Pune crime : राज्यभरात सायबर फ्रॉड्सच्या घटना झपाट्याने वाढत असून, लग्नसराईच्या हंगामात सायबर गुन्हेगारांनी डिजिटल लग्नपत्रिकांच्या माध्यमातून फसवणुकीचा एक नवा प्रकार सुरु केला आहे. व्हॉट्सअॅपवर लग्नपत्रिकेच्या नावाखाली एक संशयास्पद फाईल पाठवून, त्याद्वारे नागरिकांची बँक खाती रिकामी केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अलीकडेच पुण्यातून असाच एक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.
नेमके प्रकरण काय?
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारे आरोपी व्हॉट्सअॅपवर परिचित व्यक्तीच्या क्रमांकावरून लग्नाचे आमंत्रण असल्याचा भास निर्माण करणारी ‘.APK’ फाईल पाठवतात. ही फाईल प्रत्यक्षात मोबाईलमध्ये घातक सॉफ्टवेअर (मालवेअर) इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाते. फाइल डाउनलोड किंवा उघडल्यावर मोबाईलवरील संवेदनशील माहिती, ओटीपी, बँकिंग तपशील आणि इतर डेटा सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाण्याचा धोका असतो.
पुण्यातील गणेश पेठ परिसरातील 47 वर्षीय व्यावसायिकाला, मित्राच्या मोबाईल क्रमांकावरून लग्नपत्रिकेच्या स्वरूपातील फाइल प्राप्त झाली होती. काही दिवसांनंतर त्यांच्या बँक खात्यातून अनेक व्यवहारांद्वारे रक्कम वळती करण्यात आली. या प्रकरणात त्यांना सुमारे 4.43 लाख रुपयांचा फटका बसल्याचे तपासात समोर आले आहे.
दुसऱ्या प्रकरणात गुरुवार पेठेतील 54 वर्षीय व्यक्तीला नातेवाईकाच्या क्रमांकावरून अशाच प्रकारची फाइल आली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या खात्यातून 4.1 लाख रुपये काढण्यात आल्याची तक्रार नोंदवण्यात आली.
हेही वाचा: Water Cut : कल्याण-डोंबिवलीकरांवर जलसंकट; आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात!
.APK फाइल नक्की काय असते?
‘APK’ (Android Package Kit) ही अँड्रॉइड मोबाईलमध्ये अॅप इन्स्टॉल करण्यासाठी वापरली जाणारी फाइल असते. सामान्य लग्नपत्रिका, पीडीएफ किंवा फोटोच्या स्वरूपात येत नाही. त्यामुळे ‘marriage.apk’, ‘wedding invitation.apk’ किंवा तत्सम नावाची कोणतीही फाइल आल्यास ती अत्यंत संशयास्पद मानावी, असे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
देशभरात अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीत वाढ होत आहे. राजस्थान पोलिसांनी नुकतीच नागरिकांना अशा बनावट लग्नपत्रिका आणि APK फाइल्सबाबत विशेष सूचना जारी केली आहे. तसेच बंगळुरूमध्ये एका व्यावसायिकाची बनावट लग्नपत्रिका डाउनलोड केल्यानंतर सुमारे 5 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती.
हेही वाचा: Ebola Outbreak : आफ्रिकेत इबोलाचे 100 हून अधिक बळी; WHO चा कडक इशारा, भारतात काय स्थिती?
अशा फसवणकीपासून कसे वाचाल?
- व्हॉट्सअॅपवर आलेली .APK फाइल कधीही डाउनलोड करू नका.
- लग्नाचे आमंत्रण किंवा इतर कोणतीही फाइल आल्यास पाठवणाऱ्या व्यक्तीशी फोनवर संपर्क साधून खात्री करा.
- अनोळखी लिंक, शॉर्ट URL किंवा अॅप डाउनलोड करण्याच्या सूचनांपासून दूर राहा.
- मोबाईलमध्ये केवळ अधिकृत अॅप स्टोअरमधूनच अॅप्स इन्स्टॉल करा.
- संशयास्पद व्यवहार दिसताच बँक आणि राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन 1930 वर त्वरित संपर्क साधा.


