Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठा गोंधळ, दक्षिण कोरियाच्या संचलनात वाजलं उत्तर कोरियाचं राष्ट्रगीत

18
Asian Games 2026
Asian Games 2026
  • ऋजुता लुकतुके

Asian Games 2026 : जपानमध्ये सुरू झालेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुरुवातीलाच आयोजकांच्या मोठ्या गोंधळामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण कोरियाच्या पुरुष हॉकी संघाच्या सामन्यापूर्वी दक्षिण कोरियाचे राष्ट्रगीत वाजवण्याऐवजी चक्क उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या प्रकारामुळे मैदानावर उपस्थित दक्षिण कोरियाचे खेळाडू काही क्षण गोंधळून गेले. अखेर आयोजकांनी चूक मान्य करत माफी मागितली.

हा प्रकार शुक्रवारी गिफू प्रीफेक्चरल ग्रीन स्टेडियमवर दक्षिण कोरिया आणि बांगलादेश यांच्यातील पुरुष हॉकीच्या ‘अ’ गटातील सामन्यापूर्वी घडला. दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर उभे असताना दक्षिण कोरियाच्या राष्ट्रगीताऐवजी उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत सुरू झाले. दक्षिण कोरियाचे खेळाडू या प्रकारामुळे आश्चर्यचकित झाले. काही खेळाडूंनी हात डोक्यावर नेले, तर काहींनी छातीवर हात ठेवून राष्ट्रगीताची औपचारिकता पाळण्याचा प्रयत्न केला.

आयोजकांच्या लक्षात चूक येताच उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत थांबवण्यात आले. त्यानंतर प्रथम बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि मग दक्षिण कोरियाचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. मात्र वेळेअभावी पंचांनी दोन्ही संघांना हस्तांदोलन करून सामना सुरू करण्यास सांगितले. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना त्यांचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्याची संधीही मिळाली नाही.

(हेही वाचा – नंदीग्राम पोटनिवडणुकीत २४ तासांत चित्र बदललं; Mamata Banerjee यांना लागोपाठ तीन धक्के, नेमकं काय घडलं? )

या घटनेनंतर कोरियन स्पोर्ट अँड ऑलिम्पिक समितीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजन समितीकडे अधिकृत तक्रार दाखल केली. राष्ट्रगीत हा देशाच्या अस्मितेचा महत्त्वाचा प्रतीक असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. समितीने घटनेची चौकशी करून अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

दरम्यान, आयोजन समितीच्या दोन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री दक्षिण कोरियाच्या संघाच्या कार्यालयात जाऊन या चुकीबद्दल अधिकृत माफी मागितली. दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक मिन ताए-सोक यांनीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशी घटना घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

या गोंधळानंतरही दक्षिण कोरियाच्या संघाने मैदानावर दमदार कामगिरी करत बांगलादेशचा ५-० असा पराभव केला. मात्र सामन्यापूर्वी घडलेली ही घटना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजन व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.