‘अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आल्यास पहिला विरोध माझा’- छगन भुजबळ

83

मी लेखक नाही, मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल, तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ अयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उदघाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

हे मान्यवर उपस्थित होते

यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील,डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील,शुभांगीणीराजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख,श्रीपाल सबनीस,हेमंत टकले,समीर भुजबळ,पंकज भुजबळ,जयप्रकाश जातेगावकर,विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचा हा महाउत्सव

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात आज मी ज्येष्ठ मंत्री म्हणून सहभागी असलो तरी नाशिक आणि या परिसराने मला घडविलेले आहे. मी स्वतः लेखक नाही पण वाचक जरूर आहे. तमाम मराठी वाचकांचा प्रतिनिधी म्हणून मी आपले स्वागत करण्यासाठी उभा आहे. ग्रंथकार सभेची स्थापना आपले निफाडचे न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केली होती. न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे दोघेही नाशिकमध्ये काही काळ न्यायदानाचे काम करीत होते. ग्रंथकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापन झालेल्या ग्रंथकार सभेचे रूपांतर आज साहित्य संमेलनात झाले आहे. महाराष्ट्राचा हा महाउत्सव अखिल भारतीय पातळीवर साजरा केला जात असतो. आपण या घटनेचे साक्षीदार आहोत याचा मला आनंद वाटतो. असे यावेळी भुजबळ म्हणाले.

भुजबळांनी मांडले मत

नाशिकमध्ये १९४२ मध्ये आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन संपन्न झाले. ते संमेलन चित्रमंदिर सारख्या थिएटरमध्ये नाट्य क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी भरविले होते. त्याचे स्वागताध्यक्ष वामनराव पुरोहित हे नटश्रेष्ठ शिक्षक होते. पुढील काळात माझे सहकारी डॉ. वसंतराव पवार यांनी २००५ मध्ये ७८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत घेतले. त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध दलित लेखक प्रा. केशव मेश्राम होते. त्या संमेलनाच्या आयोजनात कार्याध्यक्ष म्हणून विनायक पाटील यांचा सहभाग होता. हे तिघेही आज आपल्यात नाहीत याचे दु:ख वाटते. पहिल्या दोन संमेलनात सहा दशकांचे अंतर पडलेले होते. त्यानंतर अवघ्या पंधरा-सोळा वर्षांत कुसुमाग्रज साहित्य नगरीत हे संमेलन होत आहे. लोकहितवादी मंडळ या संस्थेची स्थापना वि. वा. शिरवाडकर तथा आपल्या कुसुमाग्रजांनी सात दशकापूर्वी केली. लोकहितवादी मंडळ नाटक, संगीत या परफॉर्मिंग आर्ट विभागात काम करीत असते. मराठी नाटकाचा झेंडा दिल्लीपर्यंत नेणाऱ्या लोकहितवादी मंडळाने नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात आपला लौकिक निर्माण केला आहे. आकाराने लहान पण सांस्कृतिक क्षेत्रात महान असणाऱ्या लोकहितवादी मंडळाला साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे साह्य लाभले. मार्च महिन्यात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साहित्य महामंडळाने स्थगिती दिली. हे संमेलन कोरोनाची दुसरी लाट कमी होत असताना अतिशय मर्यादित वेळात पार पाडावे लागणार होते. अगदी काही आठवड्यांचा कालावधी आम्हाला मिळाला पण त्यातही आमच्या सहकाऱ्यांनी सर्व गोष्टी सुरळीत करून दाखवल्या कोरोनाचे संकट असतानाच आयोजनात पावसाने अडथळा आणला. रोज माध्यमातून संमेलन कसे होणार यावर प्रश्न विचारले जात होते. मात्र मुख्य मंडपात एक थेंब पाणी येणार नाही सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडतील असा शब्द मी दिला होता. तो आज पूर्ण होताना दिसत आहे. असे मत भुजबळांनी मांडले.

नाशिक हे इतिहासाने समृद्ध असे गाव

नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळा म्हणजे आत्मज्ञानाच्या देवाण-घेवाणीचा आनंद सोहळा होय. या सोहळ्यासाठी जगभरातून लोक नाशिकमध्ये येत असतात. आपण सर्वजण आज साहित्याच्या कुंभ पर्वासाठी नाशिकमध्ये आले आहात. नाशिक जगाच्या नकाशावर कुंभमेळ्यामुळे आले. आज साहित्यिकांच्या ज्ञान पर्वामुळे निदान भारताच्या आणि तंत्र क्रातीमुळे जगाच्या नकाशावर दिसत असेल. नाशिक हे फक्त तीर्थक्षेत्र नाही,तर इतिहासाने समृद्ध असे गाव आहे. नाशिक धर्मक्षेत्र, संस्कृत विद्याभ्यासाचे विद्यापीठ आणि महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. तसेच नाशिकने यादव काळ, बहामनी काळ, निजामशाही यांचा अनुभव घेतला आहे. निजामाच्या काळात दौलताबादच्या सुभ्यात नाशिक हे गुलशनाबाद नावाने झळकले होते. पुढे मोगल मराठ्यांचा संघर्ष पेटला. १६७० च्या सुमारास मोगलांविरुद्ध शिवाजी महाराजांनी आक्रमक धोरण पत्करले. त्यांनी बागलाण प्रदेशात मुसंडी मारली. साल्हेर मुल्हेरचे किल्ले जिंकले. सुरतेची दुसरी लूट करून येताना मुगल फौजांनी राजांना वणी दिंडोरीपाशी अडविले. यात शिवाजी राजांचा विजय झाला. हा लढा शृंगेरीचे रण म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. नाशिकचे दिवंगत कादंबरीकार मुरलीधर खैरनार यांनी त्यावर ”शोध” नावाची कादंबरी अलीकडील काळात लिहिली आहे. मराठी कादंबरीत लक्षवेधी, रहस्य आणि थरारकथात्मक कादंबरी असा तिचा उल्लेख केला जातो. नाशिक परिसरात मुगल मराठ्यांच्या अनेक चकमकी झाल्या. त्यात मराठ्यांना विजय मिळत राहिला. पेशवेकाळात नाशिकमध्ये अनेक मंदिरे निर्माण झाली. सरदार रंगराव ओढेकर यांनी इसवीसन १८७२मध्ये काळाराम मंदिर बांधले. सरदार नारोशंकर यांनी गोदावरी काठावर १७४७ मध्ये महादेवाचे मंदिर बांधले. या मंदिरावर चार टन वजनाची आणि दोन मीटर घेराची प्रचंड घंटा बसविली. ती नारोशंकराची घंटा म्हणून प्रसिद्ध आहे. ही घंटा पोर्तुगिजांनी तयार केली होती. तिचा नाद चार किलोमीटरपर्यंत ऐकू येत असे.

असे नाशिकचे वर्णन करून ठेवले आहे

नाशिक शहराची सनातन्यांचे नाशिक अशी ओळख असताना नाशिकची वाटचाल सामाजिक सुधारणा आणि क्रांतिकारकांचे गाव अशी झालेली दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अभिनव भारताची मुहूर्तमेढ येथे रचली. कवी गोविंदांनी ”रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?” अशी कविता लिहून या क्रांतीकार्याला हातभार लावलेला दिसतो. म्हणून कवी गोविंदांना स्वातंत्र्यकवी संबोधले जाते. स्वातंत्र्य आंदोलनात नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात अनंत कान्हेरेने जिल्हाधिकारी जॅक्सनचा वध केला आणि या क्रांतिकारी चळवळीचे लोण देशभर पसरले. गोदागौरव लिहिणाऱ्या नाशिकच्या राजकवी चंद्रशेखर गोऱ्हे यांनी नाशिक हे तीर्थांचे माहेर, विद्येचे सागर, कर्तृत्त्वाचा सागर आहे असे नाशिकचे वर्णन करून ठेवले आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

 ( हेही वाचा  दमानिया न्यायालयात गेल्या; भुजबळांच्या अडचणी वाढल्या )

मराठी भाषेची होणारी गळचेपी, हेळसांड थांबवा

मराठी भाषेवर बोलताना भुजबळ म्हणाले की, मराठी ही भाषा अभिजात भाषा आहे. तिला २ हजार २५० वर्षांचा इतिहास असल्याचे शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्यांचे शेकडो पुरावे आपल्या संगमनेरचे प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांच्या अहवालात दिलेले आहेत. हा अहवाल भारत सरकारने नेमलेल्या सर्व भाषातज्ज्ञांनी तपासला आणि एकमताने तो उचलून धरला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही त्यांची शिफारस गेली ७ वर्षे केंद्र सरकारकडे पडून आहे. आपले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समक्ष भेटून मा. पंतप्रधानांकडे तशी लेखी मागणी केलेली असूनही तिला मान्यता मिळालेली नाही. या संमेलनात आमच्या मराठी भाषा विभागाने याबाबतचे सुंदर सादरीकरण केले असून एक फिल्मही तयार केलेली आहे. मराठी ही श्रेष्ठ भाषा असून तिला ५२ बोलीभाषा आहेत. ती अमृतातेही पैजा जिंकणारी असल्याची गर्जना खुद्द ज्ञानोबारायांनीच केलेली आहे. “संस्कृतवाणी देवे केली मग प्राकृत मराठी काय चोरापासून झाली?” असा खडा सवाल संत एकनाथांनी विचारलेला आहे. मराठी भाषेतला पहिला ग्रंथ “गाथा सप्तशती” असल्याचे अभिजात समितीने सिद्ध केलेले आहे. मराठी भाषेची होणारी गळचेपी, हेळसांड आपण थांबविली पाहिजे. भाषा हे संवादाचे माध्यम असते तसेच भाषा ही संस्कृतीची निदर्शक असते. मराठी लावण्यवतीचे वर्णन करणारी लावणी अस्सल मराठी आहे आणि शूर मर्दाचा पोवाडा मराठीतच रचला आणि गायला जातो. आपण मराठी भाषा बोलतो म्हणजे आपण सांस्कृतिक आदानप्रदान करत असतो. कवी कुसुमाग्रज यांची मराठी भाषा आणि मराठी माणसाचे वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता त्यांनी यावेळी सादर केली.

ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो

साहित्यकांबद्दल बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले, नाशिकचा माणूस दुसऱ्याला भरभरून देत असतो. उदारता हा नाशिककरांचा गुण आहे. त्या बळावरच आम्ही तुमचे स्वागत करीत आहोत. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ”राज्यकर्त्यांनो तुम्ही चु्कता आहात” हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. मी एक वाचक आहे. सार्वजनिक जीवनात मी फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करीत असतो. महात्मा फुल्यांनी दुस-या साहित्य संमेलनाचे निमंत्रण १८८५ साली नाकारले होते. त्यांचे म्हणणे होते की “साहित्यकारांनी जातीनिर्मुलनाची भूमिका घेतली पाहिजे.” ते म्हणत असत.

“थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी.

ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा.”

महात्मा फुले पुढे म्हणतात,

” खिस्त महमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी.”

सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले जोती म्हणे, या शब्दात त्यांनी हिंसेचा, रक्तपाताचा निषेध केलेला आहे. महात्मा फुल्यांनी लिहिलेला शेतक-यांचा आसूड आजही कडाडतो आहे. गेले एक वर्षे राजधानीत संघर्ष करणार्या बळिराजापुढे दिल्लीकरांना नमावे लागलेले आहे. पुढे छगन भुजबळ म्हणाले फुले म्हणायचे ” इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.” आता लोक म्हणतात, “ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो” अशी कामना देखील त्यांनी केली.

 ( हेही वाचा :अवकाळी पावसामुळे भाजीपाला महागला! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.