Pune crime : अलीकडेच पुण्यातून ऑनलाई लग्नपत्रिकेद्वारे आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली होती, त्यापाठोपाठ गॅस बिलच्या माध्यमातून सायबर फ्रॉड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुमचे गॅस बिल थकले आहे”, “कनेक्शन आज रात्री बंद केले जाईल” किंवा “बिल अपडेट करणे आवश्यक आहे”, असे संदेश पाठवून नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या सायबर टोळ्यांचा गुन्हा उघडकीस आला आहे. एरंडवणे आणि मुंढवा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून अशा प्रकारच्या फसवणुकींच्या तक्रारी समोर आल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुण्यात लाखोंची फसवणूक
कोथरूडमधील एका ज्येष्ठ नागरिक महिलेला, गॅस कनेक्शन बंद करण्याची धमकी देत तब्बल 8.91 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. तर वारजे परिसरातील एका नागरिकाची बनावट MNGL बिलाच्या संदेशाद्वारे सुमारे 6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील अन्य काही प्रकरणांमध्येही लाखो रुपयांची रक्कम सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्याची नोंद आहे.
फसवणूक नेमकी कशी केली जाते?
हे रॅकेट चालवणारे सायबर गुन्हेगार, नागरिकांच्या मोबाईलवर गॅस कंपनीच्या नावाने संदेश पाठवतात. या संदेशात गॅस बिल थकित असल्याचे सांगितले जाते आणि तातडीने बिल न भरल्यास गॅस पुरवठा बंद केला जाईल, अशी भीती दाखवली जाते. संदेशासोबत एक लिंक किंवा संपर्क क्रमांक दिला जातो. नागरिकांनी त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना बनावट पेमेंट पेजवर नेले जाते किंवा मोबाईलमध्ये एपीके (APK) फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते.
एकदा ही फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाली की सायबर गुन्हेगारांना संबंधित व्यक्तीच्या फोनवर दूरस्थ नियंत्रण (Remote Access) मिळते. त्यानंतर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयशी संबंधित माहितीचा वापर करून खात्यातील पैसे परस्पर काढले जातात. अनेक प्रकरणांत पीडितांना फसवणूक झाल्याचे पैसे गायब झाल्यानंतरच लक्षात आले आहे.
पोलिसांचा नागरिकांना इशारा
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा, एपीके फाइल डाउनलोड न करण्याचा आणि गॅस बिलासंबंधी कोणतीही माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत मोबाईल अॅपवरूनच तपासण्याचा सल्ला दिला आहे. गॅस कंपन्या व्हॉट्सअॅप, एसएमएस किंवा फोनद्वारे एपीके फाइल पाठवत नाहीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयास्पद संदेश आल्यास तत्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community

