पक्षाचे, किंवा कोणा एका कुटुंबाचे असू शकत नाही. या देशातील तमाम जनतेच्या हृदयात तेव्हाही होते आणि आजही आहेत. एक प्रकारे बाळासाहेबांना तमाम हिंदू आणि मराठी जन हे आपलं दैवत मानत आहेत, असे असताना जर शिवसेनेला त्यांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण करणे म्हणजे ते बाळासाहेबांनी आजवर कमावलेल्या नावाला काळीमा फासण्यासारखा एक प्रकार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी या राज्यातीलच नव्हे, तर या देशातील आणि जगातील प्रत्येक व्यक्तीने येऊन वंदन करावं असं हे पवित्र स्थान आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य जर वारंवार शिवसैनिकांकडून होत असेल, तर भविष्यात या स्मृतीस्थळी कोणीही येणार नाही, एक प्रकारे बाळासाहेबांची प्रतिमा अधिकाधिक उंचावणे या ऐवजी ते कमी करण्याचे काम जाणीवपूर्वक शिवसैनिकांकडून केले जात आहे का, हा  प्रश्न निर्माण होत आहे. विशेष म्हणजे हे शुद्धीकरण केल्यामुळे ती वास्तु पवित्र होते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे शुद्धीकरण केल्यामुळे आपल्यावर पक्षाचे नेते खुश होती आणि पाठीवर शाबासकीची थाप देते, असे जर शिवसैनिकांना वाटत असेल तर ते बाळासाहेबांवरील प्रेमापोटी, श्रद्धे पोटी हे कृत्य करत नसून ते स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत आहेत. स्वतः चमकण्यासाठी हा सर्व खटाटोप असून स्वतः चमकण्याच्या  नादात बाळासाहेबांभोवती असलेल्या तेजाचा प्रकाश कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

बाळासाहेबांना स्वर्गातही दुःख होईल

ज्या पक्षाचे नेते हे आपल्या वडिलांबाबतच जेव्हा बाप पळवणारी टोळी असा उल्लेख करत असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अवस्था काय असेल. मुळातच बाळासाहेब हे तमाम जनतेचे असताना अशाप्रकारे शुद्धीकरण करून एक प्रकारे ते पक्षाच्या नेत्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करताना दुसरीकडे बाळासाहेबांच्या या पवित्र ठिकाणाची ही बदनामी करत आहेत. या शुद्धीकरणाच्या माध्यमातून केवळ प्रसिद्धी हाच एक स्टंट आहे आणि याशिवाय वेगळं काही असू शकत नाही असा आम्हाला वाटतं. त्यामुळे शिवसैनिकांनी कृपा करून बाळासाहेबांना स्वर्गातही दुःख होईल असं कृत्य किमान स्वतःच्या स्वार्थासाठी तरी तुम्ही करू नये. जे सोडून गेले ते तुमच्यासाठी कावळे असतील पण स्वतःला मावळे म्हणणाऱ्यांनी  बाळासाहेबांनी दिलेले विचार पुढे नेण्याची गरज आहे. आज शिंदे गट बाजूला झाले आहे तरीही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.

शुद्धीकरणाचा प्रयोग राजकीय स्वार्थासाठी रंगवला जात आहे

यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण गाणे यांनी जेव्हा स्मृतीस्थानी भेट दिल्यानंतर  प्रथम शुद्धीकरणाचा प्रयोग करण्यात आला होता. तिथून शुद्धीकरणाचा प्रयोग राजकीय स्वार्थासाठी रंगवला जात आहे. राणे यांच्या नंतर  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट दिल्यानंतर सुद्धा असाच प्रयत्न झाला होता. बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री  यांनी भेट दिल्यानंतरही असाच प्रयत्न जर होत असेल तर ही वास्तू एक खाजगी मालमत्ता म्हणून शिवसैनिक वापरतात असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे जर ही वास्तु खाजगी असेल तर मुंबई महापालिकेने त्यांना दिलेली जमीन सर्वप्रथम काढून घ्यावी. ही जमीन त्यांना देण्याचा कोणताही अधिकार महापालिकेला नाही.  उलट  या स्मृतिस्थळावर दररोजचे देखभाल आणि सुरक्षेवर हजारो रुपये खर्च होतात.  जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी लाखो रुपये खर्च केले जातात. हा खर्च शिवसैनिक स्वतःच्या खिशातून किंवा शिवसेना पक्ष स्वतःच्या खिशातून देत नाही. त्यामुळे त्यांना या वास्तू वर कोणत्याही प्रकारचा हक्क दाखवण्याचा अधिकार उरत नाही आणि जर त्यांना ही वास्तु स्वतःची मालमत्ता वाटत असेल तर या वास्तूची देखभाल आणि दुरुस्ती आणि सुरक्षा त्याने स्वतः करावी. मुंबई महापालिकेने यातून हात काढून घ्यायला हवा असे आम्हाला वाटते.

स्मृतिस्थळ खाजगी मालमत्ता नाही

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात (शिवाजी पार्क) झाल्यानंतर या अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणाच्या बाजूला दहा मीटर बाय पंधरा मीटर  क्षेत्रफळाची जागा स्मृतीस्थळासाठी म्हणून देण्यात यावी अशी मागणी तत्कालीन सभागृह नेते यशोधन फणसे यांनी केली होती आणि त्यानुसार ही जागा देण्यात आली. एक प्रकारे शिवाजी पार्कच्या मैदान हे खेळासाठी आहे. पण एकच नेता, एकच मैदान अशी ओळख असलेल्या  शिवसेनाप्रमुखांचे शिवाजी पार्क मैदानावर असलेले प्रेम यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि या नेत्याला ही जागा समर्पित करण्यासाठी ही जागा पक्षाच्या मागणीनुसार देण्यात आली. आज या जागेवर स्मृतिस्थळ उभे राहिल्यानंतर जेव्हा असा अतिरेक होतो, तेव्हा मग तत्कालीन शिवसेनेने  महापालिकेच्या सत्तेचा  गैरवापर  करत ही जागा सत्ताधारी पक्षाने मिळवण्याचा प्रयत्न केला असा जर आरोप कुणी केला तर त्याचे वाईट वाटून घेऊ नये. बाळासाहेबांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्क मध्ये करण्यास तत्कालीन राज्यातील काँग्रेस सरकारनेही याला विरोध दर्शवला नाही की स्मृतिस्थळाची जागा देताना. पण जेव्हा  याच मैदानावर गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचेही स्मृतिस्थळ तिथे व्हावे अशी मागणी झाली होती. पण हे खेळाचे मैदान आहे आणि ते बाळासाहेबांनंतर दुसऱ्या कोणालाही देऊ नये अशा प्रकारचा विरोध झाल्यानंतर खुद्द प्रसिद्ध संगीतकार  आणि लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी मात्र या ठिकाणी स्मृतिस्थळ उभारले जाऊ नये अशा प्रकारची भूमिका घेत या मागणीवर पडदा पाडला. परंतु जेव्हा बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ होतं आणि लता मंगेशकर यांचे होत नाही. त्यावेळेला शिवसैनिकांनाही याची जाणीव असायला पाहिजे की हे स्मृतिस्थळ हे म्हणजे आपली स्वतःची खाजगी मालमत्ता नाही तर ती बाळासाहेबांना समर्पित  भावनेने अर्पण केलेली  आदलांजली आहे. आणि आदरांजली वाहत असताना समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची किंवा शत्रू आहे किंवा विरोधक आहे हा निकष लावणे चुकीचे ठरते.  शिंदे गटातील मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच यापूर्वी नारायण राणे हे जरी   पक्षातून बाहेर बाहेर पडले असले  तरी याच लोकांच्या मेहनतीवर आज शिवसेना उभी आहे. शिवसेनेचा  पाया यांनी घातलेला आहे. आज कळस भलेही तुम्ही असाल  पण पाया जर मजबूत नसेल तर कळसाला ही किंमत नसते हे सांगायची गरज नाही. आज गोमूत्र शिंपडून बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ पवित्र करत असल्याचा प्रयत्न होत असला तरी या वारंवारच्या शुद्धीकरणामुळे या वास्तूचे पावित्र्य नष्ट होत आहे. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी असे कृत्य करण्याचे प्रकार जर थांबले नाही तर भविष्यात अशा मंडळींवर कडक कारवाई व्हायला हवी. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दोनच दिवसांपूर्वी बाळासाहेब स्मारक सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली आहे, त्याच धर्तीवर हा वास्तू महापालिकेने ताब्यात घेऊन तिथे आपल्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये, अशी भूमिका घ्यायला पाहिजे, तरच त्या स्मृतिस्थळाचे पावित्र्य टिकले जाईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.