काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमावरून राजकीय वातावरण टोकाला पोहोचले आहे. इंदूर पोलिसांनी या सभेसाठी तब्बल ३१ कडक अटी लादल्या असून, चक्क भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या ‘न्यायमूर्ती वर्मा आयोगा’च्या अहवालाचा थेट संदर्भ या आदेशात दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या सभेला त्यांच्याच वडिलांच्या हत्याकांडाचा दाखला दिल्याने काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.
सुरक्षा आदेशात नेमकं काय?
इंदूर पोलिसांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिंटू चौकसे यांना दिलेल्या परवानगी पत्रात २१ मे १९९१ रोजी श्रीपेरंबुदूर येथे झालेल्या राजीव गांधी यांच्या आत्मघाती बॉम्बस्फोटातील हत्येचा उल्लेख केला आहे. त्या दुर्घटनेत सुरक्षेतील त्रुटी आणि आयोजकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे वर्मा आयोगाने म्हटले होते, असा दाखला देत पोलिसांनी आयोजकांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. स्वतःच्या वडिलांच्या हत्येचा उल्लेख सुरक्षा पत्रात केल्यामुळे हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत स्फोटक ठरला आहे.
कोचिंग क्लासेस आणि हॉस्टेल चालकांवर हमीपत्राची टांगती तलवार
या सभेला येणाऱ्या विद्यार्थ्यांवरून पोलिसांनी शहरातील कोचिंग क्लासेस आणि वसतिगृह (हॉस्टेल) चालकांनाही वेठीस धरले आहे. या संस्थांचे विद्यार्थी सभेत सहभागी झाल्यास संबंधित चालकांना सुरक्षा स्वयं-प्रमाणपत्र लिहून देणे सक्तीचे केले आहे. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची वा सुरक्षेची काही अडचण उद्भवल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचीच राहील, या अटीमुळे संस्थाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाचे कडक निर्बंध
आयडीए ग्राउंडवर होणाऱ्या या सभेसाठी प्रशासनाने अत्यंत जाचक नियमावली आखली आहे. सभेत येणाऱ्या महिला-पुरुषांची संख्या, त्यांचे जिल्हे, तालुके व कॉलेजेसचा तपशील पोलिसांना द्यावा लागेल. वाहनांचे क्रमांक, चालकांचे फोन नंबर, प्रवासाचा मार्ग आणि पार्किंग व्यवस्था आधीच सादर करावी लागेल. संपूर्ण मैदान प्रत्येकी २ हजार क्षमतेच्या विविध सेक्टर्समध्ये विभागले जाईल. व्यासपीठापुढे ३० फुटांची जागा रिकामी ठेवावी लागेल आणि ६ मीटर रुंदीचा इमर्जन्सी कॉरिडॉर बंधनकारक असेल. मैदानात २० डोअर-फ्रेम मेटल डिटेक्टर्स, ३० ते ४० हँड-हेल्ड डिटेक्टर्स, ६ प्रवेशद्वार आणि ८ बाहेर पडण्याचे मार्ग असतील. महिलांसाठी स्वतंत्र तपासणी पथके तैनात राहतील.
काँग्रेस आक्रमक; भाजपकडून पलटवार
या प्रकारावर संताप व्यक्त करताना मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, “राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सभेच्या सुरक्षा पत्रात त्यांच्याच वडिलांच्या हत्येचा संदर्भ देणे, ही इतिहासातील अत्यंत विकृत घटना आहे. २०१९ मध्ये यांची SPG सुरक्षा काढून घेतली आणि आता अशा प्रकारे घाणेरडे राजकारण केले जात आहे.”
दुसऱ्या बाजूला, भाजपचे प्रवक्ते राकेश सिंह यादव यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. कार्यक्रमात कोणतीही सुरक्षा त्रुटी राहू नये म्हणूनच वर्मा आयोगाच्या अहवालाचा संदर्भ मार्गदर्शक म्हणून देण्यात आला आहे. काँग्रेस सभेच्या गर्दीची योग्य आकडेवारी लपवत आहे. उद्या काही दुर्घटना घडली, तर हीच काँग्रेस सरकारवर खापर फोडेल, असा पलटवार यादव यांनी केला. तर पोलिसांनी यावर बोलताना सांगितले की, सुरक्षेच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठीच हा संदर्भ मार्गदर्शक म्हणून वापरला गेला आहे. (Rahul Gandhi)
सभेच्या ठिकाणावरून आधीही झाला होता वाद
राहुल गांधींचा हा कार्यक्रम आधी नेहरू स्टेडियमवर होणार होता; मात्र नागरी प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत तिथे परवानगी नाकारली होती. त्यामुळे काँग्रेसला ठिकाण बदलून आयडीए ग्राउंडवर जावे लागले. भाजप सरकार जाणूनबुजून राहुल गांधींचा विद्यार्थ्यांशी होणारा संवाद रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
Join Our WhatsApp Community


