
Monsoon update : राज्यभरातील नागरिक आणि विशेषत: शेतकरी मान्सूनच्या (Monsoon Maharashtra) दमदार पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत असताना, यंदा नैऋत्य मान्सूनची वाटचाल महाराष्ट्रात संथ झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणातील काही भागांत दाखल झालेल्या मान्सूनचा वेग आता मंदावला असून, त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पावसाची प्रतीक्षा लांबली आहे. यामुळे एकीकडे शेतकरी आणि गुरे हवालदिल झाले असून, दुसरीकडे शहरांमध्येही पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे.
मान्सून नेमका कुठे अडकला?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, मान्सूनने 8 जून रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये प्रवेश केला. मात्र त्यानंतर वातावरणीय परिस्थिती प्रतिकूल झाल्याने त्याची प्रगती थांबली. अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांचा अभाव, कमी झालेला ओलावा आणि अल निनो क्षेत्रांचा वाढता प्रभाव (El nino) यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यासाठी आवश्यक अनुकूलता मिळाली नाही.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली वातावरणीय प्रणाली कमकुवत पडल्याने महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावला आहे.
राज्यात पावसाची मोठी तूट
मान्सूनच्या संथ वाटचालीचा परिणाम पावसाच्या आकडेवारीवरही दिसून येत आहे. 4 जून ते 18 जून या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा सुमारे 41 टक्के कमी पाऊस नोंदवण्यात आला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाची लक्षणीय तूट आहे.
विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी व्यापक आणि सातत्यपूर्ण मान्सून पाऊस अद्याप झालेला नाही.
मान्सूनच्या विलंबाचा सर्वाधिक परिणाम मुंबईवर झाला आहे. यंदाचा जून महिना गेल्या 12 वर्षांतील सर्वात कोरड्या जून महिन्यांपैकी एक ठरत असल्याचे वृत्त समोर आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठाही चिंतेचा विषय बनला असून प्रशासनाने काही निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे.
पुढील काही दिवसांचा अंदाज काय?
IMD च्या ताज्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये केवळ तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र 23 ते 25 जूनदरम्यान वातावरणीय स्थितीत बदल होण्याची चिन्हे असून, कोकण किनारपट्टीसह राज्यातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढू शकते.
हवामान विभागाने असेही नमूद केले आहे की, 23 जूनच्या सुमारास मान्सून पुन्हा सक्रिय होऊन देशाच्या मध्य आणि पूर्व भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसू शकतो.
मान्सूनच्या प्रतीक्षेमुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे नियोजन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक शेतकरी जोरदार व सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहत आहेत. हवामान विभागाने अद्याप घाईघाईने पेरणी न करण्याचा आणि स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Join Our WhatsApp Community
