Manipur Violence : चर्चेसाठी सरकार तयार; विरोधकांचा मात्र गोंधळ

176
Manipur Violence : चर्चेसाठी सरकार तयार; विरोधकांचा मात्र गोंधळ
Manipur Violence : चर्चेसाठी सरकार तयार; विरोधकांचा मात्र गोंधळ

वंदना बर्वे

संपूर्ण देशाला मान खाली टाकायला लावणाऱ्या मणिपूरच्या घटनेच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात तीव्र पडसाद उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी रेटून लावली. यामुळे, दोन्ही सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब केल्यानंतर दिवसभरासाठी थांबवावे लागले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाला सुरवात होताच विरोधी पक्षांनी मणिपूरमधील दोन महिलांवर झालेल्या अत्याचारावर चर्चा करण्याची मागणी केली. सरकारने राज्यसभेत अल्पकालिन चर्चा घेण्याची तयारी दर्शविली. परंतु, विरोधकांनी यास कडाडून विरोध दर्शविला. यामुळे दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ निर्माण झाल्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज आधी ११ वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी थांबविण्यात आले.

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावर राज्यसभेत बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मणिपूरमध्ये ‘माणुसकी मरून गेली’ असा दावा केला. राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले की, पंतप्रधानांनी मणिपूर घटनेबाबत मौन तोडले, ही चांगली गोष्ट आहे, पण मणिपूरमध्ये आतापर्यंत काय झाले, लुटमार, मणिपूर जाळपोळीच्या असंख्य घटना घडल्यात. मग पंतप्रधानांनी काय केले? मंत्री गप्प बसले? गृहमंत्री गप्प का होते? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती लावली. एवढेच नव्हे तर, मणिपूरच्या घटनेबाबत सुप्रीम कोर्टाने भाष्य केल्यानंतर पंतप्रधानांनी आपले मौन सोडले. ते आधी गप्प का बसले होते? असा प्रश्न सुध्दा उपस्थित केला. मोदी देशाचे प्रतिनिधित्व करतात. आपल्या देशात अशा घटना घडणे ही शरमेची बाब आहे. विरोधी पक्षांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राज्यसभेतील नेते पियूष गोयल यांनी विरोधी पक्षांवर चर्चा न होवू देण्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले की, मणिपूरच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. परंतु, विरोधकांचा व्यवहार बघून वाटते की त्यांना सभागृहाचे कामकाज चालूच द्यायचे नाही आहे. मुळात, राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सभागृहाला सांगितले. परंतु, मणिपूरच्या मुद्यावरील चर्चा ही नियम २७६ अंतर्गत व्हावी या मुद्यावर विरोधक अडून बसलेत. यासाठी त्यांनी जोरदार गोंधळही घातला. यामुळे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि छत्तीसगड तसेच राजस्थानमध्ये महिलांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. सरकारने मणिपूरच्या घटनेवर चर्चेची तयारी दर्शविली. परंतु, चर्चा झाली तर बंगाल आणि काँग्रेसशासित राज्यांचेही पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही. या भीतीपोटी विरोधकांना सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नाही, असा आरोपही पियूष गोयल यांनी केला.

विरोधक राजकारण करीत आहे

विरोधी पक्ष मणिपूर घटनेचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर म्हणाले की, सरकार चर्चेला तयार आहे. मात्र विरोधकांना त्यापासून पळ काढायचा आहे. विरोधी राज्यांमध्येही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु विरोधक या घटनांकडे मूक प्रेक्षक राहिले आहेत. दुसरीकडे, कॉग्रेस नेते शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर प्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर समाधान केले आहे. आता पंतप्रधानांनी संसदेतही यावर चर्चा करावी असे ते म्हणाले.

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून धिंड काढली. राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. वृत्तसंस्था एएनआयने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सरकारने फेसबुक-ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला हा व्हिडिओ शेअर न करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकार ट्विटरवर कारवाई करू शकते.

देशी आदिवासी नेते मंच (ITLF) ने आरोप केला आहे की, दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार करण्यात आला. दोन्ही महिला कुकी जमातीतील आहेत. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विट करून सर्व खासदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी या घटनेवर संसदेत आधी सरकारकडून उत्तरे द्यावी. काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी ट्विटमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना टॅग केले आणि म्हटले की, एक महिला असून तुम्ही गप्प राहून हे सर्व कसे बघू शकता. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले आहेत.

स्मृती इराणी यांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याशी चर्चा केली

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विट केले की, “मणिपूरमधील दोन महिलांच्या लैंगिक छळाचा व्हिडिओ निंदनीय आणि अमानुष आहे. मी याबाबत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याशी बोलले आहे. त्यांनी मला सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि मला खात्री आहे की सर्व प्रयत्न केले जातील. आरोपींना शासन करण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

(हेही वाचा – Manipur video : मणिपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल; म्हणाले… )

काय आहे एफआयआरमध्ये…

• 4 मे रोजी दुपारी 3च्या सुमारास कांगपोकपी जिल्ह्यातील आमच्या बी. फिनोम गावात सुमारे ८००-१००० लोक आले. घरांची तोडफोड केली, घरे पेटवून देऊन फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भांडी, कपडे आणि रोख रक्कम लुटून नेली.

• आम्हाला संशय आहे की हल्लेखोर मेईतेई युवा संघटना, मेईतेई लिपुन, कांगलेपाक कानबा लुप, आरामबाई टेंगगोल, वर्ल्ड मेईतेई कौन्सिल आणि अनुसूचित जमाती मागणी समितीचे होते.

• हल्लेखोरांच्या भीतीने बरेच लोक जंगलात पळून गेले, त्यांना नॉन्गपोक सेकमाई पोलिसांनी वाचवले. हल्लेखोरांकडे अनेक शस्त्रेही होती. सर्व लोकांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली.

• त्यांनी ५६ वर्षीय सोइटिंकम वायफेईची हत्या केली. यानंतर तीन महिलांचे जबरदस्तीने कपडे काढण्यात आले.

• हल्लेखोरांनी महिलांवर सामूहिक बलात्कार केला. एका महिलेच्या भावाने आपल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोरांनी त्याचा बळी घेतला.

पोलिस म्हणाले आरोपींचा शोध सुरू

मणिपूर पोलिसांनी सांगितले, व्हिडिओमध्ये जमाव महिलांची छेड काढताना दिसत आहे. महिला रडत रडत गर्दी करत आहेत. याप्रकरणी नांगपोक सकमाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.