Mumbai Crime : शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला तब्बल १ कोटी ८९ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा मुंबई पोलिसांच्या पश्चिम प्रादेशिक विभाग सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे.या गुन्ह्यात सायबर ठगांना फसवणुकीच्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी बनावट चालू बँक खाती उघडून पुरवणाऱ्या टोळीतील चार जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आरोपींकडून सुमारे ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून विविध बँक खात्यांमधील २८ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक रक्कम गोठविण्यात तपास पथकाला यश आले आहे.विठ्ठल लक्ष्मण वाघमोडे (वय ३६, रा. इंदापूर, पुणे), रमेश हरिबा लवंगारे (वय ४९, रा. कामोठे, नवी मुंबई), नानासाहेब अरुण पारखे (वय ३३, रा. कळंबोली, पनवेल) आणि अमोल शांतीलाल कुंभार (वय ३९, रा. कामोठे, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदाराशी सायबर भामट्यांनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला होता. त्यानंतर ‘NAM AMC HNW’ नावाचे बनावट शेअर मार्केट ट्रेडिंग अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले. चांगल्या नफ्याचे आणि हमीच्या परताव्याचे प्रलोभन दाखवून तक्रारदाराकडून वेळोवेळी तब्बल १ कोटी ८९ लाख २५ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांत भरून घेतले. मात्र, परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
(हेही वाचा – Pune Beed Train: पुणे-बीड प्रवास आता सात तासांत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन; पाहा वेळापत्रक )
तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा माग काढला असता नवी मुंबई व पुण्यात सक्रिय असलेल्या एका टोळीची माहिती पोलिसांच्या हाती लागली. अटक आरोपी रमेश लवंगारे हा ‘786-Wisdom Launch Club’ नावाच्या टेलिग्राम व व्हॉट्सअॅप ग्रुपचा सदस्य होता. या ग्रुपच्या सांगण्यावरून तो विविध व्यक्तींच्या नावे बनावट खाती उघडून ती सायबर भामट्यांना पुरवत असे. आरोपी विठ्ठल वाघमोडे याने बँक ऑफ इंडियामध्ये चालू खाते (करंट अकाउंट) उघडून ते या सायबर टोळीला दिले होते. नानासाहेब पारखे याने हे खाते उघडण्यास मदत केली होती. तक्रारदाराचे पैसे या खात्यात (प्रथम लेयर बेनिफिशिअरी) जमा होताच पारखे आणि अमोल कुंभार यांनी ते स्वतःच्या खात्यावर वळवून आपापसात वाटून घेऊन परस्पर विल्हेवाट लावली होती.
सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून या चारही आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून ६ अँड्रॉइड मोबाईल हँडसेट आणि ९ लाख ८६ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करत आरोपींच्या खात्यांवरील २८ लाख ५६ हजार २९३ रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहायक पोलीस आयुक्त सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, अंजली वाणी, शंकर पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी सावले, पोलीस अंमलदार केशव तकीक व मोहित नेलावडे यांच्या पथकाने केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

