Abhishek Ghosalkar Murder : पोलिस आता मुंबईतील शस्त्र परवाना असणाऱ्या 11 हजार 500 जणांची चौकशी करणार

या चौकशीत परवानाधारक लोकांचे कुणाशी वाद आहेत का? ते सध्या काय करतात? ते स्वतः कुठल्या तणावात आहेत का? अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्यात येणार आहे.

377
मागील काही दिवसांपासून राज्यात थेट गोळीबार करून आपल्या शत्रूला संपवण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशा प्रकारे मुंबईसह राज्यात अशा चार घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वैयक्तिक शस्त्राचा वापर झाल्याचे दिसले आहेत. दोन दिवसांपूर्वीच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder) यांच्यावर देखील गोळीबार झाला असून, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुंबई पोलीस आता अलर्ट झाले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील (Mumbai) शस्त्र परवान्यांची (Weapons License) पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून हाती घेतले आहे. मुंबईत तब्बल 11 हजार 500 जणांकडे शस्त्र परवाना आहेत, त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

चौकशीचे काय स्वरूप असणार? 

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजकीय व्यक्ती, व्यावसायिक तसेच सुरक्षारक्षक यांच्याकडे असणाऱ्या शस्त्राच्या परवान्याची माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्यांचे परवाने संपलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे परवानेच नाहीत, बोगस शस्त्र परवाने बाळगणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येणार आहे. या चौकशीत परवानाधारक लोकांचे कुणाशी वाद आहेत का? ते सध्या काय करतात? ते स्वतः कुठल्या तणावात आहेत का? अशा विविध गोष्टींचा आढावा घेण्यात येणार आहे. शस्त्र परवाना नसतांना त्याचा वापर करणाऱ्या लोकांवर मुंबई पोलिसांकडून सतत कारवाई करण्यात येते. सोबतच मुंबईत गावठी कट्टे येण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधील अनेक परप्रांतीय कामाच्या निमित्ताने मुंबईत येत असतात. अशात काहींकडून मुंबईत गावठी कट्टे आणून विकल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मागील काही दिवसांत हे प्रमाण वाढले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.