UWA Mumbai : मुंबईत ऑस्ट्रेलियाची ‘एंट्री’; ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या जागतिक केंद्राकडे महाराष्ट्राची मोठी झेप

12
UWA Mumbai
UWA Mumbai
  • प्रतिनिधी 

UWA Mumbai : मुंबईची ओळख आर्थिक राजधानी म्हणून आहे. मात्र आता हीच मुंबई जागतिक दर्जाचे शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम यांचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया अर्थात यूडब्ल्यूएने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत सुरू केला असून, या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शैक्षणिक तसेच ज्ञानाधिष्ठित सहकार्याला नवी दिशा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा यांच्यासह विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठाचा कॅम्पस सुरू होणे हे शहराच्या वाढत्या जागतिक महत्त्वाचे द्योतक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेली मुंबई भविष्यात जागतिक ज्ञान व नवोपक्रम केंद्र म्हणून विकसित करण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईलगत विकसित होत असलेल्या ‘मुंबई ३.०’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरची परिसंस्था उभारण्यावर भर दिला जात आहे. संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकासाला चालना देणारी नवी केंद्रे या माध्यमातून विकसित केली जात असल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याची नवी दारे खुली झाली आहेत. पूर्वी उच्च शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागत होते; आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत आहेत. या प्रक्रियेत महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यूडब्ल्यूएच्या मुंबई कॅम्पसमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण मिळण्याबरोबरच मुंबईतील वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांशी थेट संपर्क साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्यसेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांत संयुक्त संशोधनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – ‘आधी आदित्य ठाकरेंची ग्रहदशा का बदलली, याचे आत्मचिंतन करा’; मोदींच्या ग्रहदशेवरून BJP चा राऊतांना टोला )

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडे उत्कृष्ट संशोधन क्षमता, तर महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात प्रतिभा, उद्योग आणि संधी आहेत. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील ज्ञानाधिष्ठित भागीदारी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा महत्त्वाचा आधार ठरू शकते, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यूडब्ल्यूएला महाराष्ट्राच्या विकासप्रवासातील भागीदार म्हणून राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक यांनी मुंबईतील कॅम्पसचे उद्घाटन हा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि भारत, विशेषतः महाराष्ट्रातील संबंधांमधील ऐतिहासिक टप्पा असल्याचे सांगितले. गेल्या तीन दशकांपासून मुंबई हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या भारतातील सहभागाचे महत्त्वाचे केंद्र राहिले असून शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, उद्योग आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून दोन्ही प्रदेशांमध्ये सहकार्य विकसित झाले आहे. मुंबई कॅम्पसमुळे विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण, संशोधन, उद्योग सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर यांनी मुंबई आणि चेन्नई येथील कॅम्पससाठी सुमारे ८० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती दिली. भारत-ऑस्ट्रेलिया संबंध अधिक दृढ करण्याच्या विद्यापीठाच्या बांधिलकीचे हे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, ज्ञान आणि जागतिक संधी उपलब्ध करून देण्यावर यूडब्ल्यूएचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत यूडब्ल्यूएचा कॅम्पस सुरू करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्य शासनाने केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. विद्यापीठाने तीन भारतीय विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती जाहीर केल्याचे त्यांनी स्वागत केले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा परदेशी शिक्षणासाठी होणारा परकीय चलनातील खर्च वाचण्यास मदत होणार असून, विद्यापीठाच्या संशोधनकेंद्री उपक्रमांचा राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध विद्यापीठांचे कॅम्पस ‘एज्युकेशन सिटी’मध्ये उभारले जात असून, भविष्यात येथे सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

यूडब्ल्यूएचा मुंबई कॅम्पस हा केवळ परदेशी विद्यापीठाचा नवा शैक्षणिक परिसर नसून, मुंबईला जागतिक ज्ञान, संशोधन, नवोपक्रम आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.