बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या संशयिताची छायाचित्र.
देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या देशविरोधी जाळ्याचा छडा लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. बिहार आणि मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) एका संयुक्त मोहिमेदरम्यान बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातून (Madhubani District) एका छुप्या हस्तकाला ताब्यात घेतले आहे. इजहार-उल-हक असे अटक (Izhar-ul-Haq arrested) करण्यात आलेल्या ५६ वर्षीय संशयिताचे नाव असून, तो एका मदरसा आडून देशविरोधी कारवाया करत असल्याचा गंभीर आरोप आहे. या कारवाईमुळे अनेक राज्यांमध्ये पसरलेले कट्टरपंथीयांचे जाळे समोर आले आहे. (Bihar)
इंटरनेटच्या माध्यमातून परदेशी संपर्कात असल्याचा संशय
सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला संशयित गेल्या काही काळापासून इंटरनेटवरील गुप्त बैठकांच्या (गूगल मीट) माध्यमातून पाकिस्तानातील प्रमुखांच्या संपर्कात होता. त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यामध्ये अनेक आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक व्हिडीओ आढळून आल्या आहेत. हा संशयित स्थानिक पातळीवर तरुणांची माथी भडकावून त्यांना या देशविरोधी जाळ्यात ओढण्याचे काम करत होता. तसेच या संपूर्ण व्यवस्थेसाठी लागणाऱ्या आर्थिक पुरवठ्याची जबाबदारीही तो सांभाळत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. (Bihar)
आंतरराज्यीय प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला होता. मधुबनीच्या स्थानिक न्यायालयाने संशयिताची रवानगी मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात (ट्रान्झिट रिमांड) केली असून, त्याला पुढील चौकशीसाठी भोपाळ येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत देशाच्या वेगवेगळ्या भागांतून एकूण चार संशयितांना अटक करण्यात आली असून, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.