Kolhapur : जन्मत:च दोन्ही हात नाहीत, तरी जिद्दीच्या जोरावर बनली मुंबई महापलिकेत अधिकारी; माऊली आडकुरची प्रेरणादायी कहाणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी कोल्हापूरची वाघीण

225
Mauli Adkur, a determined woman from Kolhapur, with Mumbai's municipal building.
Mauli Adkur overcame physical challenges to succeed in her career.

Kolhapur : जन्मतः दोन्ही हात नसणे ही अनेकांसाठी आयुष्यभराची मर्यादा ठरू शकते, अशा व्यक्ती खरोखरच पूर्णत: खचून जाऊ शकतात, स्वप्ने पाहणे तर सोडा पण नॉर्मल आयुष्य जगणेही आपल्या नशीबी नाही..असे म्हणून हार मानू शकतात. मात्र, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करता येतात, हे सिद्ध करून दाखवले आहे कोल्हापूरच्या माऊली आडकुर (Mauli Adkur) हिने. कोल्हापूरच्या या धाडसी लेकीने, शारीरिक अडचणींना शरण न जाता तिने शिक्षण, नोकरी आणि स्वावलंबनाचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आणि आज ती मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणून रुजू झाली आहे.

विशेष म्हणजे, आता माऊलीचे पुढचे लक्ष्य आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे.

जन्मापासूनच कठीण परिस्थितीशी सामना

माऊलीला जन्मत:च दोन्ही हात नव्हते. लहानपणापासून प्रत्येक साध्यासाध्या गोष्टीसाठी झगडणे तिच्या नशीबी होते. मात्र तिने कधीही स्वतःची दया केली नाही किंवा परिस्थितीला दोष दिला नाही. इतर मुले हातांनी जी कामे करत होती, ती कामे त्यांनी पायांच्या सहाय्याने करण्याचा सराव केला.

हळूहळू तिने लिहिणे, जेवणे, मोबाईल वापरणे, संगणक हाताळणे यांसारखी दैनंदिन कामे स्वतःच्या बळावर आत्मसात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण हार मानण्याऐवजी तिने त्या आव्हानांवर मात करण्याचा मार्ग निवडला.

हेही वाचा: Monsoon : पाऊस रुसला, गोठ्यातील ‘जीव’ कासावीस; बळीराजासमोर चारापाण्याचा नवा पेच

कमालीची जिद्द आणि मेहनत

शालेय जीवनात अनेकदा लोकांच्या कुतूहलपूर्ण नजरा आणि प्रश्नांना सामोरे जावे लागले. तरीही तिने शिक्षणाकडे पाठ फिरवली नाही. पायांच्या सहाय्याने लेखन करत आपला अभ्यास पूर्ण केला. प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याची तिची धडपड सुरूच राहिली.

शारीरिक मर्यादा असल्या तरी मानसिक ताकद अधिक महत्त्वाची असते, हा संदेश माऊलीच्या प्रवासातून आपल्याला मिळतो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले.

महापालिकेत अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास

अनेक अडथळ्यांवर मात करुन, परीक्षा आणि मुलाखतींमध्ये उत्तीर्ण होऊन अखेर माऊलीने मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणून स्थान मिळवले. हा टप्पा तिच्या आयुष्यातील मोठा मैलाचा दगड ठरला. तिच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. माऊलीने स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेली ही नोकरी केवळ वैयक्तिक यश नसून, दिव्यांग व्यक्तींसाठी प्रेरणेचा स्रोत ठरली आहे.

कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडताना माऊली इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करते. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर कोणतीही मर्यादा आड येत नाही, हे तिने कृतीतून दाखवून दिले आहे.

हेही वाचा: BEST Bus Strike : मुंबईकरांच्या रोजच्या जगण्यावर गदा; बेस्ट संपाचा भडका, नेमका पेच काय?

आता MPSCचे लक्ष्य

महापालिकेत अधिकारी म्हणून काम करत असतानाच, माऊलीने पुढील ध्येय निश्चित केले आहे. माऊलीला आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय क्षेत्रात आणखी मोठी जबाबदारी स्वीकारायची आहे.

त्यासाठी ती नियमित अभ्यास करत असून स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे मोठे आव्हान असले, तरी माऊलीच्या जिद्दीसमोर तेही छोटेच ठरेल यात शंका नाही.

माऊली आडकुरची कहाणी ही केवळ वैयक्तिक पातळीवरील यशोगाथा नाही, तर व्यंग असूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा देणारा जीवनाचा एक धडा आहे. शरीराला मर्यादा असल्या तरी स्वप्नांना मर्यादा नसतात, हे त्यांनी आपल्या आयुष्यातून सिद्ध केले आहे.

आज माऊलीच्या प्रवासातून अनेक तरुण, विशेषतः दिव्यांग व्यक्तींना नवी प्रेरणा मिळत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचा मार्ग नक्कीच गाठता येतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे माऊली आडकुर.

https://www.youtube.com/watch?v=hJQLF2nZFf4
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.