-
मुंबई प्रतिनिधी
DCM Eknath Shinde : राज्यात कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची कमतरता अशा दोन्ही परिस्थिती निर्माण होत आहेत. तरीही राज्य सरकारने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली आली असून नुकसानीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावी बोलताना दिली.
गणेशोत्सवानिमित्त शिंदे हे गावी आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्याच्या काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे यांनी, काही भागात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाले असून, अशा ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही दिली.
(हेही वाचा – UWA Mumbai : मुंबईत ऑस्ट्रेलियाची ‘एंट्री’; ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाच्या जागतिक केंद्राकडे महाराष्ट्राची मोठी झेप )
विदर्भ आणि विशेषतः मराठवाड्यात काही भागांत पावसाने ओढ दिल्याने उभी पिके करपल्याचे आणि शेतीचे नुकसान झाल्याचे शिंदे यांनी यावेळी मान्य केले. धाराशिव जिल्ह्यातील परिस्थितीबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागांचा पालकमंत्री दौरा करत असून, आपणही संबंधित भागांना भेट देणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सवानिमित्त दरे गावी आलेल्या शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बांबूसह विविध वृक्षांची लागवड केली. गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह जगभरातील मराठी समाजासाठी मोठा सांस्कृतिक महोत्सव असल्याचे सांगत त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे आवाहन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

