Donald Trump यांचा माध्यमांना मोठा दणका! CNN, MS NOW अन् पॉलिटिकोच्या पत्रकारांसाठी व्हाईट हाऊसची दारं बंद; नेमकं कारण काय?

Donald Trump यांचा माध्यमांना मोठा दणका! CNN, MS NOW अन् पॉलिटिकोच्या पत्रकारांसाठी व्हाईट हाऊसची दारं बंद; नेमकं कारण काय?

13
Donald Trump bans CNN MS NOW Politico
Donald Trump bans CNN MS NOW Politico

Donald Trump bans CNN MS NOW Politico : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी प्रसारमाध्यमांविरोधात पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेतील ‘सीएनएन’ (CNN), ‘एमएसएनबीसी’ (MSNBC) आणि ‘पॉलिटिको’ (Politico) या वृत्तसंस्थांना ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ट्रम्प यांनी या तिन्ही संस्थांवर एकांगी वार्तांकन आणि ‘फेक न्यूज’ (खोट्या बातम्या) पसरवल्याचा गंभीर आरोप केला असून, ही बंदी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

खोट्या बातम्या आणि अफवा सहन करणार नाही

या निर्णयाची घोषणा करताना ट्रम्प यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट लिहून वृत्तसंस्थांवर जोरदार हल्लाबोल केला. देशात प्रामाणिक आणि सत्य वार्तांकन झालेच पाहिजे, असा ठाम दावा ट्रम्प यांनी केला आहे. जर इतर माध्यमांनी आपली भूमिका बदलली नाही, तर त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

पोस्टमध्ये ट्रम्प यांनी काय म्हटलंय?

“मला हे जाहीर करताना अभिमान वाटतोय की, सातत्याने खोट्या बातम्या देणाऱ्या ‘सीएनएन’, ‘एमएसएनबीसी’ आणि ‘पॉलिटिको’ या संस्थांवर व्हाईट हाऊसमधून तात्काळ बंदी घातली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प प्रशासन किंवा अमेरिकेबद्दल वृत्त देताना माध्यमांना कपोलकल्पित गोष्टी आणि खोटी माहिती पसरवण्याचा अधिकार नाही.”

बायडन प्रशासनावर भ्रष्टाचाराचा आरोप

आपल्या वक्तव्यात ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावरही गंभीर निशाणा साधला. ‘पॉलिटिको’ या वृत्तसंस्थेला सुरू ठेवण्यासाठी बायडन सरकारने बेकायदेशीरपणे ८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६५ कोटी रुपयांहून अधिक) निधी दिल्याचा खळबळजनक आरोप ट्रम्प यांनी केला. हा सरळसरळ भ्रष्टाचार असल्याचे सांगत, त्यांनी एमएसएनबीसी वाहिनीच्या घसरत्या लोकप्रियतेवरही टोमणा मारला. तसेच एमएसएनबीसीने (MSNBC) आपली विश्वासार्हता आणि दर्शकसंख्या घसरल्यामुळेच नाव बदलून ‘एमएसनाऊ’ (MSNOW) केल्याचा टोलाही लगावला.

माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत

डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन प्रसारमाध्यमांमधील वाद नवीन नाही. पहिल्या कार्यकाळापासूनच ट्रम्प हे सीएनएनसह मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांवर ‘फेक न्यूज’ आणि ‘प्रोपोगंडा’ चालवल्याचा आरोप करत आले आहेत. मात्र, थेट व्हाईट हाऊसचेच दरवाजे बंद केल्यामुळे अमेरिकन पत्रकारितेच्या इतिहासातील ही एक चिंताजनक घटना मानली जात आहे.

ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील माध्यम वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, ही कारवाई म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचे मत वरिष्ठ पत्रकारांकडून व्यक्त केले जात आहे. आता या बंदीविरोधात वृत्तसंस्था न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

हेही पाहा –
https://youtu.be/WMfjMkEdkLc

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.