LIC Reliance Capital Investment Case : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) गुंतवणुकीतील कथित गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रिलायन्स कॅपिटल लिमिटेडविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे माजी अध्यक्ष तसेच काही अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात समावेश आहे.
एलआयसीच्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. तक्रारीनुसार, २०१२ ते २०१८ या कालावधीत एलआयसीने रिलायन्स कॅपिटलच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्समध्ये (NCDs) तब्बल ३,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. कंपनीच्या आर्थिक गरजा भागवणे, व्यावसायिक कामकाजासाठी निधी उपलब्ध करून देणे आणि जुन्या कर्जाची परतफेड करणे, यासाठी या निधीचा वापर अपेक्षित होता.
मात्र, या निधीचा कथितपणे ठरवून दिलेल्या उद्देशाव्यतिरिक्त वापर करण्यात आल्याचा आरोप एलआयसीने केला आहे. आरोपींनी संगनमत करून गुंतवणुकीच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे एलआयसीला सुमारे २,६८५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सीबीआयने नमूद केले आहे. या प्रकरणी रिलायन्स कॅपिटल, कंपनीचे माजी अध्यक्ष आणि अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीबीआयकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणातील आरोप अद्याप तपासाधीन असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच कथित गैरव्यवहारातील नेमकी जबाबदारी स्पष्ट होणार आहे.
Join Our WhatsApp Community

