Veer Guardian 2026 : राजस्थानमधील जोधपूर येथील हवाई तळावर सुरु असलेला भारत आणि जपानच्या हवाई दलांचा ‘वीर गार्डियन-२०२६’ हा संयुक्त सराव अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.. या सरावादरम्यान, जपानच्या ‘एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स’चे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरीता यांनी भारताच्या स्वदेशी तेजस या विमानाचं उड्डाण केलं आहे.
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी या उड्डाणाला जपानचा या विमानांवरील ‘विश्वास’ दर्शवणारं हे उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. अमर प्रीत सिंग यांनी म्हटलं की, “भारतीय लढाऊ विमान उडवण्याचा ताकेहिरो मोरीता यांचा निर्णय देशाच्या स्वदेशी बनावटीच्या विमानांवरील विश्वास दर्शवतो.” “तुम्ही ‘तेजस’मधून केलेलं उड्डाण हे भारतीय बनावटीच्या विमानांवर तुमचा किती विश्वास आहे, याचं एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. मला खात्री आहे की विशेषतः लढाऊ विमानांच्या उड्डाण प्रशिक्षणासह विविध क्षेत्रांतील देवाणघेवाण कार्यक्रमांना चालना देण्यात या उड्डाणाची मोठी भूमिका असेल”, असंही सिंग यांनी म्हटलं आहे.
‘हा सराव भागीदारीतील एक पाऊल’
“मी असं म्हणू शकतो की ‘वीर गार्डियन २०२६’ हा केवळ एक सराव नव्हता. आमच्या भागीदारीतील हे आणखी एक महत्वाचं पाऊल आहे. ही भागीदारी आमच्या प्रत्येक संयुक्त उपक्रमाबरोबर अधिक दृढ होत जात आहे. ही भागीदारी परस्पर शिकण्याच्या संधी, अधिक चांगली परस्पर कार्यक्षमता आणि प्रत्यक्ष मैदानात कार्यरत असलेल्या आमच्या हवाई योद्ध्यांमध्ये अधिक घनिष्ठ मैत्री निर्माण करण्याचे नवीन मार्ग खुले करत राहील. दोन्ही हवाई दलांसाठी कोणतीही गोष्ट साध्य करणं अशक्य नाही आणि आम्ही ही भागीदारी अधिक वाढवत राहू”, असं मत एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी व्यक्त केलं.
काय म्हणाले जपानचे हवाई दल प्रमुख?
रनवेवर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना जनरल ताकेहिरो मोरीता म्हणाले, “तेजस हे भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे एक उत्कृष्ट प्रतीक आहे.” तेजसमधून उड्डाण करण्याचा अनुभव हा अमूल्य असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या हवाई दलांमध्ये गेल्या अनेक वर्षांत निर्माण झालेला दृढ विश्वास, आत्मविश्वास आणि मैत्री या अनुभवातून अधोरेखित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारत-जपान हवाई दलांचा सराव
जोधपूरमध्ये सुरू असलेल्या या सरावात दोन्ही देशांची हवाई दले युद्धसदृश परिस्थितीत विविध हवाई मोहिमांचा सराव करत आहेत. भारतीय हवाई दलाची तेजस, सुखोई-३० एमकेआय आणि राफेल लढाऊ विमानं, तर जपानच्या हवाई स्वसंरक्षण दलाची एफ-२ए विमानं या सरावात सहभागी झाली आहेत. मोहीम नियोजन, विषय तज्ज्ञांची देवाणघेवाण, अभियांत्रिकी आणि अंतराळ सुरक्षेबाबतही चर्चा झाली. ९ सप्टेंबरला सुरू झालेला हा सराव २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भारत-जपानमधील संरक्षण सहकार्य मजबूत करणं आणि दोन्ही हवाई दलांमधील कार्यान्वयन समन्वय वाढवणं, हा या सरावाचा उद्देश आहे. अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community


