-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सृष्टी बाविस्कर यांच्यासह डॉ. वैभव साळुंखे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करणाऱ्या प्रकरणातील शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्यासह उर्वरित चारही आरोपींची ओळख परेड मंगळवारी दुपारी कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्या समक्ष आधारवाडी कारागृहात पार पडली. अत्यंत कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या ओळख परेडच्या वेळी पिडीत डॉक्टर डॉ. साळुंखे यांनी आरोपी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर चारही आरोपींना अचूक ओळखल्याची माहिती डॉ. साळुंखे यांचे वकील ॲड. अभिनय अडसुळ यांनी दिली. (Dombivli)
मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीनगर रूग्णालय हिंसाचार प्रकरणाचा तपास सुरू आहे. रमेश म्हात्रे यांनी ज्या पद्धतीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत डॉ. वैभव साळुंखे यांना मारहाण केली आणि वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सृष्टी बाविस्कर यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली, या सर्व प्रकाराबद्दल उच्च न्यायालयाने वेळोवेळी तीव्र नाराजी व संताप व्यक्त करत रमेश म्हात्रे यांच्यासह इतर आरोपींना जामीन देण्यास इन्कार केला आहे. (Dombivli)
कर्तव्यावर असताना झालेल्या मारहाणीनंतरही डाॅ. वैभव साळुंखे यांनी जिवाला असल्याने आईसह डोंबिवलीहून वाशिम जिल्ह्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी न्यायालयासमोर जबाब देण्यासाठी अनेक वेळा डाॅ. साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. मात्र सुरक्षेची हमी मिळत नसल्याने ते जबाबासाठी न्यायालयात येत नव्हते. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून त्यांचा जबाब वाशिम येथील जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलिस बंदोबस्तात नोंदविण्यात आला. ओळख परेड करण्यासाठी डाॅ. साळुंखे यांना कल्याणला आणताना पोलिस बंदोबस्त मिळणे आवश्यक असल्याची मागणी त्यांचे वकील ॲड. अभिनय अडसुळ यांनी केली होती. त्याची दखल घेत डाॅ. साळुंखे यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात कल्याणच्या आधारवाडी कारागृहात मंगळवारी आणण्यात आले. (Dombivli)
वरिष्ठ पोलिस अधिकारी, तुरूंगाधिकारी यांच्या उपस्थितीत कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांच्या समक्ष डाॅ. वैभव साळुंखे यांना ओळख परेडसाठी आरोपी रमेश म्हात्रे (७१) याच्यासह सहआरोपी रमेश लक्ष्मण पवार (५०), प्रकाश उध्दव निकम (३५), अक्षय शरद कारंडे (३०) आणि साधना संजय कारंडे (५२) यांच्या समोर उभे केले. त्यावेळी डाॅ. साळुंखे यांनी आपणास शिवीगाळ करत मारहाण करणारे हेच इसम असल्याचे तपास यंत्रणेला सांगितले. (Dombivli)
(हेही वाचा – BCCI Review Meeting : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतरची बीसीसीआय आढावा बैठक रखडली, संघाच्या कामगिरीचे होणार होते मूल्यमापन)
धमक्यांची तपास यंत्रणांकडून नोंद
या प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपींकडून पिडीत डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्यांचे फोन कॉल्स आल्याचा मुद्दाही समोर आला आहे. तपास यंत्रणेने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे. हिंसाचाराच्या या घटनेमुळे सरकारी रूग्णालतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय संघटनांकडून केली जात आहे. (Dombivli)
(हेही वाचा – Eye Check-up Camp : महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तळवली येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबीर संपन्न)
दबाव टाकणाऱ्यांचीही चौकशी होणार
डाॅ. वैभव साळुंखे यांना कर्तव्यावर असताना रूग्णालयात मारहाण केल्यानंतर रमेश म्हात्रे यांच्या चिथावणीकरून काही अज्ञातांनी तब्बल ९४ वेळा फोन कॉल्सद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे आता तपासा दरम्यान उघडकीस आले आहे. हे सर्व कॉल्स डॉ. साळुंखे यांना त्यांच्या मोबाईलवर आल्याचे तांत्रिक तपासातून उघड झाले आहे. अनोळखींनी टाकलेल्या अशा पद्धतीच्या दबावामुळे जिवाच्या भितीपोटी डाॅ. साळुंखे यांनी त्यांचा मोबाईल काही दिवस बंद ठेवला होता. या फोन काॅल्सची तांत्रिक चिकित्सा तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. दबाव टाकणाऱ्यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

