Veer Savarkar बदनामी खटला; जाणून घ्या खरी बाजू; उलटतपासात सात्यकी सावरकरांची सडेतोड उत्तरे

सात्यकी सावरकर शेवटी थेट म्हणाले, "या खटल्याचा मुख्य मुद्दा सावरकरांच्या दया याचिका हा नसून, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी (Veer Savarkar) केलेल्या कथित बदनामीकारक विधानांचा आहे!" या बदनामी संदर्भातील सर्व भक्कम आणि आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.

370
सात्यकी सावरकर, वीर सावरकर आणि राहुल गांधी यांचा फोटो
सात्यकी सावरकरांनी न्यायालयात वीर सावरकरांची बाजू मांडली.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्याविषयी बिनबुडाचे आरोप आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात सुरू असलेल्या बदनामीच्या खटल्यात पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी सुरु होती. त्यावेळी वीर सावरकरांचे नातू आणि याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचा उलटतपास घेण्यात आला. त्यावेळी वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) देशभक्तीवर आणि ‘वीर’ उपाधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींच्या वकिलांचे सर्व आक्षेप सात्यकी सावरकर यांनी आपल्या कायदेशीर आणि धारदार उत्तरांनी पूर्णपणे खोडून काढले.

अंदमानातील शिक्षेपूर्वीच सावरकर ‘वीर’ होते

सुनावणीदरम्यान राहुल गांधींच्या वकिलांनी सावरकरांना (Veer Savarkar) मिळालेल्या ‘वीर’ या उपाधीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावर सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात कडक शब्दांत सुनावले की, सावरकरांना (Veer Savarkar) ‘वीर’ म्हणून संबोधणे अंदमान कारावासाच्या पूर्वीपासूनच सुरु झाले होते. ऐतिहासिक दाखला देत ते म्हणाले की, विख्यात ‘गदर चळवळी’च्या साहित्यातही सावरकरांचा (Veer Savarkar) उल्लेख अत्यंत अभिमानाने ‘वीर सावरकर’ असाच करण्यात आला आहे. त्यामुळे ही उपाधी कोणत्याही सरकारी मेहेरबानीमुळे किंवा सन्मानामुळे मिळालेली नसून, देशातील जनमानसाने त्यांच्या अफाट क्रांतीकार्याची दखल घेऊन दिलेला हा सर्वोच्च लोकसन्मान आहे.

ब्रिटीशांना सावरकरांची भीती होती 

उलटतपासात सावरकरांनी (Veer Savarkar) अंदमानातून दहा वेळा क्लेमन्सी (दया) याचिका दाखल केल्याचा मुद्दा आरोपीच्या वकिलांनी मोठ्या थाटात मांडला. यावर सात्यकी सावरकरांनी ठामपणे सांगितले की, अशा याचिका दाखल करणे ही तत्कालीन ब्रिटीश कारागृह व्यवस्थेतील एक ‘नियमित आणि कायदेशीर प्रक्रिया’ होती. सावरकरांशिवाय इतरही अनेक कैद्यांनी याच कायदेशीर मार्गाचा वापर केला होता. केवळ कायदेशीर प्रक्रियेचा वापर केला म्हणून सावरकरांच्या अथांग देशभक्तीचे किंवा क्रांतिकारकत्वाचे मूल्यमापन करता येऊ शकत नाही.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्या अवमानप्रकरणी राहुल गांधींच्या इंग्लंड दौऱ्याचा तपशील सादर करण्याची मागणी)

सात्यकी सावरकर यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले की, “ब्रिटीश सरकारने सावरकरांच्या सर्व दया याचिका फेटाळल्या होत्या!” इतकेच नव्हे तर ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या अंतर्गत नोंदींमध्ये स्पष्ट लिहिले होते की, ‘सावरकरांची भाषा धोरणात्मक असून, त्यांची सुटका झाल्यास ते पुन्हा ब्रिटीश साम्राज्याविरोधात क्रांतिकार्यात उडी घेतील.’ यावरून हे स्पष्ट होते की, तथाकथित दया याचिकांनंतरही ब्रिटीश सरकार सावरकरांच्या (Veer Savarkar) राष्ट्रवादी विचारांना आणि त्यांच्या क्रांतीला किती घाबरत होते!

स्वतःच्या सुटकेसाठी नव्हे, तर सर्व कैद्यांसाठी लढा!

सावरकरांची सुटका केवळ दया याचिकांमुळे झालेली नाही, तर त्या याचिकांमधील भाषा ही तत्कालीन प्रशासनिक व्यवहारांनुसार औपचारिक स्वरूपाची होती. विशेष म्हणजे, सावरकरांनी (Veer Savarkar)  या याचिकांमधून केवळ स्वतःच्या सुटकेची मागणी केली नव्हती, तर अंदमानच्या नरकात सडणाऱ्या इतर सर्व दीर्घकालीन राजकीय कैद्यांच्या सुटकेची मागणी सातत्याने लावून धरली होती, हा इतिहास सात्यकी यांनी न्यायालयासमोर मांडला.

उपाध्या जनतेने दिल्या, वाद फक्त राहुल गांधींच्या बदनामीचाच!

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि बटुकेश्वर दत्त या महान क्रांतिकारकांचे संदर्भ देत सात्यकी सावरकरांनी स्पष्ट केले की, देशातील समाजाने विविध क्रांतिकारकांच्या योगदानाचा गौरव वेगवेगळ्या उपाध्या देऊन केला आहे. जनतेनेच कोणाला ‘वीर’, कोणाला ‘महात्मा’ तर कोणाला ‘नेताजी’ म्हटले आहे.

उलटतपासाचा रोख बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींच्या वकिलांना सात्यकी सावरकर शेवटी थेट म्हणाले, “या खटल्याचा मुख्य मुद्दा सावरकरांच्या दया याचिका हा नसून, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी (Veer Savarkar) केलेल्या कथित बदनामीकारक विधानांचा आहे!” या बदनामी संदर्भातील सर्व भक्कम आणि आवश्यक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत.” न्यायालयीन कामकाजाची वेळ संपल्यामुळे सात्यकी सावरकर यांचा हा धगधगता उलटतपास पुढील सुनावणीसाठी १ जुलै २०२६ पर्यंत तहकूब करण्यात आला आहे. मात्र, आजच्या सुनावणीत सावरकर विरोधकांचे मनसुबे न्यायालयाच्या पटलावर उघडे पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.